उजनीच्या पाण्याचा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार

सोलापुरात सोडल्याने इंदापुर तालुक्‍याला मोठी झळ; 10 टीएमसी हक्काचे पाणी

पळसदेव- उजनी धरणातील पाण्याचा मुद्दा आगामी निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. धरण पूर्णपणे भरले होते; त्यामुळे यंदा पाणीटंचाई जाणवणार नाही, असा समज शेतकऱ्यांचा होता. मात्र, कारखानदारी तसेच राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे धरणातील पाणी सोलापुरात गेले आहे. राजकीय नेत्यांच्या साटेलोटेपणामुळे जानेवारीतच इंदापूरला दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. धरणातील पाण्याच्या ढिसाळ नियोजनामुळे तालुक्‍यात ऊस क्षेत्रात 30 ते 35 टक्के घट झाली आहे. याचा परीणाम तालुक्‍याच्या अर्थकारणावर होत आहे. सध्या, उजनी धरणात -11.5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्याचे योग्य नियोजन होणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर पावसाळ्यापर्यंत दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होतील.
राज्य सरकारने दुष्काळी यादी जाहीर केली त्यात इंदापुर तालुक्‍याचाही समावेश असताना तालुक्‍याला वरील धरणातून कालव्यांद्वारे मिळणाऱ्या आवर्तनातही कपात करण्यात आली आहे. त्यातच उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन फसल्याने इंदापुराला यंदा धरणातील पाणी मिळणार नसल्याचे चिन्हे आहेत. यामुळे तालुक्‍यासाठी उजनीतील 10 टीएमसी पाणी कायमस्वरुपी आरक्षीत ठेवण्यासाठी न्यायालयीन लढाई लढवण्याच्या हालचालींना आणखी वेग येणार आहे. यासंदर्भात तालुक्‍यातील काही संघटना, सोसायट्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय मंडळी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी टोकाची भुमीका घेत आहेत; हीच राजकीय मंडळी उजनीच्या पाणी नियोजनास अधिकाऱ्यांना जबाबदार धरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलने करुन पाणी मिळविण्याचा प्रयत्न सोलापुरातून होत असतो. मात्र, धरणासाठी जमिनी सोडलेल्या भुमीपुत्रांची पाण्यासाठी उपेक्षा कायमच ठरलेली आहे. पिण्यासाठी पाणी, असे कारण दाखवून अनेकवेळा वीजपुरवठा खंडीत केला जातो तर काही ठिकाणी भारनियमात वाढ करून शेतकऱ्यांना वेठीस धरले जाते. या प्रकारांमुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांत नाराजीची भावना आहे.

  • शेतकऱ्यांपुढे कर्जफेडीचा प्रश्‍न…
    इंदापूर तालुक्‍यात पाणी टंचाईमुळे फळबागा तसेच उसाचे मिळून यावर्षी कोट्यवधी रूपयांचे नुकसान होईल, असा प्राथमिक अंदाज कृषि विभागासह कारखान्यांकडील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे यंदा बॅंकांची कर्जफेड कशी करायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. पाण्यासारख्या विषयाचे गांभीर्य नसल्याने दुष्काळात जगणे कठीण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भविष्यात पाण्याची स्थिती गंभीर होवू नये याकरिता पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)