उच्च शिक्षण घेऊन महाविद्यालयाचे नाव उंचवा

नगर – “पेमराज सारडा महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग उच्चशिक्षित आहेत. सर्व प्राध्यापक मंडळी आपल्याकडील ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यास कायम तत्पर असतात. महाविद्यालयात सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा 11 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ, डॉक्‍टर, इंजिनिअर व्हायचं आहे त्यांनी या सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांचा लाभ घ्यावा. महाविद्यालयातील पोषक वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अत्यंत सोपे होते. महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन स्वत:बरोबरच महाविद्यालयाचे नाव उंच करा,” असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक यांनी केले.

पेमराज सारडा महाविद्यालयात 11 वी मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे देऊन स्वागताबरोबरच खास म्युझिक थेअरपीनेही विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, महाविद्यालयाचे चेअरमन ऍड. अनंत फडणीस, महाविद्यालयाच्या प्राचार्या अमरजा रेखी, उपप्राचार्या सुजाता काळे, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यवेक्षक डी. एन. जाधव, सुदर्शन टीव्हीचे प्रा. सचिन राऊत, आदींसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व मोठ्या संख्येने नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.
सारडा महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग विद्यार्थ्यांना मोठ्या आत्मियतेने व तळमळीने शिकवत आहेत. त्यामुळे सारडा महाविद्यालयात शिक्षण घेताना बाहेरच्या खासगी क्‍लासची गरज भासत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, तसेच आपल्या भारतमातेप्रती अभिमान बाळगावा, असे ब्रिजलाल सारडा यांनी सांगितले.

सारडा महाविद्यालय हे डॉक्‍टरांचे महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील 90 टक्के प्राध्यापक हे पी.एचडी. झालेले आहेत. विद्यार्थ्यांना आपले उच्च शिक्षणाचे ध्येय गाठण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग सर्वतोपरी मार्गदर्शन करत आहेत. विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेताना कायम सकारात्मक विचार करावा; तुम्हाला यश नक्की मिळेल. खऱ्या अर्थाने महाविद्यालयीन जीवनाचा आनंद विद्यार्थ्यांना सारडा महाविद्यालयातून मिळतो, असे ऍड. अनंत फडणीस यांनी सांगितले.

सुदर्शन टीव्हीचे प्रा. सचिन राऊत यांनी विद्यार्थ्यांना चिनी वस्तू न वापरता आपल्या भारतीय वस्तू वापरण्यास प्राधान्य द्या, असे आवाहन करून चीनकडून होत असलेल्या अतिक्रमणाबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अमरजा रेखी यांनी केले, तर आभार डॉ. स्मिता भुसे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद बेडेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)