इलेक्‍ट्रीक बसची ट्रायल रखडली

जुलै महिन्याची मुदत संपली, चार्जिंग स्टेशनचे कामही रखडले

पुणे – प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत इलेक्‍ट्रॉनिक बस (ई-बस) सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रायोगित तत्वावर जुलै महिनाअखेर शहरात ई-बसची ट्रायल घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, ई-बसच उपलब्ध होत नसल्याने नियोजित ट्रायल रखडली आहे.

-Ads-

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत ई-बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार सुरवातीला भाडेतत्वावर 500 ई-बस खरेदी करण्याचे निश्‍चित करण्यात आले असून संबंधीत प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. सुरवातीला 150 आणि त्यानंतर 350 अशा दोन टप्प्यात या बसेस खरेदी करण्यात येणार आहेत. मात्र, देशातील कुठल्याच राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बस धावत नाहीत. तसेच, ई-बससाठी खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, तंत्रज्ञान, देखभालीसाठी तज्ज्ञांची कमतरता, स्वतंत्र चार्जिंग स्टेशन, देखभाल दुरुस्तीचा खर्च पाहता यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. यामुळे सुरवातीला प्रायोगिक तत्वावर शहरात एका इलेक्‍ट्रीक बसची ट्रायल घेण्याचे पीएमपी प्रशासनाने ठरवले होते. यासाठी दोन परदेशी कंपन्याही पुढे आल्या होत्या. यातील एका कंपनीकडून जुलैअखेर ट्रायलसाठी बस देऊ असे सांगण्यात आले होते. यानुसार पीएमपी प्रशासनाकडून मार्गही निश्‍चित करण्यात आला होता. मात्र, जुलै महिना संपला असून कंपनीकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. यामुळे ई-बसची ट्रायल रखडली असून आता परत याला कधी मुहूर्त लागणार याची वाट पाहावी लागणार आहे.

ट्रायलसाठी मार्गही निश्चित 
शहरात सुरवातीला ट्रायल बेसिसवर शहरात एक इलेक्‍ट्रीक बस धावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एका परदेशी कंपनीने पुढाकार घेत ट्रायलसाठी बस देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रशासनाकडून स्वारगेट ते पुणे स्टेशन दरम्यानचा मार्ग निश्‍चित करण्यात आला होता. बसच्या चार्जिंगसाठी स्वारगेटला चार्जिंग स्टेशन उभारण्याचेही ठरले होते. मात्र, ट्रायलसाठी बसच उपलब्ध होत नसल्याने हे काम रखडले आहे.

जानेवारी किमान 25 बसेस मार्गावर आणण्याचे ध्येय
इलेक्‍ट्रॉनिक बसेस भाडेतत्वार घेण्याला संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून वर्षाच्या सुरवातीला जानेवारीमध्ये शहरात किमान 25 ई-बसेस आणण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. मात्र, प्रशासनाकडून चाललेल्या नियोजनामुळे हे कितपत शक्‍य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)