इ-सेवनावरील बंदी स्वागतार्ह

भारतात अंमलीपदार्थाचे सेवन ही नेहमीच गंभीर समस्या राहिली आहे. तंबाखू, सिगारेट, हुक्का, ड्रग्ज, गांजा, हेरॉईन यांसारख्या पदार्थाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई ही आजच्या काळातील चिंताजनक बाब बनली आहे. सिगारेट आणि तंबाखूला वेसण घालत असतानाच अंमली पदार्थाचा इ- प्रकार रुढ झाला. आता यावरही सरकारने बंदी घालून नशाबाज मंडळींवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

सिगारेट सेवनाच्या अत्याधुनिक पद्धतीवर आरोग्य मंत्रालयाने घातलेली बंदी स्वागतार्ह आहे. गेल्या वर्षी दिल्लीतील एका जागरुक नागरिकाने न्यायालयात जनहित याचिका दाखल करत निकोटिन सेवनाच्या इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीचा जसे की इ-सिगारेट, ई-हुक्का किंवा ई-शिशा सारख्या प्रचलित पर्यांयावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल देत अशा प्रकारच्या वाईट पद्धतीवर आतापर्यंत बंदी का घातली गेली नाही? याबाबत न्यायालयाने ताशेरे ओढले.

न्यायालयाच्या ताशेऱ्याने खडबडून जागे झालेल्या आरोग्य मंत्रालयाने निकोटीन घेण्याच्या इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीच्या उत्पादनावर, आयातीवर आणि विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. एका जनहित याचिकेमुळे समाजात पसरत असलेल्या अपप्रवृत्तीला लगाम घालण्याचे काम झाले आहे. लोकहितासाठी जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर एखादा नागरिक देखील यशस्वी होऊ शकतो, हे या निर्णयाने सिद्ध झाले आहे. मात्र यासाठी शासन आणि प्रशासनाने संवेदनशील होणे देखील तितकेच गरजेचे आहे. दिर्घकाळाचा विचार केल्यास आरोग्य मंत्रालयाचा निर्णय हा निश्‍चितच महत्त्वाचा ठरतो. आरोग्यावरून वाढत्या जागरुकतेमुळे तंबाखूपासून तयार होणाऱ्या अंमलीपदार्थांना बाजारपेठेत स्थान मिळवणे कठिण होऊ लागले आहे. यावर उपाय म्हणून ई-सिगारेटची पद्धत अंमलात आणली गेली. धुम्रपानाचा हानीरहित पर्याय असल्याचे सांगत त्याची धुमधडाक्‍यात विक्री केली जावू लागली. पाहता पाहता ई-सेवनाचा बाजार वाढू लागला.

संशोधनकर्त्यांच्या मते, ई-सिगारेट ही अन्य प्रचलित पर्यायाच्या तुलनेत कमी घातक असली तरी लहान मुले, किशोरवयीन मुले तसेच गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. सध्याच्या जागरुकतेच्या अभावामुळे धुम्रपानाच्या या अत्याधुनिक पद्धतीने व्यापक रुप धारण केले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 2005 मध्ये ई-सिगारेटचे उत्पादन करणारी केवळ एकच कंपनी चीनमध्ये होती. आता मात्र ई-सिगारेट आपल्याला 500 ब्रॅंडमध्ये आणि 8 हजार स्वादात उपलब्ध आहे. हा व्यवसाय आता तीन अब्ज डॉलरचा बनला आहे. यावरून ई-सिगारेटचा वाढलेला विळखा आपल्या ध्यानात येईल.
भारतात इ-सिगारेटचा व्यवसाय हा जवळपास 50 टक्के ऑनलाइन चालतो आणि चीन हा या व्यवसायाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. ई-सिगारेटचे वाढते प्रस्थ आणि युवकांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम पाहता सरकारने या समस्येवर मार्ग काढण्यासाठी कृती समितीची नियुक्ती केली. या समितीने ई-सिगारेट ही कर्करोगाला आमंत्रण देणारी आणि नशेच्या आहारी नेणारी पद्धत असल्याचा निष्कर्ष काढला.

याशिवाय भारतीय आरोग्य संशोधन परिषदेच्या एका अभ्यासानुसार भारतात कर्करोगाची 30 टक्‍क्‍यांहून अधिक प्रकरणे हे तंबाखूशी निगडीत आहेत आणि कर्करोगग्रस्त पुरुषांच्या मृत्युमागे 42 टक्के कारण हे तंबाखू अणि सिगारेट आहे, असे सांगितले गेले. इ-सिगारेट, ई-हुक्का आदींच्या वापरावर आणि विक्रीवर प्रभावीपणे निर्बंध घालण्याबरोबरच तंबाखू सेवनाच्या गंभीर दुष्पपरिणामाची माहिती जनमानसात रुजवण्यासाठीही आणखी प्रयत्न हवेत.

– अॅड. पवन दुग्गल


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)