ई-बस इरादापत्राचे राजस्थान ‘कनेक्शन’

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप : सर्वांचेच संगनमत असल्याचा दावा 

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) 25 ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या निविदांना मंजुरी देऊन ठेकेदार कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आहे. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक निवडणुकीच्या कामानिमित्त राजस्थानला असतानाही तातडीने इरादापत्र काढून ते ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यासोबत पाठवून त्यांची स्वाक्षरी घेण्यात आल्याचा धक्कादायक आरोप कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

या प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे नेते, पीएमपीचे अधिकारी, सल्लागार संस्था आणि ठेकेदार कंपनीचे संगनमत असल्याचा आरोपही दोघांनी केला आहे. “पीएमपीएमएल’ ने 500 ई-बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून, त्यामध्ये 475 बस 12 मीटर लांबीच्या तर उर्वरित 25 बस नऊ मीटर लांबीच्या आहेत. त्या घेण्यासाठी ठेकेदार कंपनीला कार्यादेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि तुपे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले आहे.

“ई-बसच्या निविदा प्रक्रियेवर दोन दिवसांपूर्वीच विरोधकांनी आक्षेप नोंदवल्याने तातडीने एक दिवसात इरादापत्र काढण्यात आले. पीएमपीच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे सध्या राजस्थानला निवडणुकीच्या कामावर निरीक्षक म्हणून गेल्या आहेत. ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यासोबत जाऊन त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली.

हे अत्यंत गंभीर प्रकरण असून, त्यामध्ये चोवीस तास पाणी पुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याच्या निविदा प्रकरणाची पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे पीएमपी व पुणे महापालिकेचा आर्थिक कणा मोडून निघेल,’ अशी भीतीही शिंदे, तुपे यांनी व्यक्त केली. संबंधित निविदा प्रक्रियेत एकच ठेकेदार कंपनी पात्र ठरेल, असे निकष केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेने (सीआयआरटी) तयार केले आहेत, तसेच दोन वेळा अभिप्रायही बदलण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेच्या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणीही या दोघांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)