ईशा जोशी, शौनक शिंदे यांना दुहेरी मुकुटाचा मान

जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा
पुणे – गुणवान युवा खेळाडू ईशा जोशीने महिला एकेरीसह मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावताना शारदा स्पोर्टस सेंटर आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तसेच शौनक शिंदेने ज्युनियर मुलांच्या पाठोपाठ युवा मुलांच्या गटांतही विजेतेपद संपादन करताना दुहेरी मुकुट जिंकला. यंदाच्य मोसमातील ही पहिली जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा शारदा स्पोर्टस सेंटर, एरंडवणे येथे पार पडली.

महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत अग्रमानांकित ईशा जोशीने द्वितीय मानांकित सलोना शाहची कडवी झुंज 4-3 अशा फरकाने मोडून काडताना विजेतेपद पटकावले. ईशाने सलोनीचा प्रतिकार 11-7, 7-11, 8-11, 11-6, 11-113, 11-7, 11-7 असा संपुष्टात आणताना या स्पर्धेतील दुसरे विजेतेपद जिंकले. ईशाने याआधी उपेन्द्र मुळ्येच्या साथीत मिश्र दुहेरी गटांत विजेतेपद पटकावले होते. मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ईशा जोशी व उपेन्द्र मुळ्ये या द्वितीय मानांकित जोडीने पूर्वा सोहोनी आणि वैभव दहीभाते या अग्रमानांकित जोडीवर सनसनाटी मात केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युवा मुलांच्या एकेरीतील अग्रमानांकित शौनक शिंदेने तृतीय मानांकित करण कुकरेजाचे आव्हान 11-7, 11-5, 11-7, 11-9 असे सरळ गेममध्ये मोडून काढताना दुहेरी मुकुटाची निश्‍चिती केली. त्याआधी अग्रमानांकित शौनक शिंदेने ज्युनियर मुलांच्या गटातही सहाव्या मानांकित आरुष गलपल्लीचा पराभव करताना या स्पर्धेतील पहिले विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यासाठी त्याला 4-2 अशी कडवी झुंज द्यावी लागली होती.

तत्पूर्वी अनीहा डिसोझा आणि अर्चन आपटे यांनी सबज्युनियर मुली व मुलांच्या एकेरीत विजेतेपद संपादन केले. तसेच राधिका सकपाळ व नील मुळ्ये यांनी कॅडेट मुली व मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले आहे. तर मिडजेट मुली व मुलांच्या एकेरीत नभा किरकोळे आणि स्वरूप भडाळकर यांनी अजिंक्‍यपदाचा मान मिळविला. प्रौढ एकेरीत बिगरमानांकित शेखर काळेने द्वितीय मानांकित दीपेश अभ्यंकरचा 12-10, 11-7, 11-4 असा पराभव करताना विजेतेपदाची निश्‍चिती केली. पुरुष एकेरीत द्वितीय मानांकित वैभव दहीभातेने अग्रमानांकित सनत बोकीलला चकित करताना विजेतेपद जिंकले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस व सिम्बायोसिस स्पाचे संचालक डॉ. सतीश थिगळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्ष स्मिता बोडस व श्रीकांत अंतुरकर, सचिव श्रीराम कोनकर, सीडिंग समिती अध्यक्ष मोहन उचगावकर व शारदा स्पोर्टस सेंटरचे मुख्य प्रशिक्षक सुरेंद्र देशपांडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)