इस्रोची कामगिरी (अग्रलेख)

देशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजे जीसॅट-11 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्याने भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याबद्दल इस्रो आणि त्यांच्या सर्व वैज्ञानिकांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तब्बल 5,854 किलो वजन असणाऱ्या या उपग्रहाचे प्रक्षेपण भारतीय भूमीवरून न होता युरोपियन अवकाश केंद्र फ्रेंच गयाना येथून करण्यात आले असले तरी त्यामागील इस्रोचे आणि संबंधित वैज्ञानिकांचे परिश्रम लपून राहात नाहीत.

दळणवळणासाठी महत्त्वाचा असलेला हा उपग्रह देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करणार असून इंटरनेट क्षेत्रात क्रांती होईल, असे मानले जाते. म्हणूनच या कामगिरीचे महत्त्व अधिक आहे. खरे तर या आधी वर्षाच्या सुरुवातीला या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने इस्रोने एप्रिलमध्ये याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गयाना येथून परत मागवले होते. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावरच प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. साहजिकच इस्रोने दाखवलेली चिकाटी आणि घेतलेले परिश्रम यामुळेच सर्वात जड उपग्रह अवकाशात पाठवण्याचा विक्रम प्रस्थापित होऊ शकला. जगाच्या पाठीवर अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारताचे नाव चमकवण्याची कामगिरी यापूर्वीही इस्रोने अनेकवेळा केली आहे. शिवाय अवकाश संशोधनामध्ये भारताचा दबदबाही निर्माण झाला आहे. अगदी थोड्या कालावधीत इस्रोने केलेली आजपर्यंतची कामगिरी अचंबित करणारी आहे. सुमारे 50 वर्षापूर्वी या संस्थेकडे साधनांचा तुटवडा होता. तंत्रज्ञानही नव्हते.पण कमालीची जिद्द होती.

प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचे सुटे भाग सायकलवरून नेणे आणि आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहास बैलगाडीतून प्रक्षेपण स्थळावर नेण्याचे काम फक्‍त भारतासारख्या देशातच होऊ शकते. तेव्हापासून आजपर्यंत इस्रोने केलेली वाटचाल केवळ अभिमानास्पद आहे. आज अंतराळात उपग्रह सोडण्यासाठी जगातील अनेक प्रगत देशही भारताची मदत घेतात. अवकाशात उपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारपेठेत मोठा वाटा असलेल्या अमेरिकेचा आजही वरचष्मा असला तरी भारतानेही चार टक्के बाजारपेठ काबीज करून मोठी मजल मारली आहे. आपला उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च इतरांच्या तुलनेत कमी असल्याने आगामी काळात इस्रोने याहून मोठी झेप घेतली तर आश्‍चर्य वाटायला नको. इस्रोचे श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण स्थळ एक आदर्श ठिकाण आहे. म्हणूनच जगातील अनेक देश आपले उपग्रह भारताकडून प्रक्षेपित करण्यास इच्छुक आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीस एकाच वेळी 104 उपग्रह अंतराळात सोडण्याचा नवा विक्रम करून भारताने संपूर्ण जगाला आश्‍चर्याचा धक्‍का दिला होता. कारण त्याआधी रशियाने एकाच वेळी 37 उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.

इस्रोने आतापर्यंत 28 हून जास्त देशांचे 239 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करुन भारतीय अर्थव्यवस्थेला उत्पन्नाचा नवीन मार्ग उपलब्ध करून दिला आहे. सध्या जगभरातील उपग्रह प्रक्षेपणाची बाजारपेठ अब्जावधी रुपयांची आहे. या बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करण्याची क्षमता इस्रोमध्ये आहे. केवळ परदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यातच नाही तर भारताला उपयुक्‍त ठरेल अशी अवकाश कामिगिरी इस्रो सतत करीत आहे. इस्रोच्या “मंगळयान’ मोहिमेने 2013 मध्ये जगातील भल्याभल्या शक्‍तींची झोप उडवली होती. कारण आशियातून मंगळावर यान पाठवणारी इस्रो ही एकमेव अवकाश संस्था होती. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चीनलाही अद्याप मंगळावर स्वारी करणे जमलेले नाही. भारताची ही मोहीम यशस्वी होणार नाही, अशी टीकाही केली जात होती. पण हे मंगळयान 24 सप्टेंबर, 2014 ला मंगळावर यशस्वीरित्या पोहोचले आणि टीकाकारांची तोंडेही बंद झाली. त्यापूर्वी ऑक्‍टोबर 2008 मध्ये “चांद्रयान’ मोहिमेने तर इस्रोच्या कामगिरीला “चार चॉंद’ लावले होते.

चांद्रयान-1 हे यान 2009 पर्यंत चांगल्या प्रकारे कार्यरत होते. आता इस्रो यंदा चांद्रयान-2 ला पाठविण्याची तयारी करत आहे. ती मोहीमही फत्ते होईल यात शंका नाही. गेल्या वर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी यांनी 2022 पर्यंत अंतराळामध्ये भारतीयाला पाठविण्याची घोषणा केली. भविष्यात हे शक्‍य झाल्यास भारताच्या शिरपेचात मानाचे तुरे खोवणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्रासाठी हे एक मोठे यश असणार आहे. कारण राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक असले तरी ते “सोयूझ’ या रशियन अंतराळ यानातून गेले होते. अंतराळात माणसाला पाठविण्याचे तंत्र आतापर्यंत फक्‍त अमेरिका, रशिया व चीन या तीनच देशांकडे आहे.

भारतही लवकरच त्यांच्या पंक्‍तीत मानाचे स्थान पटकावेल, अशी खात्री इस्रोच्या आजपर्यंतच्या कामगिरीवरून वाटते. भारताच्या आजपर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांनी अवकाश संशोधनाला प्राधान्य दिल्याने या क्षेत्रात भारताला भरीव कामगिरी करता आली असली तरी आता जगात आघाडीचे स्थान पटकावण्यासाठी इस्रोला अधिक पाठिंबा आणि अधिक आर्थिक बळ देण्याची गरज आहे. परदेशी उपग्रह स्वस्तात आणि यशस्वीपणे प्रक्षेपित करण्याच्या इस्रोच्या वैशिष्ट्यालाही अधिक व्यापक करावे लागेल. अवकाश संशोधनासाठी सरकारने अर्थसंकल्पात जादा आर्थिक तरतूद करावी लागेल. तरच ही संस्था जगातील कोणालाही ऐकणार नाही आणि सतत नवनवीन अवकाश विक्रम करीत राहील यात शंका नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)