ईडीकडून तीन वर्षांत विक्रमी 33 हजार कोटींची मालमत्ता जप्त 

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) प्रमुख म्हणून कर्नाल सिंह यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ लक्षणीय ठरला. त्या कालावधीत ईडीने तब्बल 33 हजार 500 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. याशिवाय, मनी लॉण्डरिंग संदर्भात सुमारे 390 आरोपपत्र दाखल केले.

उद्या (रविवार) सेवानिवृत्त होत असणाऱ्या सिंह यांनी ऑगस्ट 2015 मध्ये ईडीच्या प्रमुखपदाची सुत्रे स्वीकारली. मनी लॉण्डरिंग, परकी चलन नियमभंग, भ्रष्टाचार यांच्याशी संबंधित अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांचा तपास त्यांच्या नेतृत्वाखाली झाला. ऑगस्टावेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील अनियमितता, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम्‌ आणि त्यांचे पुत्र कार्ती यांच्या विरोधातील मनी लॉण्डरिंगचे प्रकरण, विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनी केलेले बॅंक घोटाळे, 2जी स्पेक्‍ट्रम वाटप आणि कोळसा खाणवाटप घोटाळा आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ईडीने 2005 ते 2015 या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे 9 हजार कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली होती. मात्र, मागील तीन वर्षांत हे प्रमाण जवळपास चार पटीने वाढले. ईडीने 2005 ते 2015 या कालावधीत 173 आरोपपत्र दाखल केले. ते प्रमाणही मागील तीन वर्षांत दुपटीहून अधिक झाले. सिंह यांच्या कार्यकाळात मनी लॉण्डरिंग विरोधी कायद्यांतर्गत प्रथमच पाच प्रकरणांत आरोपी दोषी ठरले. मागील तीन वर्षांत ईडीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या 682 वरून वाढून 1 हजार 33 इतकी झाली. काळा पैसा आणि हवाला व्यवहारांना आळा घालण्यासाठी लागू असलेल्या प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍ट (पीएमएलए) आणि परकी चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) या देशातील सर्वांत कठोर कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ईडीवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)