इस बंदे में दम हैं! 

सतीश राऊत (शरद पवार यांचे स्वीय सचिव)

साहेबांकडे मी 2009 मध्ये रूजू झाल्यापासून किरकोळ प्रसंग वगळता तीन-चार लक्षात राहण्याजोगे प्रसंग अनुभवास आले. डिसेंबर महिना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा. दिल्लीतली थंडी अतिशय कडाक्‍याची , बोचरी थंडी. ह्या थंडीपासून संरक्षण करायचं म्हणजे केवळ स्वेटरवर भागत नाही. अंतर्वस्त्रावर थर्मल वेअर्स, त्यावर कपडे, कपड्यांवर स्वेटर आणि झालंच तर त्यावर कोट असे अनेक थराचे ( मल्टीलेअर) कपडे घातल्याशिवाय थंडीपासून सुटका होत नाही. घराघरात उब राहण्यासाठी दिवस-रात्र विजेवर चालणारे हिटर्स असतात. 2 डिसेबर,2014 रोजी अशाच एका कडाक्‍याच्या थंडीत साहेब , सुप्रियाताई आणि वहिनी संध्याकाळच्या जेवणानंतर बाहेर शेकोटी पेटवून तिच्या कडेने खुर्चीवर बसून हात शेकत बसले होते. गप्पा चालू असताना शेकोटीत काटकी टाकण्यासाठी साहेब खुर्चीवरून खाली झुकले तशी खुर्ची कलंडली आणि साहेबांचाही तोल गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सावरले त्यावेळी उजव्या मांडीच्या वरच्या भागातून कळा येऊ लागल्या. वेळ जाईल तशा वेदना असह्य होऊ लागल्या. दिल्लीतील दवाखान्यात तपासण्या केल्या असता उजव्या पायाच्या खुब्याचे हाड मोडल्याचे डॉक्‍टरांनी सांगीतले. खुब्याचे हाड बदलणे म्हणजे हीप रिप्लेसमेंट नावाच्या शस्त्रक्रियेवाचून पर्याय नाही हे कळल्यावर सुप्रियाताईंनी साहेबांना मुंबईला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला. सिद्धेश्वर शिंपी आणि किरण ह्या दिल्लीच्या पी.ए. मंडळींनी धावपळ करून एअर ऍम्ब्युलन्सची जुळवाजुळव केली.

बुधवार, दिनांक 3 डिसेंबर,2014 रोजीचा तो दिवस ! भल्या सकाळी धुवाळीसाहेबांना घडलेल्या प्रकाराबद्दल फोन आला आणि मुंबई विमानतळावर सज्ज राहण्याच्या सूचना मिळाल्या. मी आणि सुनील रानडे साहेबांच्या घरापासून जवळच असलेल्या ब्रिच कॅंडी हॉस्पिटलमध्ये साहेबांना आणण्याची वाट पाहत थांबलो. साहेब पोहोचेपर्यंत साहेबांचे मित्र आणि फॅमिली डॉ. रवी बापट यांनी हीप रिप्लेसमेंट सर्जरी डॉ. मुल्लाजी या नामवंत शल्यविशारदांकडून करावी असे ठरवले. शस्त्रक्रिया खरोखर आव्हानात्मक होती. साहेबांच्या वयाला आठवडाभरात 74 वर्षे पूर्ण होणार होती. वाढते वय, साहेबांची उंचीपुरी देहयष्टी व त्यामुळे शंभरी पार असलेले वजन ही मुख्य आव्हाने होती.

