इरफानचा आजार नेमका काय आहे?

बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता इरफान खानने काही दिवसांपूर्वी मी एका दुर्धर आजाराशी लढत असल्याचे ट्विट केले. काहींना हा येणाऱ्या चित्रपटासाठीच्या प्रसिद्धीचा स्टंट वाटला. पण पाठोपाठ त्याच्या पत्नीनेही चाहत्यांना सदिच्छांसाठी आवाहन केले आणि प्रकरणातील गांभीर्य लक्षात आले. थोड्याच दिवसांनी इरफानने मी न्युरोएंडोक्राईन ट्युमर या आजाराशी लढत असल्याचे स्पष्ट केले. काही वर्षांपूर्वी ऍपलचा संस्थापक आणि सीईओ स्टीव्ह जॉब्सलाही याच आजाराने ग्रासले होते. जगातील सुमारे साडेचार लाख नागरिक या आजाराचा सामना करत आहेत. काय आहे हा आजार?

अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर झाल्याचे उघड झाल्याने चाहत्यांना धक्‍का बसला आहे. आपल्याकडे मुळातच कर्करोग किंवा कॅन्सरचे नाव घेतले की आपल्या काळजात धस्स होते. प्रत्येक कर्करोग हा धोकादायक नसल्याचे सांगितले जात असले तरी कॅन्सर आजाराने आपल्या मनात भीती असते, हे तितकेच खरे. याशिवाय अनेक चित्रपटातून देखील या आजाराला भयंकर रूपातून दाखवले गेले आहे. कॅन्सरवरील उपचाराची प्रक्रिया दीर्घकाळ चालणारी असते. हा आजार दुर्धर आणि असाध्य मानला जात असला तरी प्राथमिक पातळीवर योग्य उपचार केले असता रुग्ण बरा होऊ शकतो, हेही तितकेच खरे आहे. मात्र सर्वात मोठी समस्या म्हणजे एखाद्याला कर्करोग झाल्याची माहिती ही खूप उशिराने कळणे होय. साहजिकच उपचाराला विलंब होत जातो आणि अखेर हा प्रवास मृत्यूच्या दारी जातो. इरफान खानला जो कर्करोग झाला आहे, त्याच प्रकारचा कर्करोग काही वर्षांपूर्वी ऍपलचा संस्थापक आणि सीईओ स्टीव्ह जॉब्सला झाला होता. त्यावेळीही या आजाराबाबत बरीच माहिती उजेडात आली होती. अमेरिकेत एकूण 1200 जण या प्रकारच्या दुर्मीळ आजाराने ग्रस्त आहेत. ही आकडेवारी सरासरीच्या गणितातून काढलेली नाही, ज्यांना आजार झाला आहे, त्यांचाच हा आकडा आहे. लोकसंख्या आणि सरासरीच्या आधारावर काही आडाखे बांधले जात आहेत. मात्र, ती आकडेवारी खरी नसल्याचे सांगितले जाते. काही प्रकरणात हा आजार होऊनही अनेकांना समजत नाही.

न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर म्हणजे काय
या आजारात अंर्त:स्रावातील ग्रंथीवर परिणाम होतो. अंर्त:स्त्रावी ग्रंथी या
हार्मोन्स प्रसारित करत असतात आणि त्याचे नियंत्रण तांत्रिक तंत्राने होते. अंर्त:स्रावात कोशिकांची अनियंत्रित वाढीमुळे कर्करोगाची शक्‍यता बळावते. जगातील सुमारे साडेचार लाख नागरिक या आजाराचा सामना करत आहेत. एका अंदाजानुसार 2025 पर्यंत न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरने ग्रस्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे साडेपाच लाख होईल. अमेरिकेत सुमारे 12 हजार नागरिक दरवर्षी या आजाराला बळी ठरत आहेत. अनेक पातळीवर हा आजार आनुवंशिकतेने होऊ शकतो. जर आई-वडिलापैकी कोणी एक जण या आजाराने ग्रासले असेल तर
मुलांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता अधिक असते. जर एखाद्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता कमकुवत असेल तर तो आजारी होण्याची शक्‍यता वाढते. अधिक काळ उन्हात राहिल्याने अल्ट्रा व्हॉलेट किरणामुळे शरीरावर अधिक परिणाम होतो आणि त्यामुळे आजाराची शक्‍यता बळावते. मात्र, सर्वच लक्षणे न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर कर्करोगाची असतात असे नाही.

