उजनीच्या पाण्याचा वाद पेटणार?

हक्काचे पाणी न्याय्य पद्धतीने देण्याची सोलापुरातून मागणी

बिजवडी – उजनीच्या पाण्याचे समान व न्याय्य पद्धतीने वाटप करण्याची मागणी इंदापूरसह दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्‍यातील शेतकऱ्यांनीही निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे पाण्याचा वाद यंदाही उफाळण्याची चिन्हे आहेत.

उजनी धरणातून दरवर्षी उन्हाळ्यात आवर्तन निहाय पाणी सोडण्यात येते. यावर्षी तर इंदापूर तालुका दुष्काळी म्हणूनच जाहीर झाला आहे. अशा स्थितीत उजनीतील पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. त्यातच ऐनवेळी सोडण्यात आलेले पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावर्ती भागात असलेल्या भीमा-सीना काठावरील गावांना मिळत नाही. चालू वर्षी सोलापुरातही पाऊस झालेला नसल्याने पाण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे येथे खडकवासला कालवा फुटणे तसेच पुणे शहरातून होणारी वाढीव मागणी या पार्श्‍वभूमीवर उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाहही कमी झाला आहे. पुणे शहर तसेच तालुक्‍यांना जसे हक्काचे पाणी मिळते तसेच उजनीच्या हक्काचे पाणी सोलापूरकरांना मिळावे, अशी तेथील शेतकऱ्यांची मागणी आहे. खोरेनिहाय समान पाणी वाटपाच्या नियमांनुसार उजनी धरणातील पाण्यावर भीमा नदीच्या खोऱ्यातील सर्वच नागरिकांचा समान अधिकार आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा आणि सीना नदी काठांवरील गावांत जलसिंचनासाठी उजनीच्या पाण्याचा वापर होतो. त्यासाठी या दोन्ही नद्यांवर पाणीसाठवण बंधारे बांधण्यात आले आहेत. टंचाई काळात हे बंधारे टेल टू हेड भरण्याचा नियम आहे. पण, उजनीतून पाणी सुटले की ते वरून खाली भरत येतात. त्यामुळे शेवटच्या तालुक्‍यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही.

सोलापूरला पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून पाणी दक्षिण सोलापूरपर्यंत येते मात्र ते अक्कलकोट तालुक्‍यात पुरेशा प्रमाणात दिले जात नाही. त्यामुळे कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या या तालुक्‍यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. जलसंपदाचे पाणी बिल भरूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. महाराष्ट्‍रर सरकारच्या या उपेक्षेच्या धोरणामुळे पाणी मिळत नसल्याने आम्ही महाराष्ट्रात राहतो का कर्नाटकात? असा संतप्त सवाल येथील शेतकरी विचारत आहेत.

पाण्याचे असेही राजकारण…
खोरेनिहाय पाणी वाटपाच्या नियमानुसार भीमा-सीना नद्यांवरील बंधाऱ्यात हे पाणी पायथा ते माथा भरायला पाहिजे. मात्र, राजकीय प्राबल्य आणि धरणाच्या जवळ असणारे लोकप्रतिनिधी आपले राजकीय वजन खर्ची घालून वापरून पाणी उलट्या दिशेने हेड टू टेल भरुन उरलेले पाणी खाली सोडून देतात. त्यामुळे शेवटच्या तालुक्‍यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे हे शेतकरी त्रस्त आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)