उत्कर्ष क्रीडा संस्था-भैरवनाथ संघ अंतिम लढत रंगणार 

जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 
मुलींच्या गटात राजा शिवछत्रपती संस्था व धर्मवीर अंतिम फेरीत 

पुणे- उत्कर्ष क्रीडा संस्था आणि भैरवनाथ संघ भोसरी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान आयोजित कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील कुमार गट मुलांच्या गटात अंतिम फेरीत धडक मारली. कुमार गट मुलींच्या विभागात राजा शिवछत्रपती संस्था आणि धर्मवीर प्रतिष्ठान बालेवाडी या संघानी अंतिम फेरीत प्रवेश केला.

खराडी येथील कै.राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या कै. वि. मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. कुमार गट मुलांच्या उपात्य फेरीतील सामन्यात उत्कर्ष क्रीडा संस्था या संघाने महाराणा प्रताप संघ मंचर या संघावर 39-19 असा दणदणीत विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला उत्कर्ष क्रीडा संस्थेकडे 18-6 अशी आघाडी होती. उत्कर्ष क्रीडा संस्थेच्या अभिजित चौधरीचा अष्टपैलू खेळ, अमित मिसाळच्या चढाया आणि ओंकार घोडकेच्या पकडींच्या जोरावर हा सामना सहज जिंकला. महाराणा प्रताप संघाच्या रोहित निघोट याने उत्कृष्ट चढाया केल्या तर प्रथमेश निघोट याने चांगल्या पकडी घेत चांगली लढत दिली.

मुलांच्या दुसऱ्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ संघाने पुण्याच्या नूमवि संघावर 44-19 गुणांनी विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला भैरवनाथ संघाकडे 29-7 अशी भक्कम आघाडी होती. भैरवनाथ संघाचा अक्षय वढाणे व संकेत लांडगे यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला चांगली आघाडी मिळवून दिली. त्यांना योगेश अक्षुमणी व हर्षद माने यांनी उत्कृष्ट पकडी घेत त्यांना चांगली साथ दिली.

कुमार गट मुलींच्या पहिल्या उपान्त्य सामन्यात राजा शिवढछत्रपती संघाने सुवर्णयुग संगाचा 23-16 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. मध्यंतराला राजा शिवछत्रपती संघाकडे 12-7 अशी आघाडी होती. राजा सिवछत्रपती संघाच्या मानसी रोडे व सिद्दी पोळच्या चढाया आणि त्यांना प्रतीक्षा दाभाडे हिने उत्कृष्ट पकडी घेत चांगली साथ दिल्याने हा विजय मिळविला. अनुभवी सुवर्णयुगच्या दीप्ती दिघे हिने केलेल्या चढाया व हर्षदा सोनवणे हिने घेतलेल्या पकडी या मुळे सामन्या चांगलीच रंगत आली होती मात्र अनुभव असूनही त्यांना या सामन्यात मानसी रोडे व सिद्धी पोळचे आक्रमण थोपविण्यात अपयश आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.

कुमार गट मुलींच्या दुसऱ्या उपान्त्य सामन्यात बालेवाडीच्या धर्मवीर प्रतिष्ठान संघाने बारामतीच्या शारदा प्रतिष्ठान संघावर 32-15 असा विजय मिळवीत अंतिम फेरी गाठली. मध्यंतराला धर्मवीर संघाकडे 16- 7 अशी आघाडी होती. धर्मवीर संघाच्या तेजस पाटील व समृद्धी कोळेकरच्या चढाया आणि कल्पना घोटकुलेच्या पकडी यांच्या जोरावर हा सामना जिंकला. शारदा प्रतिष्ठान संघाच्या लीना जमदाडे हिने उत्कृष्ट खेळ करीत चांगली झुंज दिली. तिला स्नेहा वाणी हिने काही चांगल्या पकडी घेत साथ दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)