उंडाळकर गटाकडून निवडणुकीची तयारी?

मलकापूरच्या राजकारणात ट्विस्ट, सत्ताधार्‍यांच्या तंबूत खळबळ
सुधीर पाटील
कराड, दि. 2 – जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी (बुधवारी) राजकीय घडामोड झाली. सत्ताधारी गटाचे नेते मनोहर शिंदे आणि उंडाळकर गटात उमेदवारीवरून मतभेद झाले. त्यानंतर उंडाळकर गटाने उमेदवारांच्या जुळवाजुळवीसाठी हालचाली सुरू करताच शिंदे-उंडाळकर गटातील समन्वयकांची तातडीची झाली. मात्र, तोडगा न निघाल्याने उंडाळकर गट स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला लागला आहे. तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक इच्छूकही सत्ताधार्यांवर नाराज असल्याचे समजते. यामुळे ऐन रणधुमाळीत सत्ताधार्यांच्या तंबूत खळबळ उडाली आहे.
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सत्ताधारी मनोहर शिंदे, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर आणि राष्ट्रवादी गटाने एकत्रित येण्याचा समझोता झाला होता. यासंदर्भात गेल्या दोन महिन्यापासून चर्चेच्या फेर्या सुरू होत्या. त्यासाठी तिन्ही गटांचे समन्वयक कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून राजकीय निरोपांची देवाण-घेवाण सुरू होती. उंडाळकर गट आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा देण्यावर एकमत झाले होते. तसेच सत्ता आल्यानंतर उंडाळकर गटाचा आणखी एक जण स्वीकृत नगरसेवक म्हणून घेण्याचे ठरले होते. असे असताना उंडाळकर गटाला दोन्ही महिला उमेदवार्‍यांच देण्याचा सूर सत्ताधारी गटाने आळविला. तसेच मलकापूरच्या राजकारणात राष्ट्रवादीचा चेहरा असणार्‍याच्या उमेदवारीलाही सत्ताधारी गटाने वेगळ्या पध्दतीने खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. त्या मातब्बरामध्ये आणि त्याच वॉर्डातील राष्ट्रवादीकडून इच्छुक असणार्‍या अन्य दोघांमध्ये वात पेटवून दिल्याचेही समजते. सत्ताधार्‍यांच्या या खेळीमुळे उंडाळकर गट आणि राष्ट्रवादी गट संतप्त आहे. भाजप आक्रमकपणे आणि सर्व तयारीनिशी चाल करत असताना सत्ताधारी सहयोगी गटांची नाराजी ओढवून घेत असल्याने मलकापूरचे रणांगण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

समीकरण जुळणार की निवडणूक तिरंगी होणार ?
मतांची फाटाफूट भाजपच्या पथ्यावर पडू नये, म्हणून समविचारी गटांनी एकत्र येण्याचा निर्णय झाला. तथापि, सत्ताधारी गट सहयोगी गटांचे उमेदवार मान्य करेना. उंडाळकर गटाने दोन्ही महिला उमेदवारच द्यावेत, असे त्यांचे म्हणणे आहे, त राष्ट्रवादीतून दावेदार असणार्‍या उमेदवाराच्या वॉर्डातही राष्ट्रवादीतील अन्य इच्छुकांना उठवून बसविण्यात आले आहे. त्यामुळे आता हा तिढा सुटणार की निवडणूक तिरंगी होणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

..तर कराड तालुका विकास आघाडीचा पर्याय?
सत्ताधार्यांनी उंडाळकर गट आणि राष्ट्रवादी गटाबरोबर योग्यरित्या समझोता न केल्यास आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वास मान्य झाल्यास उंडाळकर गट आणि राष्ट्रवादी गट कराड तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून मलकापूरची निवडणूक लढवू शकतात. असा प्रयत्न होणार असेल, तर दोन्ही गट सर्व जागांवर चांगले चेहरे उभे करू शकतील आणि निवडणुकीतील चुरसही वाढवू शकतील. मात्र, मतांचे होणारे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडल्यास सत्ताधार्यांसाठी तो मोठा राजकीय धक्का असेल. त्या धक्क्याची तीव्रता निकालानंतरच सत्ताधार्‍यांच्या लक्षात येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)