मांडीच्या वरच्या भागात खोल रूतलेले व मोडलेले हाड बाहेर काढून त्याऐवजी कृत्रिम प्रोस्थेटीक अवयव अगदी वरच्या सांध्यापर्यंत बसवणे हे जिकिरीचे काम होते. हीप रिप्लेसमेंट सर्जरीत मोजमापात फरक पडला तरी चालण्याची लय बिघडते. त्यामुळे बिनचूक आणि तंतोतंत जोडणी होणे हे गरजेचे असते. शुक्रवारी ,5 डिसेंबर रोजी डॉ. मुल्लाजींनी साहेबांवर यशस्वी हीप रिप्लेसमेंट सर्जरी केली . हे ऑपरेशन सुमारे दीड तास चालले. साहेबांची भूल उतरल्यावर डॉ. मुल्लाजी आणि डॉ. रवी बापट सर्जिकल आय.सी.यू. मध्ये साहेबांकडे गेले. डॉ. मुल्लाजींनी ऑपरेशन उत्तमच केले होते. त्यामुळे साहेबांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची त्यांना उत्सुकता होती. मुल्लाजी ‘साहेबांना कसे वाटतेय?’ हे विचारायला जवळ गेले तसे साहेबांनी मिश्‍किल मुद्रेने विचारले, झाले का तुमचे सुतारकाम ? मुल्लाजींना मराठी समजत होतं तरी ते गोंधळून गेले .

‘ सुतारकाम ?’ साहेब नेमके कशाबद्दल बोलतायेत हे त्यांच्या ध्यानी येईना. डॉ.रवी बापटांनी मध्यस्थी केली. डॉक्‍टर, फर्निचर तुटलं की सुतार म्हणजे कारपेंटर असाच जोड देऊन सांधण्याचं काम करतात, तुम्ही हाड जोडून एकप्रकारे हाडाचं कारपेंटरींग केलंय असं साहेब विनोदानं म्हणतायेत. मुल्लाजींची पेशंटकडून विव्हळण्याची ,’मला चालता येईल की नाही ? ‘या विवंचनेची धारणा होती. भूल उतरल्यावर साहेब थेट विनोद करू लागल्याने ह्या धारणेला धक्का बसला पण तो आश्‍चर्याचा होता. हे झालं सुतारकाम पण हृदय हे तर शरीराचे पंपींग स्टेशन असते. ते नादुरूस्त झाल्यावर प्लंबिंग, फिटींग, स्टिचिंग,इलेक्‍ट्रीकल अशी कामे करावी लागतात. मोठ्या विकारावर किंवा आजारावर जर मात करायची असेल तर त्याला असंच रिडिक्‍यूल केलं पाहिजे असं मलाही वाटलं. पेशंटवरील दडपण कमी होण्यासाठी ते कधीही चांगलं पण डॉक्‍टर्स मंडळींनी मुल्लाजींसारखं स्पोर्टींगली घ्यायला हवं.

दोन-तीन दिवसांत साहेबांना सर्जिकल आय.सी.यू.मधून 4 थ्या मजल्यावरील 404 रूममध्ये हलवण्यात आलं. तिथे गेल्यावर समजलं की, जवळच्याच रूममध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील साहेब सुद्धा आहेत. साहेबांच्या देखील ते कानी गेलं. आर.आर. आबांच्या गालावर कर्करोगाचीच शस्त्रक्रिया झाली होती. जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून भेटीगाठीबाबत मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोहोंना एकमेकांना भेटणं शक्‍य नव्हतं. साहेबांनी तशाही परिस्थितीत आबांच्या तब्येतीची विचारपूस त्यांची काळजी पाहणाऱ्या डॉक्‍टरांकडे केली. मी आर.आर.आबांना एकदा दरवाजातूनच पडद्या आडून पाहिलं आणि शेवटचं पाहिलं ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये रेडियेशन साठी निघाले होते तेव्हा. लिफ्टमधून आबा उतरताना मी आबांना केलेला तो शेवटचा नमस्कार !

