उंडाळेत धुमस्टाईल दुचाकीस्वारांचा उच्छाद

उंडाळे, दि. 12 (वार्ताहर) -उंडाळे बसस्थानक व क्रांती चौक परिसरात धुमस्टाईल दुचाकीस्वारांनी उच्छाद मांडला असून पादचारी जीव मुठीत घेवून चालत आहेत.
उंडाळे गाव बाजारपेठ व शैक्षणिक सुविधांमुळे नावारुपाला येत आहे. उंडाळ्यात केजी पासून पदवी पर्यंत शिक्षण, वैद्यकीय सुविधा, राष्ट्रीयकृत बँक, पतसंस्था, व्यापारी पेठ, विविध क्लासेस, वाहतुकीची सुविधा आदी सोयीसुविधा उपलब्ध असल्यामुळे पाचवडफाटा ते शेडगेवाडी पर्यंतचे हजारो लोक उंडाळ्यात येत असतात. यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, रुग्ण, शेतकरी यांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे बसस्थानक परिसर व क्रांती चौक नेहमी गर्दीने गजबजलेला असतो. सकाळी 9 ते 12 ही गर्दी लक्षणीय असते. यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होत असते. तर उच्च माध्यमिक शाळा सुटत असते. यातच अधूनमधून येणार्‍या बसेस, खाजगी वाहने, ट्रक यामुळे रस्त्यावर वर्दळ असते. या सर्वातून पादचार्‍यांना मार्ग काढत जावे लागते. अशाच वेळी विना सायलेन्सरच्या दुचाकी भरधाव वेगाने हॉर्न वाजवत युवकांकडून बिनदास्तपणे चालवल्या जातात. याचा नाहक त्रास लहान मुले, युवती, वयस्कर लोकांना होत असतो. एखाद्या वेळी अशा सुसाट येणार्‍या वाहनाचा ताबा सुटला तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करुन पोलिस यंत्रणेने अशा युवकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)