इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या महागड्या साहित्याची परस्पर विल्हेवाट

ट्रकचालकावर गुन्हा दाखल ः महाळुंगे इंगळे येथील थायसनकृप कंपनीतील प्रकार
महाळुंगे इंगळे -ट्रकमध्ये भरलेले आठ लाख साडेबारा हजार रुपये किमतीचे इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे महागडे साहित्य संबंधित कंपनीत न पोहचविता त्या साहित्याची स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला असून, याप्रकरणी फरारी ट्रकचालकावर शुक्रवारी (दि. 11) अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बलराम बलवान सिंग भारद्वाज (वय 26, सध्या रा. स्वप्ननगरी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बलराम यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी ट्रकचालक ब्रीजपाल गेनचंद सिंग (वय 40, मूळ रा. बुटीवाला, खेडा, विकासनगर, देहरादून, उत्तराखंड) याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील महाळुंगे इंगळे (ता. खेड) गावच्या हद्दीत थायसनकृप या नावाची कंपनी आहे. या कंपनीतून 26 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ब्रिजपाल याच्या ताब्यातील अभिलाषा लॉजीस्टिकमधील ट्रकमध्ये (एचआर 38 पी 6756) आठ लाख साडे बारा हजार रुपये किमतीचे 123 इलेक्‍ट्रॉनिक्‍स इलेव्हेटर साहित्य भरण्यात आले. हे लिफ्टचे इलेक्‍ट्रॉनिक साहित्य दिल्ली येथील एका कंपनीत द्यावयाचे होते. मात्र, आठ दिवस उलटूनही हे साहित्य संबंधित कंपनीत पोहचले नसल्याने अधिक खात्री केली असता, ब्रिजपाल याने या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावल्याचे आढळून आले. त्यामुळे बलराम यांनी येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक ब्रिजपाल याच्यावर येथील पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)