इलेक्‍ट्रिक कार्स 

मेघश्री दळवी 

भारतात आता तुरळक इलेक्‍ट्रिक वाहनं दिसायला लागली आहेत. प्रदूषण कमी करण्यासाठी ती उत्तम आहेतच, पण सोबत चालवायलाही ती बरीच स्वस्त पडतात. याच कारणासाठी इलेक्‍ट्रिक बसेस वापरात आणायच्या घोषणा होत आहेत. एकदा चार्ज केल्यावर या बसेस सुमारे 60 किलोमीटर धावू शकतात. त्यामुळे शहरातल्या सार्वजनिक वाहतुकीसाठी त्या चांगल्याच सोयीच्या पडतात. अनेक युरोपीय देशांमध्ये इलेक्‍ट्रिक बसेस वापरल्या जातात. काही ठिकाणी बसस्टॉपवरच चार्जिंग उपलब्ध करून देण्याच्या नामी युक्त्या वापरल्या जात आहेत. 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेट्रोल पंपप्रमाणे जागोजागी चार्जिंग स्टेशन्स उभी राहिली की साहजिकच इलक्‍ट्रिक वाहनांना मागणी वाढेल. म्हणून चार्जिंग स्टेशन्सचं जाळं उभारायला “फोर्ड’, पोर्श, बीएमडब्ल्यू, आणि फोक्‍सवॅगन पुढे सरसावल्या आहेत. तर स्वीडनमध्ये रस्त्यामधूनच वीज पुरवण्याचे प्रयोग करून पहाण्यात येत आहे. प्यूजो या गाड्या बनवणाऱ्या नामवंत कंपनीने नुकतंच जाहीर केलंय की येत्या दहा वर्षांत त्यांच्या 80 टक्के गाड्या इलक्‍ट्रिक असतील. इलेक्‍ट्रिक स्वयंचलित (सेल्फ ड्रायविंग) गाड्या हे त्यांचं लक्ष्य आहे. रेनो कंपनीने गेल्या वर्षांत पाच लाखाहून अधिक इलक्‍ट्रिक गाड्या विकल्या आहेत आणि येत्या पाच वर्षांत बावीस नवी इलेक्‍ट्रिक मॉडेल्स आणण्याची तयारी केली आहे.

व्होल्वो ही इंजिन बनवणारी मोठी कंपनी येत्या वर्षापासून खनिज इंधनावर चालणारी इंजिन्स बनवणं पूर्णपणे बंद करणार आहे, आणि आपलं लक्ष केन्द्रित करणार आहे फक्त इलेक्‍ट्रिक किंवा हायब्रिड इंजिन्स बनवण्यावर. टेस्ला या कंपनीने तर जगातलं प्रत्येक वाहन इलक्‍ट्रिक करण्याचा चंग बांधला आहे! इलेक्‍ट्रिक गाड्यांना एकदा चार्ज केल्यावर त्या किती अंतर कापू शकतात हा मुद्दा इथे खूप महत्वाचा ठरतो, आणि त्यामागे आहे बॅटरी तंत्रज्ञान. म्हणून “तोशिबा’, ‘डायसन’, ‘पॅनासोनिक’सारख्या बड्या कंपन्या या तंत्रज्ञानातल्या संशोधनावर भर देत आहेत. किमान 500 किमीपर्यन्त चालणारी बॅटरी अलीकडेच “फिस्कर’ या कंपनीने तयार केली आहे. या बॅटऱ्या जास्त मोठ्या करून चालत नाही, कारण त्यामुळे गाडीचं वजन वाढून वेगावर, कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे बॅटरीचा आकार-वजन आणि क्षमता यात समतोल राखणं हे मोठं आव्हान असतं.

त्यासाठी “लॅम्बर्गिनी’ ही कंपनी सुपरकपॅसिटर तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत आहे. तर फेरारीनेही आपलं स्वत:चं तंत्रज्ञान वापरून इलक्‍ट्रिक सुपरकार बनवण्याचा मनोदय मांडला आहे. लक्‍झरी गाड्यांच्या या स्पर्धेत मग “जाग्वार’ मागे कशी राहील? आपल्याकडे 2030 पासून विकल्या जाणाऱ्या गाड्या फक्त इलक्‍ट्रिक असतील अशी घोषणा भारत सरकारने केली आहे. शहरामध्ये दर पाच किमीला आणि हायवेवर दर 50 किमीवर चार्जिंग स्टेशन्स उभी करण्याची योजना आहे. इलेक्‍ट्रिक कार्स आणि बाईक्‍सच्या किंमतीमध्ये काही सवलत देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे आपल्याकडेही जमाना येतो आहे इलक्‍ट्रिक वाहनांचा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)