इराकमध्ये इसिसकडून आत्मघातकी बॉम्बस्फोटात 35 ठार

बगदाद- इराकची राजधानी बगदाद आणि दक्षिण इराकमधील चेकपॉईंटवर इस्लामिक स्टेटने घडवलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये किमान 35 जण ठार झाले आणि अनेकजण जखमी झाले, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. काल रात्रीच्या सुमारास हे आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. इराकमधील मोसूल शहर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी इराकी फौजांनी इस्लामिक स्टेटच्याविरोधात गेल्या सात महिन्यांपासून मोठी मोहिम उघडलेली असताना हे आत्मघातकी हल्ले झाले आहेत.
बगदादमध्ये दक्षिणेकडील अबू दशीर भागातल्या चेकपॉईंटवर झालेल्या आत्मघातकी कारबॉम्बच्या स्फोटामध्ये किमान 24 जण ठार झाले. तर 20 जण जखमी झाले. या हल्ल्याच्यावेळी एका हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. मात्र दुसऱ्या हल्लेखोराने कारबॉम्बचा स्फोट घडवून आणला. इस्लामिक स्टेटने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली. दक्षिण इराकमधील बसरा शहराजवळच्या चेकपॉईंटवर दुसरा मोठा आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 11 जण ठार झाले आणि 30 जण जखमी झाले. याच भागात स्फोटकांनी भरलेली कार सोडून जाणारा आणखी एक दहशतवादी सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात मारला गेला.
इराकच्या उत्तर आणि पश्‍चिमेकडील मोठ्या भागावर इस्लामिक स्टेटने 2014 मध्ये ताबा मिळवला होता. त्यापैकी बहुतेक भाग सुरक्षा रक्षकांनी आतापर्यंत परत मिळवला आहे. तिरकीत, रमादी आणि फैजुल्ला ही शहरे आतापर्यंत इराकी फौजांनी परत मिळवली आहेत. तर मोसूल शहरासाठी फौजांची मोहिम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)