‘उघड्यावर’ बसाल, तर ‘लालपरी’ला मुकाल

महामंडळाची तंबी, “त्या’ गावाची एसटी होणार बंद


31 मार्चची डेडलाइन, 1 एप्रिलपासून अंमलबजावणी

पुणे – स्वच्छ भारत अभियानाला आता एसटी महामंडळही हातभार लावणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ज्या गावातील नागरिक “उघड्यावर’ बसतील, त्या गावातील एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी खास पथक या गावांची पाहणी करणार आहेत. याचा फटका राज्यातील दीड हजारांवर गावांना बसण्याचा अंदाज आहे.

उघड्यावर बसल्याने रोगराईला आमत्रंण मिळते. हे थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नागरिकांच्यावर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याशिवाय जालिम उपाय म्हणून त्यांची मतदान ओळखपत्रे, आधारकार्ड आणि रेशनकार्डेही रद्द करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच राज्य आणि केंद्र शासनाच्या या मोहिमेस हातभार लागावा, नागरिकांना स्वच्छतेबद्दल जागृत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यापुढील कालावधीत या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असा इशारा एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी “प्रभात’ शी बोलताना दिला.

अशी आहे आकडेवारी…!
एसटी बसेस – 19 हजार 500
डेपोंची संख्या – 254
वाहक, चालक – 1 लाख 4 हजार
दुर्गम भाग आणि खेड्यांमध्ये मुक्कामी थांबणाऱ्या बसेस – 3 हजार 500
दुर्गम भागांत मुक्कामी थांबणाऱ्या वाहक आणि चालकांची संख्या – 6 हजार 500

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाहक, चालकांसाठी शौचालये बांधा, अन्यथा…!
ग्रामीण अथवा दुर्गम भागात मुक्कामी राहणाऱ्या वाहक आणि चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या कर्मचाऱ्यांनी त्यांची कैफियत संबंधित आगार प्रमुखांकडे मांडली होती. याची राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर रावते यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार त्या त्या ग्रामपंचायतींनी एसटीचे वाहक आणि चालकांसाठी शौचालये बंधनकारक करण्यात आले असून महामंडळाच्या वतीने त्यांना तशी पत्रे देण्यात आली आहेत. त्यासंदर्भात योग्यवेळी निर्णय न झाल्यास मुक्कामी बसेसचा विचार करावा लागेल, असा इशाराही रावते यांनी दिला आहे.

राज्य शासन आणि महामंडळाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रोगराईला मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय संबंधित गावांनी शौचालये बांधल्यास वाहक आणि चालकांनाही त्याचा फायदाच होणार आहे.
– उल्हास बढे, स्वारगेट डेपो सचिव, एसटी कामगार सेना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)