‘ईपीएफओ’ची गृहयोजना लवकरच! (भाग-२)

भविष्य निर्वाह निधीत दरमहा पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गृहयोजना सुरू करण्याविषयी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. आता या माध्यमातून घर मिळविणे लवकरच शक्‍य होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सदस्यांसाठी लवकरच गृहयोजना जाहीर करण्याचे ठरविले आहे. या योजनेअंतर्गत डाउन पेमेन्ट भरल्यानंतर मासिक हप्ते भरून कर्मचाऱ्यांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल.

‘ईपीएफओ’ची गृहयोजना लवकरच! (भाग-१)

ईपीएफओच्या ज्या सदस्यांकडे स्वतःचे घर नाही, असे सदस्यच घरासाठी प्रयत्न करू शकतील. त्याचप्रमाणे, घर घेण्यासाठी अर्ज करताना ईपीएफओ कार्यालयात किमान तीन वर्षे भविष्य निर्वाह निधी जमा झाला असला पाहिजे. घरखरेदीसाठी ईपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेच्या नव्वद टक्के रक्कम काढण्याची अनुमती असेल. याखेरीज घरखरेदीसाठी कर्ज घेतल्यास त्याचा मासिक हप्ताही ईपीएफ खात्यातून भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांसाठी गृहनिर्माण योजना तयार करण्याचा मनोदय काही वर्षांपूर्वी श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना व्यक्त केला होता. त्यावेळी सरकारने म्हटले होते की, एनबीसीसी, दिल्ली विकास प्राधिकरण, पुडा, हुडा यांसारख्या गृहनिर्माण संस्था तसेच बॅंका आणि सार्वजनिक क्षेत्रातील फायनान्स कंपन्यांच्या मदतीने ईपीएफच्या सदस्य कर्मचाऱ्यांना स्वस्त घरे मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

संघटनेच्या सदस्यांपैकी 70 टक्के कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत कमी उत्पन्नगटातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ होणार असून, घर घेण्याचे स्वप्नही पाहू न शकणारे अनेकजण घरासाठी अर्ज करू शकतील. 2022 पर्यंत सर्वांच्या डोक्‍यावर स्वतःच्या हक्काचे छप्पर असावे, या सरकारच्या धोरणाला या योजनेमुळे बळ मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने ईपीएफओ संघटनेला अशा प्रकारची योजना तयार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर ईपीएफओने आपल्या कोशातील 15 टक्के रक्कम हाउसिंग सोसायट्यांना कर्जरूपाने देण्याचा प्रस्तावही सादर केला होता. या कर्जाच्या जोरावर हाउसिंग सोसायट्या बॅंकांकडून 70 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त कर्ज मिळवू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यातून साडेतीन लाख स्वस्त घरांची निर्मिती करणे शक्‍य होईल. ईपीएफओचा कोश सात लाख कोटी रुपयांचा आहे. त्यात दरवर्षी अनेक हजार कोटींची भर पडत असते. या कोशाचा वापर करून कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना घर उपलब्ध करून देण्याची ही योजना खरोखर स्वागतार्ह असून, त्यामुळे अनेकांना स्वतःचे हक्काचे छप्पर मिळणार आहे.

– जगदीश काळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)