ई-बस किफायतीच!

1,225 रुपयांत धावते 225 किलोमीटर अंतर


चाचणीदरम्यानचा निष्कर्ष : इतर इंधनांच्या तुलनेत अत्यल्प खर्च

पुणे – ताफ्यात दाखल होऊ घातलेल्या इलेक्‍ट्रिक बसेस पीएमपीला फायद्याच्या ठरण्याचा अंदाज आहे. एका शिफ्टमध्ये एक बस साधारण 200 किलोमीटर धावत असून यासाठी डिझेल बससाठी साडेचार हजार, तर सीएनजी बसला सरासरी साडेतीन हजार रुपयांचा खर्च लागतो. मात्र, याचवेळी ई-बसला 225 किलोमीटरसाठी 175 युनिट खर्च होत असल्याचे केलेल्या चाचणीदरम्यान समोर आले आहे. इलेक्‍टिक बसेसला प्रोत्साहन म्हणून स्वस्तात वीजदर पुरवण्यात येणार असून सरासरी 7 रुपये युनिटप्रमाणे 225 कि.मी. साठी केवळ 1 हजार 225 रुपये खर्च लागणार असल्याने येऊ घातलेल्या बसेस किफायतशीर असल्याचे दिसून येते.

शहरात गेल्या आठवड्यात पाच दिवस गर्दीच्या, कमी रुंदीच्या आणि चढावरील रस्त्यांवर ई-बसची चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान 3 हजार किलो वजनाचे पोते टाकून मार्गावरील प्रत्येक स्टॉपवर बस थांबवण्यात आली. चाचणीत ई-बसचा “परफॉर्मन्स’ तपासण्यात येत असून परिक्षणादरम्यान मायलेजसाठी ई- बस फायदेशीर ठरत असल्याचे समोर आले आहे.

ई-बसची बॅटरी पूर्ण भरण्यासाठी 175 युनिट वीज खर्च झाली. इलेक्‍ट्रिक बसेसला प्रोत्साहन म्हणून महावितरणकडून 7 रुपये प्रतियुनिट वीज पुरवली जाते. एकूणच 175 युनिटसाठी 1,225 रुपयांची वीज खर्च झाली असून यामध्ये तब्बल 225 किलोमीटर पीएमपी धावल्याची नोंद करण्यात आली आहे. या तुलनेत डिझेल बस सरासरी प्रतिलिटर सव्वातीन किलोमीटर धावत असल्याने 200 किलोमीटरसाठी तब्बल 63 लिटर डिझेल लागते. 75 रुपये लिटरने पीएमपीला डिझेल मिळत असल्याने 63 लिटरसाठी येणारा खर्च 4 हजार 725 रुपये एवढा आहे. हीच परिस्थिती सीएनजी बसेसची असून प्रतिकिलोला तीन किलोमीटर ती धावते. यामुळे 200 किलोमीटर सीएनजी बस धावण्यासाठी 67 किलो सीएनजीची आवश्‍यकता आहे. 55 रुपये प्रतिकिलो रुपयाप्रमाणे 67 किलो सीएनजीसाठी 3 हजार 685 रुपये एवढा खर्च येतो. या तुलनेत इलेक्‍ट्रिक बसेसचा खर्च अत्यल्प असल्याने ही बस फायदेशीर ठरणार असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे.

“मेन्टेनन्स’ परवडणार का?
शहरात ई- बसची चाचणी घेण्यात येत असून जानेवारीदरम्यान 25 ई-बसेस शहरात येणार आहे. तर यापुढील काही महिन्यात उर्वरित 125 बसेस येणार आहेत. देशातील कोणत्याही शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस धावत नसून पुणे हे देशातील एकमेव शहर आहे. दरम्यान, यासाठी येणारा खर्च कमी दिसत असला, तरी देखभाल दुरुस्ती-तंत्रज्ञानाची माहिती नसणे यामुळे काही कालावधीनंतर “मेन्टेनन्स’साठी येणारा खर्च किती असू शकतो? याबाबात सध्यातरी सांगता येणार नसल्याची कबुली अधिकारी देत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
16 :thumbsup:
4 :heart:
0 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)