उजनी पाणलोट क्षेत्रात 1972 ची पुनरावृत्ती

भिगवण : पुणे आणि सोलापूर जिल्ह्याची शेतकरी आणि नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणीसाठा घटू लागला आहे. त्यामुळे 1972 च्या दुष्काळाच्या पुनरावृतीचे ढग दाटून आले आहे. या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडणार आहे. शेती आणि मच्छिमार व्यवसाय धोक्‍यात आला आहे. उजनीच्या कार्यक्षेत्रात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेग प्रशासनावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
गेल्या महिन्यापासून सोलापुरसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील उजनी काठच्या चार तालुक्‍यांतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ लवकरच येणार आहे. पाणी सोलापूर जिल्ह्याला पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटू लागले आहेत. धरणातील पाणीही नदीपात्रात खोलवर गेल्याने उजनी काठच्या गावांना “धरण उशाला, कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरच टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस काहीच झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न होत आहे.
पुणे धरण साखळीतही पुरेसा पाणीसाठा नसल्याने या धरणातही अपुरा पाणीसाठा आहे. त्यामुळे वरील धरणांवर अवलंबून असणारे उजनी धरणातील पाणीसाठा मृतसाठाच्या जवळ आला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाणी पेटणार आहे. उजनी धरणात पाणीसाठा कमी झाल्याने उजनी पाणलोट क्षेत्रातील हातातोंडाला आलेली पिके जळून जाण्याचे मार्गावर आहेत. तर उभी पिके जगविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दररोज किमान 20 फूट पाणी खाली सरकत असल्याने रोजच पाईप वाढविणे, वायर वाढविणे, विद्युत पंप उचलून खाली सरकवणे, आदी कामे करण्यासाठी वेगळे मजुर शेतकऱ्यांना शोधावे लागत आहेत. एकतर उजनी धरणात यावर्षी भरपूर पाणीसाठा होता. त्यातच सोलापुरकरांसाठी पाणी सोडल्याने धरणातील पाणीसाठा फारच कमी झाला आहे. कमी पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांवर जलसंकट उभे राहिले आहे. हे संकट कमी की काय म्हणून आता उजनीकाठच्या शेतकऱ्यांवर लवकरच वीज संकट घोंगावणार आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येऊन ठेपले आहे. या दुहेरी संकटामुळे उजनी काठच्या शेतकऱ्यांवर 1975 पूर्वीचा काळ येणार आहे. सन 1972 मध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता. मात्र, आता पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यात उजनीचे पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही. उजनी काठच्या शेतकऱ्यांचे हक्‍काचे पाणी सोलापुरकरांसाठी सोडल्याने कुठेतरी दिसणारे पाणीही आता पार नदीपात्रात खोलवर दिसू लागले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उभा राहू लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात जर पाण्याची इतकी वाईट परिस्थिती झाली असेल तर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जलसंकटाबरोबर वीजसंकटही येण्याची भीती धरणग्रस्त शेतकऱ्यांना वाटत आहे. इंदापूर तालुक्‍याची पाण्याअभावी दुष्काळाचे दिशेने वाटचाल सुरू झाली असून लवकर तालुक्‍यात टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.

  • गुलाबी थंडीत पाणीटंचाईची झळ
    ऐन हिवाळ्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. आतापर्यंत नोंव्हेबर महिन्यातच पाणीटंचाई आवासून उभी आहे. त्यात प्रशासनाच्या तोकड्या उपाययोजना करीत असल्यामुळे नागरिकांना ऐन थंडीत घाम फुटला आहे. प्रशासनाकडे मिनतवाऱ्या करीत टॅंकरसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यंदाच्या दुष्काळात 1972 मधील आठवणी यानिमित्ताने जाग्या झाल्या आहेत. उजनी निर्मितीपासून सुजलाम सुफलाम झालेला हा परिसर यंदा दुष्काळाच्या मरणकळा सोसाव्या लागत आहेत. उजनी कार्यक्षेत्रातील शेतकरी आता दुष्काळाने पिचला आहे. त्यामुळे अजून सात महिने या मरणकळा सोसाव्या लागत आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)