इराणचे अध्यक्ष हसन रौहानी दुसऱ्यांदा विजयी

तेहरान – इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांनी निर्णायक फेरनिवडणूकीत निर्विवाद विजय मिळवला आहे. जागतिक समुदायापुढे इराणची भूमिका मांडणे आणि अडचणीत आलेल्या अर्थकारणाची फेररचना करण्यात यश मिळाल्याबद्दल इराणच्या जनतेने त्यांना पुन्हा एकदा इराणच्या अध्यक्षपदी निवडून दिले आहे.
उदारमतवादी रौहानी यांनी 2015 साली जगातील प्रमुख देशांबरोबर झालेल्या आण्विक करारासाठी विशेष पुढाकार घेतला होता. देशातील 23.5 दशलक्ष जनतेपैकी 57 टक्के म्हणजे 15.8 दशलक्ष जनतेने रौहानी यांच्याबाजूने मतांचा कौल दिला आहे. तर 38.3 टक्के जनतेने रौहानी यांना आव्हान देणारे कट्टरवादी नेते इब्राहिम रईसी यांना मते दिली होती.
निवडणूकीत तब्बल 73 टक्के मतदान झाले होते. निवडणूकीपूर्वीच्या मतदारयाद्यांमध्ये तब्बल 20 दह्स्लक्ष नवीन मतदारांची वाढ झाल्याने निवडणूक यंत्रणेने काल झालेल्या मतदानाचा कालावधी काही तासांनी वाढवला होता. रौहानी यांच्या विजयाबद्दल इराणमध्ये विविध प्रसार माध्यमांकडून विश्‍वास व्यक्‍त होत होता. रौहानी यांना आव्हान देणारे रईसी हे स्वतःला गरिबांचे तारणहार संबोधत होते. पाश्‍चात्यांबरोबर अधिक कठोर संबंधांवर त्यांचा अधिक भर असे. मात्र उदारमतवादी रौहानी यांच्यावरचा ग्रामीण भागातील मतदारांचा विश्‍वासच सार्थ ठरला. इराणी जनतेला आर्थिक लोकप्रियतेवर आता विश्‍वास नाही, आणि कट्टरवादी बदलही नको होता,हेच यातून स्पष्ट होते.
इराणचे समर्थक असलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सर्वप्रथम रौहानी यांचे अभिनंदन केले आहे. युरोपियन संघाचे विदेश धोरणाचे प्रमुख मोगेरिनी यांनीही रौहानी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रशिया आणि युरोपिय संघाकडूनही इराणच्या आण्विक कराराचे जोरदार समर्थनच केले जाते आहे.

अमेरिकेचे नवनियुक्‍त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र इराणविरोधात मतप्रदर्शन केले होते आणि इराणबरोबरचा आण्विक करार मोडित काढण्याची धमकीही दिली आहे. त्यामुळे अजूनही रौहानी यांच्यापुढील आव्हाने संपलेली नाहीत. त्यातच ट्रम्प सध्या इराणचा प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असल्याने रौहानींच्या अडचणी वाढण्याचीच शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)