इथे मरण झालयं स्वस्त

ढासळलेले संरक्षक कठडे देताहेत अपघातास निमंत्रण
पसरणी घाटातील प्रवास ठरतोय धोकादायक
बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
वाई, दि. 8(प्रतिनिधी) वाई-पाचगणी मुख्य रस्त्यावर पसरणी घाटात अनेक ठिकाणी वाहनांच्या धडकेने संरक्षक कठडे ढासळलेले आहे. या कठड्यांची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाला मुहूर्त सापडलेला नाही. अनेक ठिकाणी ढासळलेल्या कठड्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या ढासळलेल्या कठड्यांमुळे पसरणी घाटातील परिस्थिती ही “इथे मरणही झालयं स्वस्त’ अशी झाली आहे.
निकृष्ठ दर्जाच्या कठड्याच्या बांधकामामुळे अनेक अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आलेले आहे. अपघातात लाखो रुपयांच्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला संबंधित विभाग जबाबदार आहे. तरी ढासळलेल्या कठड्यांसंदर्भात बांधकाम विभागाने त्वरित उपाय योजना करून वाहन धारकांच्या व पर्यटकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवावा, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
पसरणी घाटातून प्रवास करताना जीवावर उधार होवूनच करावा लागत आहे. घाटात अनेक महिन्यांपासून ढासळलेल्या अवस्थेत संरक्षक कठडे आहेत. निधी मिळत नसल्याचे कारण देत बांधकाम विभाग हातावर-हात ठेवून बसले आहे. घाटात सध्या अपघाताची मालिकाच चालू आहे. किती अपघातानंतर बांधकाम विभागाला जाग येणार असा प्रश्न पाचगणी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटक व स्थानिक प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे. जीव मुठीत घेवून वाईतून पाचगणीला जाणाऱ्या प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मुळातच अरुंद घाट असल्याने वाहतुकीची कोंडी ही नित्याची बाब झाली आहे.
बांधकाम विभागाचा वेळकाढूपणा हा प्रवाशांच्या मुळावर उठला आहे. भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे अनेक पादचाऱ्यांसुध्दा जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण न झाल्यास पसरणी घाटात अतिशय विचित्र परिस्थिती उद्भवू शकते. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार थांबवून त्वरित घाटातील संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रवाशांची परवड थांबवा
बांधकाम विभागाने निधीचे कारण पुढे न करता त्वरित हालचाल करून संरक्षक कठड्यांची उभारणी करुन प्रवाशांची होत असलेली परवड थांबवावी. ढासळलेल्या कठड्याच्या ठिकाणी त्वरित उपाय योजना कराव्यात. ढासळलेल्या कठड्यांना फक्त वाळूने भरलेल्या पोत्यांचा आधार आहे. संपूर्ण घाटात ढासळलेल्या ठिकाणी वाहनांच्या अपघातानेच संरक्षक कठडे ढासळले आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी पसरणी घाटात खतांच्या पोत्यांनी भरलेला ट्रक कठडा तोडून दोनशे फुट दरीत कोसळला होता. चालक हाच मालक होता. त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला होता त्या दिवसांपासून मालानी भरलेला ट्रक आजही दरीतून बाहेर काढला नाही.

दुरुस्तीची कामे तातडीने करावीत
संबंधित विभागाने डोळ्यावर पट्टी न बांधता त्वरित घाटातील दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, आशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे. त्यातच ढासळलेल्या कठड्यांची भीती मनात धरूनच या घाटातून प्रवास करावा लागतो. तालुक्‍याच्या लोकप्रतीनिधिनी घाटाच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ केला होता. हा निव्वळ फार्स ठरला असून या संबंधी बांधकाम विभागाला स्थानिकांकाधून विचारणा करण्यात येत आहे. तरी ढासळलेले कठडेसुध्दा दुरुस्त करावेत व अपघाताचे प्रमाण कसे कमी होईल याकडे प्रामाणिक पणे प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)