इन्टेन्सिटी रनला 10 सप्टेंबर रोजी पुण्यात प्रारंभ

भारतातील 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये 10 किलोमीटरची शर्यत

विजेत्यांकरिता एकूण 50 लाखांची बक्षिसे

पुणे – भारतातील सर्वात मोठी सर्किट असलेली 10के इन्टेन्सिटी रन पुण्यात 10 सप्टेंबर 2017 रोजी सुरू होणार आहे. त्यानंतर इंदोर, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, बडोदा, दिल्ली आणि 11 फेब्रुवारी 2018 रोजी गोवामध्ये संपेल. अँडी इव्हेंट मॅनेजमेंटने ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने देशातील दहा शहरांमध्ये या उपक्रमाच्या पहिल्या आवृत्तीची घोषणा करण्यात आली.

यावेळी खेलरत्न पुरस्कार विजेते हॉकीपटू धनराज पिल्ले, महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे सरचिटणीस प्रल्हाद सावंत आणि प्रो कबड्डी लीगमधील पुणेरी पलटण संघाचा कर्णधार दीपक हूडा, उपकर्णधार धर्मराज चेरलाथान, तसेच संदीप नरवाल आणि गिरीश मारुती एरकीन हे खेळाडू उपस्थित होते.

या स्पर्धेतील धावपटूंसाठी 10 किमी, 5 किमी आणि 2 किलोमीटर असे तीन गट आहेत. हौशी आणि स्पर्धात्मक धावपटू 10 किमी शर्यतीसाठी नोंदणी करू शकतील. तसेच उदयोन्मुख मुले व मुली 2 किमी फ्युचर चॅम्पियन्स दौडीसाठी नोंदणी करू शकतील. धावपटूंमध्ये अधिक उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमात 5 किमीचा “फन रन’ देखील आयोजित करण्यात आला आहे.

याप्रसंगी अँडी इव्हेंट मॅनेजमेंटचे संस्थापक आणि संचालक आनंद मेनेन्झेस म्हणाले, 10 के उपक्रम चालविल्यामुळे आम्ही जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचून हरित, स्वच्छ व आरोग्यदायी भारत हा उपक्रम राबवणार आहोत. इंडियन ऑलिम्पियन असोसिएशनच्या पाठिंब्याने आम्ही माजी आणि सध्याच्या ऑलिम्पियन खेळाडूंना एकत्रितरित्या तयार केलेल्या पैशाचा एक भाग दान करणार आहोत. आम्ही केवळ विद्यमान खेळाडूंना प्रोत्साहनच देत नाही, तर भविष्यात ऑलिम्पियनही तयार करण्यास प्रोत्साहन देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

पुणेरी पलटण संघाचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले, 10के इन्टेन्सिटी रन या कार्यक्रमाशी संलग्न होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोणत्याही खेळामध्ये तंदुरुस्ती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. कबड्डी आणि धावणे ही टिकून राहण्याची क्षमता वाढवून उत्तम फिटनेस व्यवस्था विकसित करण्याचा सर्वोत्तम व्यायाम आहे.
पुणेरी पलटणचे कर्णधार दीपक हूडा म्हणाले, आरोग्य आणि फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करणे हा एक उत्तम उपक्रम आहे. तंदुरुस्तीबद्दल जागरूक असणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या कबड्डी खेळाडूंसाठी फिटनेस ही तीन महिन्यांच्या हंगामासाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली आहे. खेळाडू म्हणून एका सामान्य पार्श्वभूमीतून मी आलो आहे. मला अतिशय आनंद होत आहे की जागरूकता निर्माण करण्याबरोबरच हा कार्यक्रम ऑलिम्पियन संघटनेद्वारे ऑलिम्पिकपटू आणि त्यांच्या अकादमीसाठी देखील निधी उपलब्ध करून देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)