साहेबांचं यशस्वी ऑपरेशन झालं पण पुढचा खरा कसोटीचा काळ होता. साहेबांचं जीवन म्हणजे जनमाणसांसाठी वाहिलेलं. पण आता प्रवासावर मर्यादा येणार ,त्याचा सार्वजनिक कार्यावर परिणाम होणार अशी अनामिक भिती सर्वांच्याच मनात होती. यापुढे साहेबांनी मुंबईत बसून रिमोट कंट्रोल हाती ठेवावा असा सूर बऱ्याच जणांचा होता. पण हार मानणार ते साहेब कसले ? डॉक्‍टर नको नको म्हणत असताना साहेबांनी तिसऱ्या दिवशी बेडवरून उठवून खुर्चीवर बसवण्यास सांगितलं. प्रचंड वेदना होत असताना उभं राहण्याचा प्रयत्न केला. ओल्या जखमेच्या, कृत्रिम जोड दिलेल्या पायावर जोर देऊन उठणं कसं शक्‍य होतं? हीप रिप्लेसमेंटचे रुग्ण कितीतरी महिने बिछान्याला खिळून असतात , असं खूप काही कानी यायचं. साहेब देखील किमान सहा महिने चालू शकणार नाहीत असा कयास दबक्‍या आवाजात ऐकायला मिळे. लोकांना माहीत नसावं पण आजाराला पक्कं माहित असतं की, साहेब आपला फार दिवस लाड करत नाही. साहेबांनी आठवडाभरातच वॉकरच्या आधाराने चालायला सुरुवात केली. सुरुवातीला रूममध्ये चालणारे साहेब , रूमबाहेरील पॅसेजमध्ये वॉकरच्या सहाय्याने बाहेर चालताना पाहिलं तेव्हा आनंदलो आणि गहिवरलो आम्ही स्टाफ मंडळी!

दोन आठवड्यानंतर साहेबांना डिस्चार्ज मिळाला. फिजीओथेरेपिस्ट दररोज सकाळी साहेबांचा व्यायाम घ्यायला येत. साहेबांना कितीतरी महिने दौरे करता येणार नव्हते. व्यायाम झाला की, पुन्हा बेडवर व काही वेळ खुर्चीवर बसणं एवढाच दिवसभराचा दिनक्रम. दिवसाचे सोळा-अठरा तास कामाची सवय असणाऱ्या साहेबांसाठी ही तर जखमेपेक्षा वेदनादायी बाब होती. ह्या अस्वस्थतेने साहेबांमधला लेखक जागा केला. साहेबांनी एक दिवस पक्षाचे खजिनदार आणि नाट्य-साहित्यात अभिरूची असलेल्या हेमंत टकलेंना बोलवून घेतलं. टकले साहेबांशी दीर्घ चर्चा करून साहेबांच्या आयुष्यातील प्रसंगांची जंत्री तयार केली. दोहोंच्या चर्चेतून लेखमाला तयार करण्याचे ठरले. साहेब सार्वजनिक जीवनातील हलके- फुलके प्रसंग सांगत आणि टकले साहेब ते कागदावर उतरवत.

पक्ष कार्यालयातला जीवन ते टाईप करी व टाईप होऊन आले की , मी ते साहेबांकडे प्रिंट काढून देई. प्रारूप मान्य झालं की, ते प्रकाशनासाठी पाठवले जाई. हा सिलसिला सुरू झाला आणि बिछान्याला जखडून राहिलेले साहेब लिखाणातून मोकळे होऊ लागले. साहेबांनी अनुभवलेल्या प्रसंगांची उधळण वाचकांसाठी एक पर्वणी होती. हा सिलसिला पुढे वर्षभर चालू होता. खरेच आजारासारख्या जर्जर परिस्थितीतही स्वत:ला कसे गुंतवून ठेवावे हे साहेबांकडून शिकावे.

