‘ईपीएफओ’ची गृहयोजना लवकरच! (भाग-१)

भविष्य निर्वाह निधीत दरमहा पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गृहयोजना सुरू करण्याविषयी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आता या माध्यमातून घर मिळविणे लवकरच शक्‍य होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांसाठी लवकरच गृहयोजना जाहीर करण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत डाउन पेमेन्ट भरल्यानंतर मासिक हप्ते भरून कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल.

ईपीएफओने आपल्या खातेधारकांसाठी गृहयोजना जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून, या योजनेचा आराखडाही तयार केला आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) डिसेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत हा आराखडा मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर ईपीएफओ कार्यालय आपल्या कर्मचारी सदस्यांसाठी गृहयोजनेवर काम सुरू करेल. लोकसभा निवडणुकांपूर्वी या योजनेला प्रारंभ होईल, असे मानले जाते. ईपीएफओच्या प्रवक्‍त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही संघटना आपल्या सभासदांसाठी स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देऊ इच्छिते. त्यामुळे स्वाभाविकपणे या योजनेशी जोडलेले काही नियम आणि अटीही असू शकतात.

‘ईपीएफओ’ची गृहयोजना लवकरच! (भाग-२)

संघटनेच्या आराखड्यानुसार, नॅशनल हाउसिंग असोसिएशनची म्हणजेच राष्ट्रीय गृहनिर्माण संघटनेची स्थापना करण्यात येणार आहे. सर्व राज्यांमध्ये घरांसाठी जमिनी अधिगृहित करण्याचे काम ही संघटना करेल. या जमिनींवर गृहनिर्माण प्रकल्प उभे राहतील. राज्यांकडून स्वस्त दरांत जमिनींची खरेदी केली जाईल. त्यानंतर बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांबरोबर चर्चा सुरू होतील. त्यातील निवडक कंपन्या हे गृहनिर्माण प्रकल्प उभे करतील. ईपीएफओ आपल्या सदस्यांना गृहखरेदीसाठी कर्जही देईल. मात्र, त्यासाठी काही अटी असतील. यातील महत्त्वाचा मुद्दा असा की, या गृहनिर्माण प्रकल्पांचा हेतू नफा कमावणे हा नसेल. त्यामुळे सदस्यांना रास्त दरात घरे मिळतील. घरांच्या किमती त्यांच्या बांधकामाला आलेल्या खर्चाच्या आधारावर निश्‍चित केल्या जातील.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)