इराण व रशियावर अमेरिकेचे पुन्हा निर्बंध

वॉशिंग्टन – रशियाचा माजी गुप्तहेर आणि त्याच्या कन्येला ठार मारण्यासाठी रशियाने त्यांच्यावर ब्रिटनमध्ये विषारी वायूचा प्रयोग केल्याचे निश्‍चित झाल्यानंतर आता अमेरिकेने रशियावर नव्याने कडक निर्बंध घालण्याचे ठरविले आहे तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या खनिज तेल क्षेत्रावरही नोव्हेंबरमध्ये निर्बंध लादण्यात येणार आहे. इराणबरोबर कोणीही व्यापारी संबंध ठेऊ नका, असा इशाराही त्यांनी अन्य देशांना दिल्या आहेत. दरम्यान, इराणमध्ये या निर्बंधावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अमेरिकेविरोधात संताप व साशंकतेची भावना निर्माण झाली आहे.

सर्जेई स्क्रिपल आणि त्याची कन्या युलिया यांच्यावर मार्च महिन्यात हल्ला करण्यात आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. युलिया हिला एप्रिल महिन्यात रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले तर सर्जेई यांना मे महिन्यांत घरी पाठविण्यात आले होते. ब्रिटनचे नागरिक असलेल्या या दोघांची हत्या करण्यासाठी “नोव्हीचोक’ या विषारी वायूचा प्रयोग करण्यात आल्याने हे निर्बंध घालण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सॅलिसबरी शहरातील या हत्येच्या प्रयत्नामागे रशिया असल्याचा ब्रिटनने केलेला आरोप रशियाने फेटाळला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून रशियाच्या सरकारने आपल्याच नागरिकांविरुद्ध रासायनिक किंवा जैविक शस्त्रांचा वापर केल्याचे अमेरिकेचे ठाम मत आहे. त्यामुळे जवळपास 22 ऑगस्टपासून हे निर्बंध लादले जातील, अशी शक्‍यता आहे.

तर दुसरीकडे, इराणबरोबर अमेरिकेसह सहा प्रमुख देशांनी 2015मध्ये अणुकरार केला होता. मात्र, इराण या कराराचे पालन करत नसल्याचा आरोप करत, ट्रम्प यांनी मेमध्ये हा करार रद्द केला होता. तेव्हापासूनच इराणवरील दबाव वाढवताना, कडक निर्बंध लादण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यानुसार, त्यांनी हे निर्बंध जाहीर केले आहेत. या नव्या निर्बंधांमध्ये इराणला अमेरिकन डॉलरचे चलन मिळण्यावर बंधने घालण्यात आली आहेत.

तसेच, कार, कारपेटसारख्या उद्योगांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे, या निर्बंधांचे लागलीच परिणाम दिसून येणार नाहीत. मात्र, निर्बंधांच्या पुढील टप्प्यामध्ये खनिज तेलाच्या क्षेत्राचा समावेश असेल. चीन, भारत, तुर्की यांसारख्या प्रमुख देशांनी इराणकडून तेल खरेदी करण्यामध्ये कपात करण्याची अमेरिकेची सूचना पाळलेली नाही. त्यामुळे, पुढील टप्प्यातील निर्बंधांनंतर इराणबरोबरच या देशांवरही थेट परिणाम होऊ शकतो.

अमेरिकेचे निर्बंध अस्वीकारार्ह – रशिया
ब्रिटनमध्ये रशियाच्या माजी हेरावर आणि त्याच्या कन्येवर करण्यात आलेल्या विषारी वायूच्या प्रयोगामध्ये सहभाग असल्याच्या मुद्दयावरून अमेरिकेने रशियावर निर्बंध घालण्याचा घेतलेला निर्णय अस्वीकारार्ह असल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र वॉशिग्टनसमवेत रचनात्मक संबंध कायम राहतील, अशी रशियाला आशा आहे.

या हत्येच्या प्रयत्नांशी आमचा संबंध जोडणे आम्हाला मान्य नाही, तरीही रशियाचे अमेरिकेशी रचनात्मक संबंध राहतील, अशी आशा रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)