उड्डाणपूल झालेत मोफत “पार्किंग स्टॅण्ड’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरांतर्गत सार्वजनिक वाहतूक जलदगतीने व्हावी, या हेतूने उभारण्यात आलेले उड्डाणपूल मोफत “पार्कींग स्टॅण्ड’ झाले आहेत. याशिवाय भटक्‍या व्यक्तिंचा हक्काचा निवारा, तसेच मद्यपींच्या अड्डयांमुळे या उड्डाणपुलाखाली ओंगाळवाणे दृश्‍य पहायला मिळत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-नाशिक आणि जुन्या पुणे-मुंबई मार्ग जोडणारा नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुल आता दुचाकी व चारचाकी वाहन चालकांचे हक्काचे “पार्कींग स्टॅण्ड’ बनले आहे. या उड्डाणुलाच्या उभारणीमुळे मोठ्या प्रमाणावर पुलाखाली मोकळी जागा उपलब्ध झाली आहे.

याठिकाणी असलेल्या कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ सशूल्क खासगी वाहनतळ सेवा उपलब्ध आहे. मात्र विरुद्ध बाजूला असलेल्या टाटा उड्डाणपुलाखालील विकास कामे प्रलंबित असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांचे ते हक्काचे वाहन बनले आहे. याशिवाय पुणे-मुंबई महामार्गालगतच्या कार ऍक्‍सेसिरीज व वाहन विक्रेत्यांचे देखील हे हक्काचे ठिकाण बनले आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपुलाच्या पिलरचा वापर व्यावसायिकांकडून जाहिरात फलक लावण्यासाठी केला जात आहे. याशिवाय या उड्डाणपुलाखाली “नो पार्कींग’चा फलक लावण्यात आला असून, याठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने या उड्डाणपुलाखालील जागा दुचाकी व चारचाकी वाहन तळाबरोबरच कचरा टाकण्याचे ठिकाण झाले आहे.

निगडी आणि फुगेवाडीतील उड्डाणपुलाखाली फिरस्त्यांचे वास्तव्य असल्याचे ओंगाळवाणे दृश्‍य दिसत आहे. फुगेवाडीतील उड्डाणपुलाखाली तर मद्यपींचा अड्डा आहे. चापेकर चौकातील उड्डाणपुलाखाली होत असलेल्या नि:शुल्क पार्कींगमुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मात्र, याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. याशिवाय के. एस. बी. चौकात नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालील परिसरात सर्व कंपन्यांमधील कामगारांची वाहने उभी केली जात आहेत.

बॅनरबाजीसाठी हक्काचे ठिकाण
संपूर्ण शहरात सर्वाधिक अनधिकृत फ्लेक्‍स भोसरी परिसरात पहायला मिळतात. अनधिकृत फ्लेक्‍स आणि जाहिरातबाजीसाठी भोसरी उड्डाणपूल म्हणजे हक्काची जागा बनली आहे. राजकीय कार्यकर्ते फुकटची फ्लेक्‍सबाजी करुन नेतेगिरीची हौस भागवून घेतात. अनेक खासगी जाहिरातींचे बॅनर पुलाच्या पिलरला लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुलाचे विद्रुपीकरण झाले आहे. महापालिका प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

बचतगटांना वाहनतळांचे कंत्राट धुळखात
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सशुल्क वाहनतळ (पे ऍण्ड पार्क) योजनेची कंत्राटे महिला बचतगटांना देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतला होता. त्यासाठी केरळचा दौरा करत त्याच धर्तीवर हा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, राजकीय उदासिनतेमुळे हा प्रस्ताव धुळखात पडला आहे. महिला बचत गटांना हे काम दिल्यास त्यांना कायमस्वरुपी चांगल्या पध्दतीचा रोजगार मिळू शकेल. शहरात सुमारे बारा हजार नोंदणीकृत बचतगट आहेत. महापालिकेच्या मिळकती, रुग्णालये तसेच शहरातील विविध भागात सुमारे 18 वाहनतळ आहेत. यामध्ये या उड्डाणपुलांची भर पडल्यास या वाहनतळांच्या कंत्राटाच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी रोजगाराचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या निर्णयाकडे महिला बचतगटांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)