“उजनी’ 24 तासात 100 टक्के भरणार

जिल्ह्यातील धरण साखळीतून वेगाने विसर्ग; 110 टीएमसी पाणीसाठा
इंदापूर, – उजनी धरण पुर्ण क्षमतेने भरणार की नाही, अशी शक्‍यता गेल्या आठवड्यात व्यक्त केली जात असतानाच जिल्ह्यातील धरण साखळीतून भीमानदीत विसर्ग होत असल्याने उजनी धरणात आज दुपारी 12:00 पर्यंत 110 टीएमसी पाणीसाठा झाला असून, येत्या 24 तासात उजनी धरण 100 टक्के भरणार असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यासह नगर तसेच इंदापूर तालुक्‍याकरिता जीवनदायीनी ठरत असलेले उजनी धरण यावर्षी भरते की नाही, अशी चिन्हे असतानाच पावसाचे पुनर्रागमन झाल्याने जिल्ह्यातील धरण साखळीतील धरणे भरली आहेत. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
दौडमधून भीमानदीत 42 हजार 884 क्‍युसेक विसर्ग होत आहे, त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला असून धरण 95 टक्के भरताच पुढे सोलापुच्या दिशेने पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
जुलै महिन्यांत उजनी धरण 43 टक्‍क्‍यांवर स्थिरावले होते आणि पुणे जिल्हा परिसरातही पावसाने ओढ दिली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून भीमा खोऱ्यासह, लाभक्षेत्रात पावसाने जोरदार कमबॅक केल्याने धरण साखळीतील सर्व धरणे भरली आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व धरणांतून विसर्ग वाढविला जात असल्याने उजनी धरणात पाणी वेगाने जमा होत आहे.
उजनी मध्ये पाणी येत असून, पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करत असल्याने आज सायंकाळ नंतर उजनीतून भिमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येण्याची शक्‍यता आहे. दुपारी 12 वाजल्यापासून उजनीतून पाच हजार क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असल्याची माहिती अधीक्षक अभियंता शिवाजीराव चौगले यांनी दिली. त्यात भिमा सिना जोड कालव्यातून 800 क्‍युसेक्‍स, वीज निर्मितीसाठी 1 हजार 600 क्‍युसेक्‍स तर उजनी कालव्यातून 2 हजार 500 असे एकूण 5 हजार क्‍युसेक्‍स पाण्याचा विसर्ग धरणातून सोडण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)