ह्याच काळात साहेबांनी आत्मचरीत्र लिहावे अशी कल्पना पुढे आली. सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली दत्ता बाळ सराफ, निलेश राऊत हे शिलेदार सज्ज झाले. हेमंत टकलेंनी सूत्रे हातात घेतली. साहेबांचे राजकीय आत्मचरित्र तयार करण्याचे ठरले. साहेबांच्या जीवनातील ज्ञात गोष्टींवरून प्रश्नावली तयार झाली. ताईंची टीम सुरुवातीला सिल्व्हर ओक निवासस्थानी आणि साहेब बाहेर फिरू लागल्यावर ते जिथे जातील तिथे व्हिडीओ कॅमेरा घेऊन सज्ज असायची. साहेबांना प्रश्न विचारला जाई. त्यावर साहेब मुक्तपणे बोलत , ते रेकॉर्ड होई व नंतर रेकॉर्ड झालेले शब्दबध्द होत असे. आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी यांनी याबाबतीत कष्ट घेतले. पाहता पाहता साहेबांचे पहिले आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ तयार झाले. त्याची ‘ऑन माय टर्म्स’ नावाची इंग्रजी आवृत्ती ही तयार झाली. ती तयार करण्याकामी नेहमीच्या टिम शिवाय अंबरिश मिश्र, सुजाता देशमुख यांनी लक्ष पुरविले. साहेबांच्या पंच्चाहत्तरीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या अभुतपूर्व सत्कार सोहळ्यात मा. पंतप्रधानांच्या हस्ते हे आत्मचरित्र प्रकाशित झाले.

प्रवास म्हटलं की साहेब एका पायावर तयार असतात. ‘एका पायावर तयार असणे’ हे वाक्‍प्रचारात म्हणणे ठीक पण प्रत्यक्षात किती महाकठीण असते ! साहेब ते ही आव्हान कसे पेलतात हे लवकरच लक्षात आलं. ऑपरेशन होऊन दीड महिना लोटला तशी साहेबांची अस्वस्थता अजून वाढली. वॉकर जाऊन साहेबांच्या हातात आता काठी आली. पण सारखे घरात बसून साहेबांना उबग आला होता. विठ्ठलशेट, कर्नल संभाजी पाटील हि मंडळी साहेबांना कंटाळा येवू नये म्हणून आवर्जून भेटायला यायची. एक दिवस ह्याच मित्रमंडळींशी गप्पा मारताना गीरच्या जंगलात सिंह सफारीला जाण्याचे ठरले. 24 जानेवारी,2015 हा तो दिवस. गुजरातच्या दक्षिणेला दीव नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे. तेथपर्यंत खाजगी विमानाने आणि पुढे उत्तरेला सुमारे शंभर किमी अंतरावर गीर-सासन च्या जंगलात वाहनाद्वारे जाण्याचा मार्ग निश्‍चित केला.

दीवची धावपट्टी लहान असल्यामुळे लहानसे विमान घेतले. मात्र तीव्र उताराच्या, अतिशय अरूंद पायऱ्यांवरून विमानात चढणे एक दिव्यच होते. विमानाच्या आतील अरुंद जागेत उभे राहून पायलटला देखील साहेबांना आधार देता येईना. शस्त्रक्रिया झालेल्या उजव्या पायावर जोर देता येईना. साहेब वेदना सहन करीत हिंमत करून पायऱ्या चढले पण आत पाय ठेवल्यावर उंचीमुळे त्यांना उभे राहता येईना. दरवाजाच्या खोबणीत साहेब अंग चोरून जखमी पाय गुडग्यातून वाकणार नाही याची काळजी घेत, वाकून तोल सांभाळत आत घुसू पाहत होते. एखादी चूक आणि पाय जाग्यावर दुमडायची भीती ! पण साहेबांनी शिकस्त केली. आणि दुसरा पाय देखील आत घेऊन उभे राहिले. तेव्हा कुठे आम्ही रोखून धरलेला श्वास सोडला. दीव बेटावर विमान उतरल्यावर विमानातून उतरणे सुध्दा तितकेच अवघड होते. गीरच्या जंगलाजवळच हॉटेल फर्न रेसॉर्टमध्ये साहेब, विठ्ठल मणियार आणि कर्नल संभाजी पाटील हे सहकुटुंब उतरले.

