उत्कट, उत्स्फूर्त, उत्कृष्ट! 

डॉ. न. म. जोशी 
कोल्हापूरजवळच्या हरळी गावातला एक तरुण शिकून पुण्यात आला. फर्ग्युसन महाविद्यालयात वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक झाला. त्याच्या तासाला इतर महाविद्यालयातले विद्यार्थीही येऊन बसू लागले. इतकं त्याचं शिकवणं प्रभावी होतं. याच प्राध्यापकांना मग फर्ग्युसनच्या वसतिगृहाचं प्रमुखपद मिळालं. एकेदिवशी सरांनी एक प्रसंग अनुभवला. वसतिगृहातील विद्यार्थ्याला एक मुलगी खिडकीतून काही खाद्यपदार्थ देत होती. मनात शंका बळावली. हा विद्यार्थी आफ्रिकी देशातून आला होता. त्याला कावीळ झाली होती. त्याची बहीण त्याला बाहेरून पथ्याचे पदार्थ पुरवीत होती. सरांचं उलट मन कळवळलं. आपण उगाच त्याविषयी काही शंका घेतली. अशी चुटपूट लागली आणि मग या मनस्वी प्राध्यापकांनी एक विचार केला. अमेरिका, इंग्लंड या प्रगत देशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इथं कौतुकानं पायघड्या घातल्या जातात. पण आफ्रिकीसारख्या देशांतून, थायलंड, मलेशियासारख्या देशांतून येणाऱ्यांचं काय? त्यांची भाषेचीही अडचण मोठी. मग त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्था काढायची ठरलं. सरांचे विद्यार्थी सतीश ठिगळे, पत्रकार वि. स. वाळिंबे, दुसरे विद्यार्थी दांडेकर, सहकारी सुधाकर भोसले यांच्यासह सरांनी “सिंबायोसिस’ ही संस्था स्थापन केली. एका सजीवानं दुसऱ्या सजीवासाठी काहीतरी करून सहजीवनातून मार्ग काढायचा म्हणजे सिंबायोसिस? हे नाव देणारे आणि उत्कट प्रसंगातून उत्स्फूर्तपणे संस्था स्थापन करणारे ते सर म्हणजे डॉ. शां. ब. मुजुमदार!

डॉ. मुजुमदारांनी केवळ संस्था नाही स्थापन केली. उत्कृष्टतेचा ध्यास घेतला. काळाची पावलं ओळखली. नवं तंत्रज्ञान आता शिक्षण क्षेत्राला कवळू पाहणारं आहे आणि नव्या गरजाही निर्माण होणार आहेत हे त्यांनी ओळखलं. पत्नी संजीवनीची साथ मिळाली आणि बघता बघता हे इवलेसे रोप… त्याचा वेळू गगनावरी गेलेला समाजाला बघायला मिळाला. सेनापती बापट रोडवर छोट्या जागेत उभी राहिलेली संस्था आज पुण्यातच पाच ठिकाणी आणि हैदराबाद, नाशिक, इंदोर, नागपूर अशा ठिकाणी भव्य स्वरूपात विस्तारलेली आहे. डॉ. आंबेडकरांचं स्मारक बघायला आणि कॉमन मॅनचं दर्शन घ्यायला हजारो लोक सिंबायोसिसमध्ये येतात. हरळीची हरळी शांतारामानं पुण्यात आणून लावली आणि तिचं रूपांतर विशाल नेत्रदीपक, नयनरम्य, उद्यानात केलं.

कशामुळं हे सगळं झालं? 
उत्कटता, उत्स्फूर्तता आणि उत्कृष्टता यांचा ध्यासामुळं?
विचार अनेकांच्या मनात येतात. पण कृतीत आणण्यासाठी जी उत्कटता लागलेली नसते. या उत्कटतेला उत्स्फूर्ततेचाही पाझर असावा लागतो. आणि तेही असलं तरी चांगलं काम उभारायचं असलं तर घ्यास हवा असतो उत्कटतेचा! सिंबायोसिसमध्ये गुणवत्तेशी तडजोड नाही, परिश्रमाला पर्याय नाही, कल्पकतेला काढाचं बंधन नाही. म्हणून तर सिंबायोसिस आज जगाच्या नकाशावर स्थान मिळवून आहे. हे का घडलं? कसं घडलं? यासाठी मुजुमदारांचं चरित्र मुळातूनच वाचावं लागेल. उत्कटता, उत्स्फूर्तता आणि उत्कटता यांचा ध्यास म्हणजे काय हे अनेक प्रसंगांतून अनुभवावं लागेल?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)