उजवा विचार रूजू लागल्याने चिंता…

अकोले तालुक्‍याला डाव्या चळवळीचा इतिहास आहे. मात्र, राज्यात व केंद्रात सत्तापालट झाला आणि डाव्या विचारांची धार आता बोथट होऊ लागली असल्याने आणि उजवा विचार रुजू लागल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. याचा अपरिहार्यपणे परिणाम होणार आहे तो माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्यावर.

डाव्या विचाराची पाळेमुळे घट्टपणे रोवले गेलेल्या अकोले तालुक्‍याला चळवळीचा इतिहास आहे. मात्र, राज्यात व केंद्रात सत्तापालट झाला आणि डाव्या विचारांची धार आता बोथट होऊ लागली असल्याने आणि उजवा विचार रुजू लागल्याचे चित्र आता पुढे येऊ लागले आहे. याचा अपरिहार्यपणे परिणाम होणार आहे तो माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्यावर. जवळपास पाच दशके सत्ता गाजवणाऱ्या पिचड यांनी सतर्क होणे गरजेचे आहे हे नक्कीच. ही पाळेमुळे उजवा विचार अधिक खोलवर नेतात, की ती पाळेमुळे जनसत्तेच्या आधाराने पिचड यांना उखडून फेकून देतात हे पाहणे भविष्यात तरी रंजक ठरणार आहे.

देशाला प्रजासत्ताक बनवणाऱ्या अनेक लढाया झाल्या पण आदिवासीबहुल असणाऱ्या या तालुक्‍याने खरा क्रांतीकारी लढा दिला तो राघोजी भांगरे या आद्य क्रांतिकारकाच्या रुपानेच आणि हा लढा झिरपत झिरपत पोचला तो जंगलच्या सत्याग्रहापर्यंत. मामलेदाराला जाळण्यापर्यंत. देशाला स्वातंत्रय मिळाले. 1952 सालच्या पहिल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे गोपाळा श्रावणा भांगरे यांचे पुतणे यशवंतराव यांनी नवाळींना घरी बसवले. पण चळवळीच्या तालुक्‍याने 1967 साली भाकपच्या कॉ. बी. के. देशमुख यांना विजयी करुन आपला चळवळीचा बाणा दाखवून दिला. पुन्हा 1972 साली यशवंतराव भांगरे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या व 1977 साली कॉंग्रेस (एस) च्या उमेदवाराबरोबर विजय हशील केला. मात्र 1980 ते 2014 पर्यंत ज्या सार्वजनिक निवडणुका झाल्या त्यात प्रत्येक वेळेस पिचड यांच्या शिरावर सत्तेचा मुकुट चढला गेला. 1980 ते 1995 पर्यंत मधुकरराव पिचड हे कॉंग्रेसचे उमेदवार राहिले तर 1999 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. या इतिहासाच्या मागोव्यातच भांगरे-पिचड’ हा राजकीय संघर्ष कायम टिकला असल्याचे दिसले आहे.

1952 ते 1972 या काळच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कॉंग्रेसला कायमच मताधिक्‍य कमी मिळाले. त्यामुळे 1977 सालापासून 1999 पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघ नाशिकला जोडला गेला. मात्र, आणीबाणीच्या काळात व नंतर 1980 च्या निवडणुकीत तालुक्‍याने कॉंग्रेसला दूर ठेवले. नंतर कॉंग्रेसचा विचारच येथे लोकसभेसाठी रुजला हा अलीकडचा इतिहास आहे. 1990 साली शिवसेनेकडून विधानसभेला उमेदवार मिळाले. त्यानंतर शिवसेना आणि कॉंग्रेस असा सामना रंगू लागला. नंतरच्या घडामोडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुध्द शिवसेना असा सामना सर्वांना भावला. तर 2014 सालच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारीत कमळ’ चिन्ह उमलले आणि 15 वर्षे आघाडीची सत्ता असणाऱ्या अकोले तालुका पंचायत समितीवर कोणालाही अपेक्षित नसणाऱ्या शिवसेनेला सत्तेचा साज चढवण्याची वेळ नंतर आली.

2012 साली झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस 10 व कॉंग्रेस 2 असा 12 गणांत विजयी झाली होती तर जिल्हा परिषदेच्या सहापैकी 5 गटांवर राष्ट्रवादी व 1 गटात कॉंग्रेस विजयी झाली होती. आणि हा हा म्हणता बुथवर माणसे नियुक्तीस न मिळणाऱ्या शिवसेना पक्षाला 2017 च्या निवडणुकीत घसघशीत यश मिळाले. अकोले पंचायत समितीच्या 12 गणांत राष्ट्रवादी कॉंग्रेस – 4, शिवसेना – 4 व भाजपा – 4 असे संख्याबळ राहिले तर जिल्हा परिषदेच्या सहा गटांत राष्ट्रवादी कॉंग्रेस – 3, भाजपा – 2 व शिवसेना – 1 असे चित्र म्हणजे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या साम्राज्याला धक्काच होता. मग पंचायत समिती हातची गेली नाही तर राजकीय धूर्त खेळीत भाजपला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने ही सत्ता शिवसेनेच्या हाती सुपूर्द केली.

या सर्व घडामोडी पाहता शिवसेनेचा पदर धरुन तालुक्‍यात पाळेमुळे रुजवू पाहणाऱ्या भाजपला जालिंदर वाकचौरे यांच्या रुपाने कोरा करकरीत चेहरा मिळाला तर डोंगरदऱ्यात 2016 सालच्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत डॉ. किरण लहामटे यांच्या रुपाने लढावू बाण्याचा उमेदवार मिळाला. कॉंग्रेसचा इतिहास बाजूला सारुन भाजपला जवळ करणाऱ्या भांगरे घराण्याला पुन्हा एकदा पिचडविरोधी लढाईला सामोरे जावे लागणार आहे ते 2019 च्या निवडणुकीत. भांगरे यांच्या पत्नी सौ. सुनीता किंवा त्यांचे पुत्र, की डॉ. लहामटे हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.

नोकरी-धंद्यानिमित्त शहरात स्थिरावलेल्या मात्र गावामध्ये पावले वळवणाऱ्या तरुणांना आता शहरीकरणाचा वारा लागला आहे. त्यामुळे त्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपा-सेना जवळचा विचार वाटत असल्यास नवल ते कोणते? त्यास सत्तेतून काम व्हावे असा विचार घेऊन गेलेल्या गरजूंना मंत्रीपदाच्या काळात पिचड यांनी न्याय न दिलेल्यांचा असंतुष्ट गट हा पिचडांविरोधात उभा ठाकला आहे. शिवाय गावातील गटबाजीने दोन गट निवडणूक काळात भिन्न निशाण्या घेऊन पुढे येत आहेत. अलीकडच्या तीन दशकांत वनवासी’ कल्याण आश्रमाचा विद्यार्थी हा आदिवासी पालकांना आता कमळा’कडे मतदानास प्रवृत्त करीत आहे आणि सत्तेच्या माध्यमातून आम्ही विकासकामे करू शकतो असा विश्‍वास भाजपचे नेते समाजात पेरत आहेत. कारणे काहीही असली तरी येथे उजवा विचार रुजू लागला आहे. यामुळेच पिचड यांना हा सतर्कतेचा इशाराच आहे.

 

 

 

– प्रा. डी. के. वैद्य 
अकोले 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)