दूसऱ्या दिवशी सकाळी ऑलीव्ह रंगांच्या उघड्या जिप्सींमधून गीर जंगलाची सफर घडणार होती. वनखात्याने सगळी सोय केली होती. पण जंगलातल्या वाटेवरील खाच-खळग्यांचा त्रास दुखऱ्या पायाला होऊ नये म्हणून साहेबांसाठी व्यवस्था केलेली इनोव्हा गाडी जंगलात नेण्याचे ठरले. आम्ही बाकीची मंडळी मात्र उघड्या जिप्सींमध्ये थाटात बसलो. मी गीरच्या सिंहाला कैद करण्यासाठी कॅमेरा सज्ज ठेवला होता. साहेब आणि सिंहाचे एकत्र छायाचित्र टिपण्याचा माझा मनसुबा होता. अडचण एकच की साहेब खाली उतरणार नव्हते. त्यांची गाडी देखील बंदिस्त होती. अर्ध्या तासातच एका रूंद पण उथळ ओढ्याच्या पात्रात आठ सिंहिणी सकाळचं कोवळं ऊन खात पहूडल्या होत्या. निसर्गाच्या सानिध्यात रूबाबात लोळणाऱ्या बेफिकीर वनरागिणींचं चित्र डोळ्यात साठवलं आणि कॅमेऱ्यात कैद केलं. सिंहिणी दिसल्या पण वनराज दिसेना. पण जाणता राजा पाहण्याची त्याला देखील उत्कंठा असावी.

परतीच्या प्रवासात दाट झाडीतून एक डरकाळी देऊन त्या वनराजानेआगमनाची चाहूल दिली. आम्ही गवताच्या मैदानातल्या कच्च्या वाटेवरून तो जवळ येण्याची वाट पाहू लागलो. वनराज आमच्या नजरेच्या टप्प्यात आला. पण त्याने गवताच्या मैदानावर येण्याचे टाळत कडेवरच्या झुडूपाखाली बस्तान मांडलं. आणि आम्हाला निर्विकारपणे पाहत राहिला. हिच संधी होती साहेब व वनराजाचं एकत्र छायाचित्र टिपण्याची. पण साहेब गाडीत, दरवाजा बंद . कसा काढणार फोटो. पण मी जिप्सी मागे-पुढे घ्यायला सांगून आटापिटा केला. तेव्हा साहेबांच्या गाडीतून पलिकडे निवांत बसलेला सिंह दिसला. साहेब पुढच्या सीटवर बसून सिंहावलोकन करत होते. पण वनराज तोवर दुसरीकडे पाहत होते. मी चालत्या गाडीतून क्‍लिक केलं. नशीब ! पुसटसे का होईना पण दोघे एकत्रित कॅमेऱ्यात आल्याचे मला खूप समाधान वाटले.

आम्ही रेसॉर्टवर परतल्यावर साहेबांना समजले की, माझा वाढदिवस आहे. संध्याकाळी अचानक चॉकलेटी रंगाचा केक आणण्यात आला. मी मेणबत्ती फुंकून केक कापण्यासाठी वाकलो . साहेबांना खुर्चीत बसल्यानंतर उठून उभे राहण्याचा त्रास होई. तशाही परिस्थितीत ते वेदना विसरून उठून उभे राहिले. साहेब, वहिनींच्या साक्षीने, मणियार-पाटील कुटुंबीयांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात आणि हॅपी बर्थ डे टू यू च्या निनादात केक कापला गेला. मणियार सरांनी मला भरवला. जंगलात अचानक भेटवस्तू काय आणणार . मग सर्वांतर्फे विठ्ठलशेठजींनी छोटीशी भेट दिली. त्या भेटीचं मोल कशातच करता येणार नाही. मी कृतार्थ झालो. फर्न रेसॉर्टमध्येच दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहन साहेबांनी केलं. फर्न रेसॉर्टसाठी हा अत्यंत मानाचा दिवस होता. परतीच्या वाटेत सोरटी-सोमनाथाचं दर्शन घेतलं. आणि पुन्हा दीव मार्गे खाजगी विमानाने मुंबईला परतलो.

