सर्व शिक्षक मंडळाचा सत्ताधाऱ्यांना इशारा; गैरव्यवहारांचे आरोप
प्रभात वृत्तसेवा
नगर – विकास मंडळाच्या इमारतीसाठी शिक्षक बॅंकेतील सभासदांच्या ठेवीला हात घातल्यास संचालक मंडळाला तीव्र विरोधाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सत्ताधारी गटाच्या विरोधातील सर्वंच शिक्षक मंडळांनी दिला आहे. शिक्षक बॅंकेच्या कारभारावर ताशेरे ओढताना त्यात गैरव्यवहार झाल्याचे आरोपही या नेत्यांनी केले.
महाराष्ट पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुनील जाधव, इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा)चे राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय काटकर, जिल्हा सचिव एकनाथ व्यवहारे, “इब्टा’चे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष अशोक नेवसे, जिल्हाध्यक्ष नवनाथ अडसूळ, गुरूकुल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संजय धामणे, सदिच्छा मंडळाचे रवींद्र पिंपळे, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे राजेंद्र शिंदे, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राजेंद्र निमसे, ऐक्‍य मंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, एल. पी. नरसाळे, राजेंद्र ठोकळ, शरद कोतकर आदी शिक्षक नेत्यांनी एकत्रित येत शिक्षक बॅंकेच्या सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सत्ताधाऱ्यांनी चर्चेसाठी दिलेले निमंत्रण दिले होते; परंतु त्यावर सर्व विरोधकांनी एकत्रित बहिष्कार घातला. सत्ताधाऱ्यांनी अगोदरच भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. सर्वसाधारण बैठकीत जे निर्णय व्हायचे, ते होऊ द्या, असे ते म्हणाले.
गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण सभेत विकास मंडळाच्या इमारतीसाठी निधी द्यायला विरोध केला होता, तोच मुद्दा संचालक मंडळाने पुन्हा पुढे आणला आहे. इमारत बांधण्याची चर्चा करताना कुणालाही विश्‍वासात घेतले नाही. जुनी इमारत पाडल्यानंतर ते सभासदांना कळले. सत्ताधारी गुरूमाउली मंडळातही एकवाक्‍यता राहिलेली नाही. संचालकांना गुरूमाउली मंडळाचा विरोध आहे, असे निदर्शनास आणून संचालकांनी आमच्या सहकार्याची अपेक्षा धरू नये. भ्रष्ट कारभारास पूर्ण क्षमतेने विरोध करू.
नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेला अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी वेठीस धरले असल्याचा आरोप करून हे नेते म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेने शिक्षक बॅंकेच्या मनमानी कारभारावर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधाचे पत्र संचालकांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अगोदर सभासदांसमोर ठेवणे आवश्‍यक आहे. संचालकांची ती जबाबदारी आहे; परंतु ती ते पाळत नाही. डीसीपीएस सभासदांच्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर दहा लाख रुपये अनुदान द्यावे तसेच सभासदांच्या ठेवीला हात लावण्याच्या दोन मागण्या मान्य न केल्यास सभासदांच्या तीव्र भावना रोखू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी वार्षिक बैठकीस येणार असतील, तर त्याचे समन्वय समिती स्वागत करेल.

शाळेत होते, की प्रवासात?

शिक्षक बॅंकेच्या संचालक मंडळाने नेवासे शाखेतील फर्निचरसाठी 23 लाख रुपये खर्च केले आहेत. लाखो रुपयांचा प्रवास भत्ता उकळला आहे. संचालकांनी घेतलेल्या शेकडो बैठका पाहता ते शाळेत शिकवीत होते, की सातत्याने प्रवास करीत होते, असा सवाल समन्वय समितीने केला आहे. सत्ताधाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीखाली आपला भ्रष्ट कारभार झाकू नये, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)