उड्डाणपुलावर पावणे तीन कोटींचा “झगमगाट’

पिंपरी – महापालिकेच्या वतीने निगडीतील भक्ती-शक्ती चौकात नव्याने उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या विद्युत रोषणाईकरिता महापालिका 2 कोटी 67 लाख 32 हजार 407 रुपये खर्च केला जाणार आहे. स्थायी समितीने या खर्चास मंजुरी दिली आहे. बुधवारी (दि. 1) पार पडलेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरु आहे. पुणे-नाशिक व पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या नाशिक फाटा येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलावरील आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या पुलाची शहरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या उड्डाणपुलावरील आकर्षक विद्युत रोषणाई रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आकर्षण ठरले आहे. या धर्तीवर निगडीतील उड्डाणपुलावर देखील आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे. या कामाकरिता 3 कोटी, 14 लाख, 75 हजार 812 रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये पाच ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये मे. यश इलेक्‍ट्रो लाईन या ठेकेदाराची सर्वात कमी 15.07 टक्के दराची 2 कोटी, 67 लाख, 32 हजार 407 रुपयाची निविदा प्राप्त झाली असून, स्थायीने ऐनवेळी मांडलेल्या या खर्चाला स्थायीने मान्यता दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भक्ती-शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे विकसित करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षांपासून या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. परंतु, याठिकाणी असलेल्या चौकामुळे लहान-मोठे अपघात नेहमीच होत असतात. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्‍यात आली आहे आणि वाहतुकीची कोंडीही दिवसें-दिवस वाढत आहे. त्यासाठी या चौकात ग्रेडसेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

भक्ती-शक्ती चौकातील प्रत्येक दिशेला जाणारे वाहन समगतीने फिरते राहून चौक ओलांडण्याचे नियोजन केलेले आहे. चौकाजवळच शहराचा मानबिंदू असणारा भक्ती-शक्ती शिल्पसमूह आहे. त्याचे सौंदर्य कोठेही कमी होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. रोटरीमुळे पादचाऱ्यांना चौकाच्या कोणत्याही दिशेने ये-जा करणे शक्‍य होणार आहे.

असा आहे उड्डाणपूल
निगडीतील नियोजित उड्डाणपुलाचे “क्रॅश बॅरिअर’ हे भक्ती – शक्ती शिल्पाच्या तळाशी समपातळीमध्ये आहे. यामुळे बस मधील प्रवाशांना देखील पुलावरून संपूर्ण शिल्पाचे दर्शन होणार आहे. भक्ती-शक्ती चौकामध्ये तीन “लेव्हल’मध्ये बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच ग्रेड सेपरेटर स्पाइन रस्त्याला समांतर आणि येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन असणार आहे. प्राधिकरण ते मोशी दक्षिण – उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडणार असून, त्याची लांबी 420 मीटर आणि 24 मीटर रुंदीच्या दोन लेन, 5.50 मीटर उंची असणार आहे. नाशिक महामार्गाकडून देहूरोड – कात्रज बावधन मार्गाकडे जाणारी जड वाहने ग्रेड सेपरेटरमधून जाण्याची व्यवस्था केलेली आहे. या उड्डाणपुलाचे सौंदर्य खुलविण्यासाठी त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)