उकडीचे मोदक करून बाप्पांचे केले स्वागत

गायिका सावनी रविंद्र : गणरायाची स्वतः केली प्रतिष्ठापना

पिंपरी – सुप्रसिद्ध गायिका सावनी रविंद्र हिने खास गणपती बाप्पाचे स्वागत उकडीचे मोदक तयार करून केले. सध्या गायनाच्या विविध कार्यक्रमांत व्यस्त असतानाही सावनी खास आपल्या लाडक्‍या बाप्पावर श्रद्धा
असल्याने गणरायाच्या आगमनाला हजेरी लावून स्वतःच्या हाताने गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली.

चिंचवडगावातील महासाधू मोरया गोसावी यांच्यावर लहानपणापासूनच श्रद्धा असल्याने सावनी गणेशाचे आगमन आनंदोत्सवात करते. तसेच गणेश या देवतेबद्दल श्रद्धा व आत्मीयता सावनीला आहे. त्यामुळे कितीही गाण्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असले तरी देखील सावनी आवर्जून गणरायाच्या आगमनाला हजेरी लावते. सावनीला स्वयंपाकाचीही विशेष गोडी असल्याने दरवर्षी काहीतरी वेगळे करण्याचा हट्ट सावनीचा असतो. वर्षानुवर्षे वडीलोपार्जित गणपती स्थापनेची परंपरा रविंद्र यांच्या कुटुंबात पुढे देखील सुरूच आहे.

सावनीचा “अनपल्गड’ हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम विशेष गाजत आहे. भारतभर हा कार्यक्रम हिट ठरल्याने सावनी सध्या खुशीत आहे. हा कार्यक्रम प्रथमच मराठीत येत आहे. तसेच विविध कार्यक्रमांमध्ये पार्श्‍वगायन तसेच विविध मालिकांमध्ये टायटल सॉंग सावनीने गायले आहेत. गणपती उत्सवानंतर काही गाणी प्रसिद्ध होणार आहेत. तसेच “घाडगे अँड सून’ हे “टायटल सॉंग’ सावनीने गायले आहे. “डॉ. रखमाबाई’ यामध्ये देखील गायनाचे काम तिने केले आहे. तसेच प्रियंका चोप्राच्या एका चित्रपटात “आयटम सॉंग’ तिने गायले आहे.

बऱ्याच दिवसांनी कुटुंबात एकत्र आल्याने सावनीच्या घरात आनंदमयी वातावरण आहे. वडील रविंद्र, आई वंदना यांनी देखील सावनी गणेशोत्सवाला आल्याने घरात आनंदी वातावरण असल्याचे सांगितले. गणेशोत्सवानिमित्त दोन दिवसासाठी आलेल्या सावनीला पिंपरी-चिंचवडमध्येही विविध ठिकाणी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते तसेच लालबागच्या राजालाही दरवर्षी गाण्याचा व दर्शनाचा मान सावनीला मिळतो. मुंबई व पुण्यामध्ये सध्या सावनीला गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी गाण्यांच्या विशेष कार्यक्रमांना बोलाविण्यात आले होते. दगडूशेठच्या कार्यक्रमालाही सावनीने हजेरी लावली होती. गणपती बाप्पाने भरभरून दिल्याने सध्यातरी गणरायाकडे विशेष काही मागणी नाही. एकामागोमाग एक सध्या कार्यक्रम सुरू असल्याने मी आनंदी असल्याचे सावनी रविंद्रने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)