मंचर- पेठ (ता. आंबेगाव) येथील पुणे-नाशिक हमरस्त्यावर मंगळवारी (दि. 2) सायंकाळी 4 वाजता भरधाव वेगात आलेल्या इनोव्हा कारने दोन मोटारसायकलला जोरदार धडक दिली. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर इनोव्हा चालक कार सोडुन पळुन गेला आहे.
मृत व्यक्तीचे नाव प्रफुल्ल उत्तम शिंदे (वय 26, रा. पेठ) आहे. तर विशाल करळे (18) व अरुण कोंडिभाऊ धुमाळ (वय 48) जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पेठ बायपास नजीक असणाऱ्या रानवारा पेट्रोलपंपावरुन विशाल करळे व अरुण धुमाळ (एम. एच. 14 बी. एल. 6067) या दुचाकीवरुन पेठ गावाकडे जात होते. त्यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या (एम. एच. 39 व्ही. 5055) या इनोव्हा कारने दुचाकीला धडक जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचालक गाडीसह पळुन गेला. पुढे पेठ गावाच्या बायपास वरुन युटर्न घेउन चालक भांबावलेल्या अवस्थेत हमरस्त्याच्या दुसऱ्या लेनने मंचरच्या दिशेने माघारी येत होता. त्यावेळी त्याने अपघात केलेल्या स्थळानजीक आणखी एका दुचाकीला (एम. एच. 14 ए. ए. 2547) धडक दिली. त्यामध्ये दुचाकी चालक प्रफुल्ल उत्तम शिंदे जागीच ठार झाले. अपघातात जखमी झालेले अरुण धुमाळ आणि विशाल कराळे यांना मंचर येथील रिद्धी सिद्धी हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. मृत प्रफुल्ल शिंदे यांचा मृतदेह मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. इनोव्हा कारचालकाचे नाव समजु शकले नाही. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आर. सी. हांडे, एम. डी. भालेकर यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. मंचर पोलीस इनोव्हा कारचालकाचा शोध घेत असून अज्ञात कारचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा