ई-बसमध्ये 20 कोटींचा भ्रष्टाचार

चेतन तुपे यांचा पत्रकार परिषदेद्वारे आरोप

पुणे – ई-बस खरेदीमध्ये 20 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक चेतन तुपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

पीएमपीच्या ताफ्यात पाचशे वातानुकूलित ई-बस भाडेकराराने घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. पहिल्या टप्प्यात दीडशे बसेस घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये नऊ मीटर लांबीच्या 25 बस, तर बारा मीटर लांबीच्या सव्वाशे बसचा समावेश आहे. त्यापैकी नऊ मीटर लांबीच्या बस खरेदीसाठी 18 सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, या प्रक्रियेला प्रथम 17 ऑक्‍टोबर आणि त्यानंतर 25 ऑक्‍टोबरपर्यंत अशी दोनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, 25 ऑक्‍टोबरला पीएमपीचे संकेतस्थळच बंद पडल्याने इतर इच्छुक कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले नाही, असा दावा तुपे यांनी केला आहे.

या निविदा प्रक्रियेत ओलेक्‍ट्रा ही एकच चीनी कंपनी पात्र ठरली असून त्यांनी प्रति किमी 42 रुपये भाडेतत्त्वावर ई-बस देण्याचा प्रस्ताव दिला. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने केलेल्या तडजोडीत हा दर चाळीस रुपये करण्यात आला. मात्र, या कंपनीचे पूर्वाश्रमीचे नाव “गोल्डस्टोन’ असून तिने बेंगळुरू शहरात भाडेतत्त्वावर ई-बस पुरविण्यासाठी प्रति किमी 29 रुपये दराने निविदा भरली आहे. भारत सरकारच्या “इलेक्‍ट्रिक बसेस प्रोक्‍युअरमेंट इन इंडिया- इंडियन सिटीज गॉट द व्हाएबल रेट्‌स’ या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

बेंगळुरूत स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया झाल्याने 29 रुपये आणि पुण्यात निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याने 40 रुपये दर ठरला आहे. त्यामुळे प्रति किमीसाठी पुणेकरांना अकरा रुपये जादाचे मोजावे लागणार आहेत. त्यातून तब्बल 20 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होणार असून, त्यासाठीच हा खटाटोप सुरू असल्याचे तुपे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही “एन्व्हायर्नमेण्ट बस’ नसून भाजपसाठी “इकॉनॉमिक बस’ असल्याची टीकाही तुपे यांनी केली आहे. ज्या ज्या ठिकाणी भाजपचे सरकार आहे, त्या त्या ठिकाणी हे दर जास्त आहेत. जेथे भाजपचे सरकार नाही तेथे मात्र दर कमी असल्याचे तुपे यांनी उदाहरणासह सांगितले.

साडेतीनशे कोटी रुपयांचा फटका बसणार
एक ई-बस दिवसाला 200 किमी म्हणजे महिन्याला सहा हजार किमी, वर्षाला 72 हजार आणि दहा वर्षांत 7 लाख 20 हजार किमी प्रवास करणार आहे. बेंगळुरूच्या तुलनेत पुण्यासाठीचा भाड्याचा दर अकरा रुपये अधिक असल्याने एका बसला 75 लाख रुपये जादाचे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे दीडशे बसेसमागे 110 कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. या हिशोबाने पाचशे ई-बस घेतल्यास जवळपास साडेतीनशे कोटी रुपयांचा फटका बसणार असल्याचा दावा चेतन तुपे यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)