साहेब आजाराचे जसे भांडवल करीत नाहीत तसे त्याला गोंजारत देखील बसत नाहीत. गोळ्या-औषधे वेळच्या वेळी घेण्यात कधीही हयगय होत नाही. वहिनी साहेबांच्या आरोग्याची सतत काळजी वाहत असतात. साहेबांचे तपासणीचे अहवाल व इतर वैद्यकिय अभिलेखे जपून ठेवणे , सकाळ-संध्याकाळच्या औषध-गोळ्यांची पाकिटे तयार करून ठेवणे, साहेब त्या वेळेवर घेतील यांकडे त्यांचे कसोशीने लक्ष असते. साहेबांसोबत दौऱ्यावर त्या नसतील तेव्हा ती जबाबदारी मी अथवा दुसरे सहकारी रानडे यांच्यावर असते. गामा ड्रायव्हर यांचेही लक्ष असतेच. नव्या ठिकाणी नोकर-चाकरांच्या हाती कधीही गोळ्या दिल्या जात नाहीत. आम्हा कुणांकडून गोळ्या देताना विसर पडल्याचा एकदाही प्रसंग घडला नाही. एकदा मात्र माझ्या मनात धडकी भरली होती.

बुलडाणा जिल्ह्यातील गजानन महाराजांच्या शेगांवास भेट देऊन रात्री विदर्भ एक्‍सप्रेस ने मुंबईला निघालो होतो. साहेबांसाठी स्वतंत्र कुपे राखीव होता. रात्री नऊच्या सुमारास सुनील तटकरे साहेबांशी चर्चा करण्यासाठी कुपे मध्ये शिरले , मी आणि बबनराव पाचपुते शेजारच्या टू-टिअर डब्यात बसून गप्पा मारण्यात रंगलो. साहेब लवकर झोपत नाहीत हे माहीत असल्याने मी निवांत होतो. अर्ध्यातासाने तटकरे साहेब निघून गेले असतील ह्या अंदाजाने मी कुपेकडे गेलो. आतील लाईट बंद झाल्या पाहिल्या तसा माझ्या काळजाचा ठोका चुकला. तटकरे साहेब एव्हना निघून गेले होते. साहेब तर नेहमीच्या वेळे आधी झोपी गेलेत , कुपेचे दार तरी कसे वाजवायचे ? पण वाजवले नाही तर साहेबांच्या गोळ्या चुकलेले कसे चालेल! साहेब रागावले तर ? मनाची घालमेल झाली , धाडस करून दरवाजा वाजवला. साहेबांना नुकतीच तंद्री लागलेली असावी. त्यांनी लाईट लावून दरवाजा उघडला. मी धाकधुकीने ” सर गोळ्या घ्यायच्या राहिल्यात ” एवढे म्हणालो. साहेबांना झोपेतून उठवल्याने रागावतील अशी भीती होती. परंतु साहेबांनी ‘ अरे हो !’ एवढेच म्हणून अगदी शांतपणे मी पुढे केलेल्या गोळ्या हाती घेतल्या. मी ग्लासातून पाणी दिले. साहेबांनी गोळ्या घेतल्यावर माझ्या जीवात जीव आला. तेव्हापासून साहेबांसोबत कुणीही असले तरी गोळ्या घ्या म्हणून सुचवायची भीड मी बाळगली नाही.

