उजनी जलाशयात दोन मगरी?

इंदापूर -उजनी जलाशयात मच्छीमारांना मगरीचे वास्तव्य असल्याचे समोर येत आहे. मगरीस उजनी जलाशयात पाहिल्याचा दावा मच्छिमारांनी केला असून उजनीच्या मत्स्यबीज केंद्रातही मगर दिसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मच्छिमारांसह उजनी काठच्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

उजनी नेहमीच चर्चेत राहिले आहे ते सातासमुद्रापार येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांमुळे, तर कधी पाणी प्रश्नांमुळे, तर कधी काळे सोने समजल्या जाणाऱ्या वाळू उपशामुळे. पण सध्या उजनीच्या पाणलोट क्षेत्रात भीतीदायक म्हणजे उजनीत मच्छिमारांना दिसलेल्या पाण्यातील मगरीबाबत प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. भीमानगर व कांदलगाव परिसरात मगर दिसल्याचा दावा करण्यात येत आहे.

काही दिवसांपासून उजनीत मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना दोन मगरी पाण्यात आढळून आल्या आहेत. त्यातील एक मगर ही उजनी जलाशयात दिसून आलेली आहे. तर दुसरी उजनीच्या मत्सबीज केंद्रात तेथील अधिकाऱ्यांना दिसली आहे. यामुळे भयभीत झालेल्या मत्सबीज केंद्रातील अधिकाऱ्यांनी इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मगरीचा बंदोबस्त करण्याचे लेखी पत्र दिले आहे. मगरीच्या भीतीमुळे मत्स्यबीज केंद्रातील प्रजनक मासोळी काढता येत नसल्याने सध्याच्या प्रजनन हंगामावर परिणाम होत आहे. त्यामुळे या मगरीचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील अधिकारी सहायक मत्स्य अधिकारी राजेंद्र राठोड यांनी केली आहे.

या मगरी ने अद्याप तरी कोणावर हल्ला किंवा जीवितहानी केल्याचे आढळून आले नसले तरी भविष्यात प्राणघातक हल्ला होण्याच्या भीतीने मच्छिमार भयभीत झाले आहेत. नदीकाठी वीजपंप सुरू करायला जाणारे शेतकरीदेखील भयभीत झाल्याचे मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोई यांनी सांगितले. त्यासंदर्भात वन अधिकाऱ्यांनी मत्सबीज केंद्रात जाऊन पाहिले असता. त्यांनाही या भागात मगर असल्याचे जाणवले असून उजनी पाणलोट क्षेत्रात मगरीचे अस्तित्व दिसून आल्याने मच्छिमारांना व नदीकाठच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या लोकांना मगरीपासून धोका आहे. त्यामुळे लोकांना सावधानतेचा इशारा वन खात्याने दिला आहे.

आतापर्यंत मगरीमुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची चर्चा नाही, मात्र भविष्यात जीवितहानी होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)