इम्रान खान यांच्या निवडीने शांतता प्रक्रियेला चालना मिळेल – नवज्योत सिद्धु

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांची निवड झाल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांतता प्रक्रियेला चालना मिळेल अशी अपेक्षा पंजाब मधील एक मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धु यांनी व्यक्त केली आहे. इस्लामाबादेत आज झालेल्या इम्रान खान यांच्या शपथविधी सोहोळ्याला उपस्थित असलेल्यांमध्ये सिद्धु हे एक महत्वाचे पाहुणे होते. त्यांना तेथे पहिल्या रांगेतील आसनांमध्ये जागा देण्यात आली होती.

पाक लष्कराचे प्रमुख जनरल बाजवा आणि पाक व्याप्त काश्‍मीरचे अध्यक्ष मसूद खान यांच्या शेजारीच सिद्धू यांना जागा देण्यात आली होती. पाक लष्कर प्रमुखांनी सिद्धु यांच्याशी अत्यंत जवळीकीने गप्पा मारल्या आणि त्यांनी त्यांना अलिंगन दिल्याचेही तेथे पहायला मिळाले. सिद्धु यांचे काल लाहोर मार्गे पाकिस्तानात आगमन झाले. पाकिस्तानात झालेल्या या सत्ताबदलाचे त्यांनी स्वागत केले.

नवीन पंतप्रधान इम्रान खान हे भारताबरोबर शांततेचा प्रस्ताव घेऊन पुढे येतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या शपथविधीच्या कार्यक्रमाला आपण राजकारणी म्हणून नव्हे तर इम्रान खान यांचे मित्र म्हणून उपस्थित राहिलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकारांनी त्यांना आपण इम्रानखान यांच्यासाठी काय भेट आणली आहे असे विचारता सिद्धु यांनी आपण त्यांच्यासाठी काश्‍मीरी शाल आणली असल्याचे नमूद केले.

सुनिल गावसकर आणि कपिल देव या भारतीय क्रिकेटपटूंनही इम्रानखान यांनी आजच्या कार्यक्रमासाठी व्यक्तीगत निमंत्रण दिले होते पण पुर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण उपस्थित राहु शकत नसल्याचे त्यांनी कळवले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)