काहींच्या मते, आकडेवारीचा विचार केला तर एक लाखपैकी केवळ पाच जणांना हा आजार होऊ शकतो. अभिनेता इरफान खानने जेव्हा या आजाराची माहिती ट्विट करून दिली तेव्हा प्रत्येकालाच धक्‍का बसला. यावेळी त्याने अजून खूप चाचण्या राहिल्या असल्याचे सांगून लवकरच आजारही सांगू असे नमूद केले. शेवटी त्याने न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर म्हणजे एनईटीचा सामना करत असल्याचे सांगितले. हा आजार नेमका कसा आहे, याची उत्सुकता लोकांना लागली. तसे पाहिले तर आजार कोणताही असो तो रुग्णांना भावनेच्या पातळीवर कमकुवत करतो. भारताचा विचार केला तर सुमारे 55 हजार नागरिक या दुर्मीळ आजाराला बळी ठरू शकतात. कारण एक लाखामागे पाच जण असे या आजाराचे प्रमाण आहे. जर वेळेवर आजार कळाला नाही तर तो कर्करोगाचे रूप धारण करू शकतो. त्याची सुरुवात शरीरातील कोणत्याही भागातील ट्यूमरपासून होते. या आजारावर उपचार आहेत, मात्र वेळेवर निदान न केल्यास कर्करोगाची शक्‍यता बळावते. 60 टकक्‍यांहून अधिक नागरिकांसाठी न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर कार्सिनोमा प्रकार हा कर्करोगाचाच एक भाग असतो. ट्यूमर हा कर्करोगाचा असेल तर त्याच्या श्रेणीनुसार रुग्णांचे आयुष्य अधिकाधिक पाच वर्षापर्यंतं असू शकते.

न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरची लक्षणे:

शरीरातील कोणत्या भागात आणि कोठपर्यंत पसरला आहे यावर न्यूरोएंडोक्राईनची लक्षणे अवलंबून असतात. याशिवाय ट्यूमर फंक्‍शनल आहे की नॉन फंक्‍शनल आहे, यावरही काही बाबी अवलंबून आहेत. आपल्याकडे न्यूरोएंडोक्राईनचे असे अनेक रुग्ण आहेत की त्यांना आजार असूनही अनेक वर्षे ते जगत आहेत. मात्र, ग्रेड तीनमध्ये हा ट्यूमर जीवघेणा ठरू शकतो. अभिनेता इरफान खानला कोणत्या ग्रेडचा ट्यूमर आहे, हे समजू शकले नाही. सामान्यतः ताणतणाव, घबराट होणे, ताप, उलटी येणे, रक्‍तदाब वाढणे, अस्थिर वाटणे, बेशुद्ध पडणे, अनेक दिवस अतिसाराची तक्रार, सारखी लघवी येणे, भूक वाढणे, तहान वाढणे या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. न्यूरोएंडोक्राईन ट्यूमरच्या उपचारासाठी अलिकडेच फूड अँड ड्रग
ऍडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने एका नवीन उपचाराला मान्यता दिली आहे. एफडीएने एक रेडियोऍक्‍टिव्हच्या औषधाला मंजुरी दिली आहे ज्यातून रुग्णाला वाचवणे शक्‍य आहे. या नवीन उपचाराचे नाव लुथाहरा असे आहे. हे पूर्वी रेडिओऍक्‍टिव्ह औषध होते.

भारताचा विचार करता प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगतज्ज्ञ आणि कर्करोगनिदान केंद्रे उपलब्ध नसल्यामुळे निदान उशिराने होणे ही सर्रास आढळणारी समस्या आहे. आपल्याकडील लोकसंख्येचा मोठा भाग हा उपचार करण्यासाठी रुग्णालयांपर्यंत जात नाही. म्हणून रुग्णांची संख्या वाढत जाते. तसे पाहिले तर आपल्याकडे आरोग्य सुविधांसाठी सार्वजनिक निधीची तरतूद नेहमीच अपुरी राहिली आहे. सामान्य आजारांच्या उपचारासाठी देखील ही तरतूद त्रोटक ठरते. खरे पाहता, काही आजारांच्या उपचारासाठी विशेष तरतूद करणे अनिवार्य ठरलेले आहे, जेणेकरून रुग्णांना किमान आपल्या आजाराची तरी माहिती समजेल. कर्करोगासारख्या किचकट आणि असाध्य आजारावर उपचाराची जी पद्धत उपलब्ध आहे, ती महागडी असून सामान्य माणूस त्यापुढे टिकू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडे अशा आजारांबाबत अधिक काळजी घेण्याची आणि उपाययोजनांची गरज आहे. इरफान खानसारख्यांना त्यावर उपचार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे; मात्र कित्येकांना हा आजार जडला आहे हेच कळत नाही, कळाले तरी उपचाराला पैसे नसतात. म्हणूनच यासंदर्भातील लक्षणांबाबत आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सजग राहणे आवश्‍यक आहे.

डॉ.संजय गायकवाड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)