क्षुल्लक का असेना पण साहेबांच्या आजाराबद्दल आम्ही सारेच कमालीची गुप्तता पाळण्याचा प्रयत्न करतो. मागेच सांगितल्याप्रमाणे साहेबांना त्याचं भांडवल नको असतं. आणि सर्वात महत्त्वाचं कारण की राईचा पर्वत करणाऱ्या महाभागांचा सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात सुळसूळाट झाला आहे. लष्कराच्या भाकरी भाजणाऱ्या ह्या उपटसुंभांना घरातल्या भाकरीची काळजी नसते. पण साधी घटना घडली तरी तिला तेल-मीठ लावून चमचमीत चर्चा करण्याचा त्यांचा सततचा खटाटोप असतो. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमध्ये एवढी प्रचंड स्पर्धा लागलेली आहे की, अगोदर बातमी झळकावयाची आणि त्यानंतर वस्तुनिष्ठता तपासायची. ब्रेकींग न्यूजच्या नादात विश्वासार्हता ब्रेक होते कि नाही याची तमा ते बाळगत नाहीत. वॉट्‌स अप सारख्या सामाजिक माध्यमाने तर वाटच लावली आहे. 24 जानेवारी, 2013 रोजी कोल्हापूर दौऱ्यावेळी साहेबांची तब्येत जराशी बिघडली.

कोल्हापूरवरून विश्रांतीसाठी थेट हेलिकॉप्टरने पुण्याला आलो. माध्यमांमध्ये बातम्या झळकल्या की साहेबांना मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये हलवलं. माध्यमांच्या बातम्यांना कंटाळून साहेब मित्रमंडळांसह कर्नाटकातील कुर्ग येथील तमारा कुर्ग रेसॉर्टकडे रवाना झाले. माध्यमांना अजून काही-तरी काळंबेरं वाटू लागलं. 27 जानेवारी रोजी आम्ही कुर्गमधील कॉफीच्या मळयांत फिरत होतो पण साहेबांचं बरं-वाईट झालं असावं इतक्‍या टोकाची अफवा वणव्यासारखी आम्हापर्यंत पसरली. मी आणि विठ्ठल मणियारांनी या अफवेचा सुगावा साहेबांना दिवसभर लागून दिला नाही. तमारा रेसॉर्टमध्ये रात्री साहेब, वहिनी आणि मित्रमंडळ बॉनफायर भोवती मस्त गप्पा मारण्यात रमले होते. अफवांच्या वणव्याची धग थेट एका वाहिनीच्या संपादकांच्या फोनने साहेबांच्या कानापर्यंत पोहोचली. दुसऱ्या दिवशी साहेबांची कुर्ग प्रांतातील कोडूगू जिल्ह्यातील विलायची (वेलदोडे) संशोधन केंद्रास आणि त्यानंतर चेत्ताली येथील फळबाग संशोधन केंद्रास भेट होती. मी आवर्जून इलेक्‍ट्रॉनीक माध्यमांना संशोधन केंद्रांच्या संचालकांमार्फत संदेश देऊन हजर राहण्यासाठी कळवले. साहेब वाहिन्यांवरून झळकले तसे अफवेचे पीक जळून खाक झाले.

24 जानेवारी, 2016 रोजी म्हणजे नेमक्‍या तीन वर्षांनी पुण्याच्या दौऱ्यावर असताना साहेबांना रूबी हॉलमध्ये भरती करावे लागले. कारण झाले दाताच्या डॉक्‍टरने दिलेल्या गोळीच्या साईड इफेक्‍टचे. साहेबांचा दोन दिवसांनी थायलंडचा दौरा योजलेला होता. मी ही त्या दौऱ्यात साहेबांसोबत असणार होतो. तो दौरा जसा रद्द झाला तसे पुन्हा अफवेचे पेव फुटले. फोनवरून मी , मणियार , सुप्रियाताई सर्वजण जीव तोडून सांगत होतो पण मिडीया, वृत्तपत्रे यांचा विश्वास बसत नव्हता. पण ह्यावेळेस वॉट्‌स अपने इष्टापत्ती केली. साहेब हॉस्पिटलच्या खोलीत गप्पा मारतानाची एक क्‍लीप व्हायरल झाली. प्रसारमाध्यमांची खात्री झाली. आणि अफवा हवेत विरून गेल्या. साहेब आजाराचे लाड करीत नाही आणि अफवा देखील मनावर घेत नाहीत. अफवांनी उलट आयुष्य वाढतं असं सांगून ते वातावरण हलकं करतात.

