उत्तम, सुदृढ आरोग्यासाठी योगासन ठरतेय वरदान

 

दरवर्षी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. योगशास्त्र ही भारताने जगाला दिलेली मोठी देणगी. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी योगासने हा एक उत्तम पर्याय आहे. हे विज्ञानानेसुध्दा मान्य केले आहे. त्यामुळे परदेशातही योगाला महत्त्व आहे. हे ओळखूनच 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला आहे. त्यानिमित्त प्रसिद्ध योगगुरू नंदकुमार अंबिके यांनी योगशास्त्राचा घेतलेला आढावा खास “प्रभात’च्या वाचकांसाठी…

आजच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या वातावरणात शारीरिक आणि मानसिक स्वास्थासाठी योगाभ्यास हे मानवजातीला मिळालेले मोठे वरदान आहे. विशेष म्हणजे, या शास्त्राची सुरूवातही भारतातूनच झाली आहे. योगाचे मूळ जनक आहेत स्वामी पतंजली. आज आपण पतंजलीचे नाव खूप ऐकतो. पण, मूळ पतंजली म्हणजे कोण, याबाबत मात्र आपल्याला माहिती नसते. रामदेवबाबांच्या सगळ्या उत्पादनांना पतंजलीचे नाव देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी आपण पतंजली योग केंद्र म्हणून फलक पाहतो. हे पतंजली कोण? असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल, पण पतंजली हेच मुळी योगाचे जनक आहेत. त्यांनीच योगशास्त्र मांडले आणि आज संपूर्ण मानवजातीला सामर्थ्य मिळवून देणारी एक शक्तीच मिळवून दिली आहे. पतंजली यांच्या जन्माचीसुध्दा एक कथा सांगितली जाते. भगवान शंकर हे कैलास पर्वतावर तांडव नृत्य करत होते. त्यामुळे सृष्टीमध्ये प्रलय निर्माण झाला. हे पाहण्यासाठी विष्णू आले असता त्यांना भगवान शंकर हे तांडव नृत्य करताना दिसले. विष्णू तांडव नृत्य पाहण्यात दंग झाले. त्यामुळे विष्णूंचे वजन वाढू लागले. त्यामुळे शेषनागावरील भार वाढू लागला. त्यावेळी शेषनागाने विष्णूजींना विनंती केली, “हे देवा तुमचे वजन वाढले आहे. मला आता हा भार सोसवत नाही’. पण, विष्णूजींनी त्याकडे लक्ष दिले नाही. ते तांडव नृत्य बघण्यात तल्लीन झाले. शेषनागानेसुद्धा विष्णूजी ऐवढे एकाग्र होऊन काय पाहत आहेत, म्हणून वर पाहिले. तर भगवान शंकर हे तांडव नृत्य करत असल्याचे दिसले. शेषनागाला हे नृत्य फार आवडले. त्यांनी विष्णूजींकडे प्रार्थना केली, “मला सुध्दा हे नृत्य शिकायचे आहे’ त्यावर विष्णूजींनी हे नृत्य शिकायचे असेल, तर तुला मानवी रुप धारण करावे लागेल व पृथ्वीतलावर जावून तुला अशी स्त्री शोधावी लागेल जी सात्विक आणि धार्मिक आहे.’ शेषनागाने विष्णूजींची अट मान्य केली व ते पृथ्वीतलावर आले. त्यावेळी एक स्त्री सकाळी सूर्याला अर्घ्य देताना त्यांना दिसली. शेषनागांने छोटे रूप धारण करुन ते स्त्रीच्या ओंजळीत जावून बसले व त्या स्त्रीला विचारले “माते, मला तुझ्या पोटातून जन्म घ्यायला आहे. तुझी अनुमती आहे का’ ? त्यावेळी त्या स्त्रीने लगेच होकार दिला. त्या स्त्रीचे नाव होते गौनिका. त्यानंतर शेषनागाने गौनिकाच्या पोटी जन्म घेतल्यावर त्याचे नाव ठेवले गेले पतंजली. पतंजली यांनीच योगाची निर्मिती केली. त्यामुळे आज जगात जो योग रुजला आहे, त्या योगाचे ते खरे जनक ठरले. पत म्हणजे पडणे आणि अंजली म्हणजे ओंजळ असा त्याचा अर्थ होते. हे दोन्ही शब्द मिळून पतंजली या शब्दाची निर्मिती झाली आहे.

