इलेक्‍ट्रिक बसेसचे आव्हान पेलवेल का?

– गणेश राख

पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतुकीसाठी पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 2 हजार 93 बसेस आहेत. त्यापैकी जवळपास 300 ते 400 बस विविध कारणांमुळे धावत नाहीत. पर्यायाने नियोजित फेऱ्यांतील सुमारे 5 ते 6 हजार फेऱ्या दररोज रद्द होत असून यांसारख्या कारणांमुळे थेट उत्पन्नावर परिणाम होत आहे. तोट्यात चाललेल्या पीएमपीच्या ताफ्यात आता नव्याने 500 इलेक्‍ट्रिक बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला असून त्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. पण, जुन्या बसेसमुळे व्यवस्थापन कोलमडत असताना नवीन बसेस कितपत उपयोगी ठरतील, याबाबत प्रश्‍नच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इलेक्‍ट्रिक बसखरेदीसाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधी उपलब्ध करुन दिला गेला, तरी त्या सांभाळण्याची जबाबदारी पीएमपीकडेच असेल. ई-बससाठी खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, तंत्रज्ञान, देखभालीसाठी तज्ज्ञांची कमतरता, स्वतंत्र चार्जिंग स्टेशन, देखभाल दुरुस्तीचा खर्च पाहता यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात असलेल्या बसेसचे वेळापत्रक रोजच कोलमडत असून त्याची सुधारणा करणे पीएमपी प्रशासनासमोर आव्हान ठरत आहे. अशातच भाडेतत्वावर ई-बस आणण्याचा आणि त्या सांभाळण्याचा विचार प्रशासन करत आहे.

पीएमपीकडे सध्या 2 हजार 93 बसेस आहेत. यात 1,440 बसेस प्रशासनाच्या असून जवळपास 653 बसेस ठेकेदारांच्या आहेत. प्रवाशांची संख्या प्रचंड असली, तरी पीएमपी सध्या तोट्यात आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे त्यात आणखी भर पडत आहे. नियोजनानुसार जवळपास 1,700 बसेस रोज मार्गावर धावण्याचे ठरवण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात 1,300 च्या आसपास बसेस धावतात. दररोज होणाऱ्या फेऱ्यांच्या बाबतीतही असेच होत असून नियोजितपैकी तब्बल 5 हजार फेऱ्या दररोज रद्द होत असल्याचे वास्तव आहे. आहे त्याच बसेसचे वेळापत्रक रोज कोलमडत असताना नव्याने 500 ई- बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी ई-बसची संकल्पना मांडण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबात सकारात्मक चर्चा करण्यात आली. सुरूवातीच्या टप्प्यात 150 ते 200 बसेस घेण्याचे ठरले. दरम्यान, भाडेतत्त्वावर या बसेस खरेदी करण्यात येणार असून यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पुणे महापालिकेकडून 70, तर पिंपरी महापालिकेकडून 30 कोटी रुपये उपलब्ध होणार आहे. याचे चार्जिंग स्टेशन्स स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून उभे करण्यात येणार आहेत. या बसेसची खरेदी करण्यात आली तरी ते सांभाळण्याची जबाबदारी पीएमपीची असणार आहे. ई-बसच्या तंत्रज्ञानासाठी चांगल्या तज्ज्ञांची गरज आहे. चालू मार्गावर बसेस बंद पडणे, ब्रेकडाऊनचे वाढते प्रमाण, धिम्यागतीचे नियोजन यामुळे रोजच आव्हान उभे राहत असताना नव्याने ई-बस खरेदीचा निर्णय घेण्याचा विचार केला जात आहे. यावर खरोखरच विचार होण्याची गरज आहे.
———————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)