उकाडा त्यात वीज गुल!

पिंपरी – दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणने गुरुवारी (दि. 26) शहरातील विविध भागात पाच ते सात तास “शट डाऊन’ घेतले. त्यातच तापमानाचा पारा चाळीशीकडे झुकल्याने नागरिकांचे अक्षरशः बेहाल झाले.

उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढल्याने शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. दिवसा वीज गेल्यानंतर कसाबसा दिवस ढकलणाऱ्या नागरिकांना रात्री-अपरात्री वीज गुल झाल्यास समाधानकारक झोपही मिळत नाही. मागील तीन दिवसांपासून तापमानाने 39 अंश सेल्सियसच्या पुढे झेप घेतली आहे. आजही पारा चाळीशीच्या जवळ पोहचला. त्यातच महावितरणकडून दुरुस्तीच्या कामासाठी वीज पुरवठा पाच ते सात तास बंद ठेवला. अनेक तास वीज बंद असल्याने कामांचा खोळंबा झाला.

अनेक तास नागरिकांना असह्य उकाड्‌याचा सामना करावा लागला. सूर्य कोपला त्यात महावितरणनेही साथ सोडल्याने दिवस कसा ढकलायचा असा सवाल शहरवासियांपुढे निर्माण झाला होता. संध्याकाळी निदान ऊन उतरल्यानंतर तापमानाचा पारा कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने रात्री उशिरापर्यंत उकाडा कायम होता. विशेष म्हणजे काही भागातील विद्युत पुरवठा रात्रीही सुरळीत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. महिला वर्गाचा घरातील कामांचा खोळंबा झाला. महावितरणने वीज बंद ठेवली असताना महापालिकेनेही दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवल्याने वीजही नाही आणि पाणीही नाही, अशी अवस्था नागरिकांची झाली होती.

शीतपेयाला गरमीची धग
वीजेच्या “शट डाऊन’मुळे शहरातील बहुसंख्य रसवंतीगृह बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. जनरेटरची सोय नसलेली शीतपेयाची दुकाने, आईस्क्रिम पार्लर बंद होते. अनेक तास वीज पुरवठा बंद राहिल्याने काही वेळाने जनरेटरही ठप्प झाले. त्यामुळे नागरिकांना गारव्यासाठी शीतपेयाचाही आधार मिळू शकला नाही. परिणामी थंडावा म्हणून कलिंगड खाण्याकडे नागरिकांची पावले वळाल्याचे पहायला मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)