ईव्हीएममधील हेराफेरीमुळेच धुळ्यात भाजपचा विजय : अनिल गोटे

हैदराबाद येथील एका हॅकर्सची मदत घेतल्याचा आरोप

उच्च न्यायालयात केली याचिका दाखल

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई: धुळे महानगरपालिका निवडणुकीत इव्हीएममध्ये केलेल्या हेराफेरीमुळेच भाजपाचा विजय झाला. त्यासाठी हैदराबाद येथील एका हॅकर्सची मदत घेण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट करीत भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर खापर फोडले. याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही गोटे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन धुळे महानगरपालिका निवडणूकीतील भाजपच्या विजयाचा पर्दाफाश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ज्या निवडणुकांचे “मॅनेजमेंट’ करतात त्या ठिकाणी भाजपाला निर्विवाद विजय कसा मिळतो याचे रहस्य आता उघड झाले आहे.

मतदानयंत्रात म्हणजेच ईव्हीएममध्ये हेराफेरी करूनच हे सर्व विजय त्यांनी प्राप्त केले असल्याचा आरोप गोटे यांनी केला. आरोपांच्या पुष्ट्यर्थ त्यांनी काही व्यक्‍तींच्या फोनवरील संभाषणाच्या रेकॉर्डही ऐकून दाखविल्या. धुळे पालिका निवडणुकांचे निकाल गिरीश महाजन यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणेच लागले. महाजन यांच्या मतदारसंघातील शेंदुर्णा येथे आजपर्यंत भाजपा कधीही विजयी होउ शकला नाही. पण अचानकपणे तेथे नगराध्यक्षासह 14 उमेदवार विजयी झाले. जामनेर या महाजनांच्या गावात नगरपरिषदेच्या निवडणुकीत 25 पैकी 25 जागा निवडून आल्या. या सर्व यशामागे ईव्हीएममधील हेराफेरी कारणीभूत असून त्यासाठी हैद्राबाद येथील एका हॅकरची मदत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

आपल्याकडे सर्व पुरावे आहेत
हॅकिंग करण्यासाठी मतदान होणाऱ्या ठिकाणी तसेच मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या ठिकाणी जीओ आणि व्होडाफोनचे मोबाईल टॉवर युद्धपातळीवर उभारण्यात आले. महापालिकेची त्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. अधिकारी देखील मॅनेज करण्यात आले. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत. मात्र निवडणूक आयोग, पोलीस यांच्याकडे तक्रार करूनही आपल्याला दाद मिळालेली नाही असेही अनिल गोटे म्हणाले. यामुळे आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. धुळ्यासह इतर ज्या ठिकाणी ईव्हीएममध्ये हेराफेरी झाली त्या सर्व ठिकाणच्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात अशी मागणी आपण याद्वारे केली आहे. ज्या राजकीय पक्षांना व नेत्यांना ईव्हीएमबददल संशय वा आक्षेप आहे त्या सर्वांनी आपल्यासोबत यावे, असे आवाहन गोटे यांनी यावेळी केले.

गोटेंनी आत्मपरिक्षण करावे – गिरीश महाजन
धुळेकरांनी निवडणुकीत अनिल गोटे यांना साफ नाकारले.या पराभवामुळे खचून जाउन ते आता असे बेताल,बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत.धुळयातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरलेला नाही. दारूण पराभवामुळे ते मानसिकदृष्टया खचून गेले आहेत. यामुळेच ते असे बिनपुराव्यांचे आरोप करत आहेत अशी प्रतिक्रिया जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. अनिल गोटे यांनी खरेतर पराभव पचवायला शिकले पाहिजे. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी असेही गिरीश महाजन म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)