इराकी सैन्यावर इसिसकडून विषारी वायुचा वापर

ऑस्ट्रेलियाने केली मदत
कॅनबेरा – मोसुल परिसरात इस्लामिक स्टेटच्या गनिमांच्या विरोधात लढणाऱ्या इराकी लष्करावर तेथील इसिसच्या गनिमांनी विषारी वायुचा वापर केल्याची घटना घडली आहे. ंयात सहा सैनिकांना बाधा झाली असून त्यांच्या श्‍वसनात अडथळे निर्माण झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या रविवारी हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी इराकी सैन्याला आवश्‍यक ती मदत देण्याची तयारी ऑस्ट्रेलियाने दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबॉल यांनी म्हटले आहे की आमचेही काही सैन्य त्या भागात दोस्त राष्ट्रांबरोबर लढत आहे पण त्यांना मात्र या विषारी वायुच्या हल्ल्याची कोणतीही बाधा झालेली नाही. अशा प्रकारचा हल्ला प्रथमच करण्यात आला असून इराकी सैन्याला आम्हीं याबाबतीत आवश्‍यक ती मदत देऊ केली आहे असे ते म्हणाले. प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रावर कार्यरत असलेल्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्करी सल्लागारांनी हा नेमका कोणत्या प्रकारचा वायु होता याची तपासणी सुरू केली आहे. इराकी लष्कराला प्रशिक्षण देण्‌यासाठी सध्या ऑस्ट्रेलियाचे तीनशे लष्करी अधिकारी व जवान इराकमध्ये कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)