माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ; धरण पुणे जिल्ह्यात आणि नियोजन सोलापुरातून कशासाठीचा सवाल
रेडा- उजनी धरणातील पाणीसाठा अवघ्या एक महिन्यात 30 टक्के कमी झाला आहे. उजनी धरणातील पाणीसाठा हा पुणे जिल्हात आहे. मात्र, धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. कारभाराची अशी उलटी गंगा कशासाठी? उजनी धरणातील पाण्याचे नियोजन हे विभागीय आयुक्तांनी करावे. या समितीत पुणे व सोलापूरच्या जिल्ह्यधिकाऱ्यांचा समावेश असावा, अशी सूचना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची शिष्टमंडळासह आज भेट घेतली व इंदापूर तालुक्यात दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी चर्चा केली. यावेळी इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने दुष्काळी परिस्थितीसंदर्भात मागणीचे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळामध्ये इंदापूर तालुका कॉंग्रेस कमिटीचे ऍड. कृष्णाजी यादव, माजी सभापती मयूरसिंह पाटील, पं.स.चे सभापती करणसिंह घोलप, उपसभापती देवराज जाधव, भरत शहा, शेखर पाटील, हनुमंत काजळे-पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नगरसेवक कैलास कदम, रघुनाथ राऊत, तानाजी नाईक आदि उपस्थित होते.
इंदापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे सुमारे 35 टॅंकरची मागणी असून त्यामध्ये झगडेवाडी, व्याहळी, वकिलवस्ती येथे तातडीने टॅंकर चालु करणे आवश्यक आहे, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. बावडा नजिकचा शेटफळ तलाव 116 वर्षांत प्रथमच कोरडा पडला आहे. या तलावावर अवलंबून असलेल्या सुमारे 15 गावच्या नळ पाणी पुरवठा योजना बंद आहेत. तसेच वरकुटे खुर्द, सराफवाडी, वडापुरी, अंथुर्णे गावातील तलावावर अवलंबून असलेल्या पाण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडू लागल्या आहेत. खडकवासला कालव्यावरील सर्व तलाव कोरडे असल्याने या तलावावर अवलंबून नळ पाणी पुरवठा योजन्या देखील बंद पडत चालल्या आहेत. इंदापूर तालुक्यात पाऊस कमी झाल्याने व निरा डावा आणि खडकवासला कालव्याच्या शेतीसाठीच्या पाण्याचे योग्य नियोजन न करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निरा डावा व खडकवासला कालव्यातून पाणी सोडून सर्व तलाव भरून द्यावेत, शेटफळ तलावात पाणी सोडावे, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, वीज बील माफ करावे, सक्तीची पिक कर्ज वसूली थांबवावी, चारा छावण्या सुरू कराव्यात आदि मागण्या यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.
बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी गठीत करण्यात आली आहे. यामध्ये तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आदि अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. इंदापूर तहसिलमध्ये प्रत्येक बुधवारी कमिटीची बैठक होऊन दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात निर्णय दिले जातील, असे यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नमूद केले. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा