उंबर्डे कुस्ती मैदानात सेनादलाच्या संग्राम पाटीलची चमक

वडूज – उंबर्डे (ता. खटाव) येथील ग्रामदैवत श्रीबाळुंबाई व श्रीसिध्दनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या जंगी मैदानास पश्‍चिम महाराष्ट्रातील नामवंत मल्ल व कुस्ती शौकिनांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या मैदानात गंगावेश तालमीचा सिकंदर शेख व पुणे मिल्ट्री चॅम्पीयन संग्राम पाटील यांच्यातील द्वितीय क्रमांकाची कुस्ती रंगतदार झाली.

कुस्तीत सेनादलाच्या संग्रामने पोकळ घिस्सा लावत सिकंदर शेखला चितपट करत मोराळे मैदानावर झालेल्या पराभवाची परतफेड केली. कुस्तीतील मल्लांना सुरेशबापू पवार व बाबासाहेब पवार यांच्या वतीने दीड लाखाचे इनाम देण्यात आले. प्रथम क्रमांकाची गंगावेश तालमीचा माऊली जमदाडे व डबल हरियाणा केसरी मंजित खत्री यांच्यातील 2 लाख इनामाची कुस्ती बराच वेळ रेंगाळल्याने बरोबरीत सोडवण्यात आली.

नागाचे कुमठेचा मोठा पांडुरंग मांडवे याने दिल्ली तालमीचा नवीनकुमारवर मात करत तृतीय क्रमांकाची कुस्ती जिंकली. मोतिबाग तालमीचा अविनाश पाटीलने भोसले व्यायामशाळेच्या प्रशांत शिंदेला नमवत चतुर्थ क्रमांकाचे 75 हजार इनामाचे बक्षीस जिंकले. शरद पवार पारगांव विरुध्द संभाजी कळसे कुंडल यांच्यातील कुस्ती बराच वेळ रखडण्याबरोबर दोन्ही मल्लांमध्ये झालेल्या वादामुळे रद्द करण्यात आली.

मुंबई उच्च न्यायालयातील ऍड. रामचंद्र पवार व माण-खटाव विधानसभा भाजपा महिला आघाडी अध्यक्षा ऍड. अनिता पवार यांच्या वतीने सहा महिला कुस्त्या जोडण्यात आल्या होत्या. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. आर्वीच्या स्मृती येवलेने प्रगती गायकवाडला चितपट करत प्रथम क्रमांकाचे इनाम जिंकले. आ. जयकुमार गोरे, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, सुरेंद्रदादा गुदगे, संदिप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, हिंदुराव गोडसे, दिलीप पवार, नंदकुमार विभुते, पै. धनाजी फडतरे आदिंसह मान्यवरांनी मैदानास भेट देवून संयोजकांचे कौतुक केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)