पतंजली यांनी योगाची निमिर्ती करताना काही योगसूत्र तयार केली. त्यात आठ अंगांची निर्मिती करण्यात आली. ही आठ अंग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी अशी आहेत. पतंजली यांनी त्यानंतर तब्बल बावीसहून अधिक भाष्यकारांनी त्याचा प्रसार केला. त्यात व्यासमुनी यांचासुद्धा समावेश आहे. पुरातन काळातसुध्दा प्रभू रामचंद्रांनीही योगाचा अभ्यास करुन एकाग्रता निर्माण केली होती. अगदी ज्ञानेश्‍वर महाराजांनी सुद्धा संजीवन समाधी घेताना योगाचे ज्ञान घेतले होते. रामदास स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हे सुध्दा योगामध्ये निपुण असलेले संत होते.

योगविद्या किंवा योगसने ही पुस्तकात पाहून किंवा कोणी सांगून येत नाहीत, तर त्याला गुरू करावाच लागतो. गुरू शिवाय योगभ्यास करता येत नाही. त्यातील प्रत्येक आसने ही शिष्याकडून करुन घ्यावी लागतात. त्यामुळे गुरूलासुध्दा सगळी आसने आणि त्यांची नावे पूर्ण माहिती असणे आवश्‍यक आहेत. योगासंदर्भात मूळ अशी कुठलीही पुस्तके किंवा लिखाण आपल्याला आढळत नाही. त्याचे कारण हेच आहे की, विद्या गुरूकडून घ्यायची असते. गुरू आपल्या शिष्यांना योगाचे ज्ञान देतो आणि मग हेच शिष्य आपल्या पुढच्या पिढीला योगाचे ज्ञान देतात.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात योगाला फार महत्व आहे. काही वर्षांपूर्वी भारतापेक्षा परदेशातच योगाचा प्रसार जास्त होत होता. रामदेव बाबा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व ओळखले आणि योगाचा प्रसार सुरू केला. त्यात रामदेव बाबा यांचे योगदान फार मोलाचे आहे. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी योगभ्यासाला फार महत्व दिले जात नव्हते. कारण, त्याकाळात शरीराच्या हालचालीतून रोज योगासने होत होती. म्हणजे सायकल, बैलगाडी चालविणे, कपडे धुणे किंवा भांडी घासणे यातून आपल्या शरीराच्या हालचाली दिवसभर होत. अजूनसुध्दा ग्रामीण भागातील महिलांना योगासनाची गरज भासत नाही. रोजची त्यांची कामे हीच योगासने आहेत. विज्ञानाने प्रगती केली. सोयी-सुविधा निर्माण झाल्या. सायकलऐवजी गाडी आली. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन आले. झाडून काढण्यासाठी वाकावे लागत नाही. त्याचा परिणाम असा झाला, की शरीराच्या हालचाली या कमी झाल्या. त्यामुळे जागेवर बसून सगळीकामे होऊ लागली. त्याचा परिणाम शरीरावर होऊ लागला आणि पाठदुखी, कंबरदुखी सारखे आजार वाढू लागले. मग आता कुठे नागरिकांना योगाचे महत्व पटू लागले आहे. पाठीच्या दुखण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सकाळच्या वेळात थोडी योगासने केली, तरी फायद्याचे ठरत आहे. याची जाणीव झाल्याने आज योगाचे महत्त्व वाढत आहे. खरं म्हणजे आधुनिक जीवनशैली हीच आपल्या विकारांचे मूळ कारण आहे. पण, ही जीवनशैली आता आपल्याला सोडता येणार नाही. कारण, काळानुसार बदलले पाहिजे. मग, ही जीवनशैली ठेवायची असेल, तर सकाळच्या वेळात थोडी योगासने केली, तर काय फरक पडतो? त्यामुळे आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया, की रोज किमान पंधरा मिनिटे तरी योगासने करणारच!

 

शब्दांकन: समीर कोडिलकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)