स्थितप्रज्ञ राहून परिस्थितीशी झगडा करण्याचं बळ साहेबांकडे कुठून आलं असेल बरं. मला वाटतं ते बाळकडू देखील आई शारदाबाईंकडून मिळालंय त्यांना. बैलाने ढूशी दिल्याने पायाचे हाड मोडले पण बाई खंबीरपणे पुन्हा उभ्या राहिल्या. साहेब सुद्धा तसेच हीप रिप्लेसमेंट सर्जरी नंतर ठामपणे उभे राहिले. अगदी अलीकडे मागील डिसेंबर महिन्यात त्यांच्या उजव्या तळपायाला जखम झाली. डॉक्‍टरांनी जखम लवकर भरून यावी आणि पायावर दाब पडून ती चिघळू नये म्हणून ब्रिच कॅंडी हॉस्पीटलमध्ये ऍडमिट केले. 12 डिसेंबर हा वाढदिवस यावेळी हॉस्पिटलमध्येच साजरा होणार हा अंदाज साहेबांनी खोटा ठरवला. त्यांनी सकाळीच हॉस्पिटल सोडले आणि खाजगी विमानाने थेट नागपूर गाठले. साहेब जखमी पायाने जनआंदोलनात चालले,जनमानसांत मिसळले आणि व्यासपीठावर उभे राहून संवाद ही साधला.

लोक म्हटले की, साहेबांना वेदनेचा विसर पडतो, चेहऱ्यावर निखार चढतो, अंगात ऊर्जेचा संचार होतो. त्यांच्यातील दमखम विरोधकांना अधिक जोमाने काम करण्यासाठी प्रवृत्त करतो तर सहकाऱ्यांना आणि अनुयायांना प्रेरीत करतो. सोशल मिीडयात साहेबांबद्दल – ‘बंदे मे दम है !’ असं छान वाक्‍य वाचलं आणि काही सूचलं…

यारों कुछ भी कहो लेकीन, इस बंदे मे दम है !!
गर्दिश के वो दिन गुजरे बडी तकलीफ से
मौत ने दि थी दस्तक बेहद ही करीब से
बेखौफ देख निकल गयी , बस्स खुदा का रहम हैं
यारों कुछ भी कहो लेकीन, इस बंदे में दम है !!

गिरकर सॅंभाला खुद को , फिर निकले राह पर
आगोश में लेने खडी थी कठिनाईंयॉं हर डगर पर
मुफ़लिस को करने मदद, तैयार वो हरदम हैं
यारों कुछ भी कहो लेकीन, इस बंदे मे दम है !!

अफ़वाहों का सैलाब थमता नहीं , है कैसी ये आफत
खुद को जिंदा साबित करने की क्‍यूँ आती है नौबत ?
यहां ज़ख़्म देने वाले है बेशूमार,मरहम लगाने वाले कम हैं !
यारों कुछ भी कहो लेकीन, इस बंदे मे दम है !!

शेवटी मला किशोर कुमारांनी गायलेलं इम्तिहान चित्रपटातील गाणं आठवतं. .. 
रूक जाना नहीं , तू कहीं हार कें
काटों पे चल के मिलेंगे , साये बहार कें
वो राही, वो राही…….
साहेबांचे विकारांची पर्वा न करता निर्विकारपणे पुढे चालत राहणे त्याच गाण्यातील ” सूरज देख रूक गया है , तेरे आगे झुक गया हैं !” ह्या पंक्तींप्रमाणे स्तंभीत करणारे आहे. बचेंगे भी और लडेंगे भी ! हा साहेबांचा बाणा तुम्हा-आम्हाला खूप काही शिकवून जातो. साहेबांना सलाम!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)