इथं नांदते उद्योजकता

उद्योगांची भरभराट कशी होते, हे एव्हाना जगाला चांगलंच माहीत आहे. भागधारकांच्या पैशातून कंपन्यांची उलाढाल होत असते. अर्थात कंपन्याच्या पदरी असलेले बडे नोकरदार कंपन्यांना कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक करायची, याचा सल्ला देत असतात. त्यातून गुंतवणूक केली जाते. सामान्य माणूस मोठा उद्योजक होण्याच्या घटना अपवादात्मक असतात. त्यांचं प्रमाण फारच कमी असतं. उद्योजकता रक्तात असते, असं म्हणतात. अर्थात उद्योगात यशस्वी होण्याची गुणसूत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित होत असतात, असं नव्हे. विज्ञानानं तरी तसं कुठंही म्हटलेलं नाही. तसं असतं, तर यशस्वी उद्योजकाचा एक मुलगा उद्योगात यशस्वी होताना, दुसऱ्याला मात्र तेवढं यश मिळत नाही. अशी अनेक उदाहरणंही आपल्यापुढं आहेत. चांगले कल्पक अधिकारी ज्याला सांभाळता येतात, त्यालाच उद्योगाची नवनवी क्षेत्र खुणावत असतात. मुकेश अंबानी व अनिल अंबानी ही उदाहरणं त्यासाठी पुढं येत असतात. जगात नुकतंच एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्याचे निष्कर्ष पाहिले, तर ठराविक कुटुंबांचंच उद्योग जगतावर कसं प्रभुत्त्व आहे, हे लक्षात येतं. अर्थात यापूर्वीच्या एका सर्वेक्षणात भारत, पाकिस्तान अशा देशांत संपत्तीचं असमान वितरण होत असून “आहे रे’ आणि “नाही रे’ वर्गातील असमानतेची दरी उंचावत गेली, तर त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचीच जास्त शक्‍यता असते. काश्‍मीरचा प्रश्‍न गंभीर होण्यासही सामाजिक असमानतेची दरी कारणीभूत आहे, हे वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या पाहणीतून पुढं आलं आहे.
जगात ठराविक कुटुंबाच्या हाती उद्योगाच्या नाड्या कशा आहेत, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलं आहे. “2018 मधील क्रेडिट स्युझ फॅमिली 1000′ या नावानं हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. “क्रेडिट स्युझ रिसर्च इन्स्ट्यिूट’ चा हा अहवाल अभ्यासण्यासारखा आहे. कुटुंबाशी निगडीत व्यवसायाची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. कुटुंबांच्या मालकीच्या व्यवसायात जगात आघाडीवर असलेले देश पाहिले, तर चीन, अमेरिका आणि त्यानंतर भारताचाच क्रमांक लागतो. चीन हा साम्यवादी देश असला, तरी तिथंही कुटुंबाची मालकी असलेल्या उद्योजकांची संख्या जगात सर्वांधिक असणं हे जरा आश्‍चर्यकारक वाटण्यासारखं असलं, तरी ती वस्तुस्थिती आहे, हे नाकारता येणार नाही. भारतातील 111 कुटुंबांकडं मोठमोठे उद्योग केंद्रीत झाले आहेत. त्यांची संपत्ती 839 अब्ज डॉलरची आहे. चीनमध्ये 159 कुटुंबांची मालकीचे उद्योग आहेत, तर अमेरिकेत 121 कुटुंबांकडं मोठ्या उद्योगांची मालकी आहे. आशिया खंडातील जपान वगळता उर्वरित आशियायी देशांची यादी पाहिली, तर ठराविक कुटुंबांकडं मालकी असलेल्या उद्योजकांत चीन, भारत आणि हॉंगकॉंग हे प्रभावी देश आहेत. ठराविक कुटुंबाच्या या उद्योजकांचा मार्केट शेअर 2.85 ट्रिलियन डॉलर आहे. हे प्रमाण एकूण भांडवलाच्या 71 टक्के आहे. इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स आणि थायलंड या चार देशात प्रत्येकी 26 कुटुंबांकडं उद्योगांची मालकी आहे. दक्षिण कोरियात 45 कुुटुंबांत मोठमोठ्या कंपन्या एकवटल्या आहेत. त्यांची मालमत्ता 434.1 बिलियन डॉलर आहे. जगातील ठराविक कुटुंबांच्या ताब्यात असलेल्या उद्योजकांची मालमत्ता चार ट्रिलियन डॉलर आहे. नॉन-जपान एशियन रिजनमधील कंपन्यांकडील मालमत्तांचं प्रमाण जगातील एकूण मालमत्तेतील प्रमाण 53 टक्के आहे.
ठराविक कुटुंबांची मालकी असलेल्या कंपन्यांचा परतावा इतर कंपन्यांपेक्षा जास्त आहे. जपान वगळता अन्य आशियायी देशातील कंपन्यांनी गुंतवणुकीवर त्यांच्या भागधारकांना 25.63 टक्के परतावा दिला आहे. कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसलेल्या उद्योजकाच्या कंपन्यांपेक्षा तो कितीतरी पटीनं जास्त आहे.
भारतीय कंपन्यांच्या आर्थिक प्रगतीची आणि गुंतवणूकदारांना दिलेल्या परताव्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 2006 पासून उद्योजकतेचा कौटुंबिक वारसा असलेल्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 13.9 टक्के परतावा दिला, तर उद्योजकतेची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेल्या कंपन्यांनी अवघा सहा टक्के परतावा दिला. आशियायी देशांत प्रगत देशांचं प्रमाण कमी असलं, तरी जगाशी तुलना केली, तर मोठ्या कंपन्यांमध्ये आशियायी कंपन्यांची संख्या जास्त आहे. जगातील पन्नास कंपन्यांत आशियायी देशातील कंपन्यांची संख्या 24 आहे. या कंपन्यांचं भाग-भांडवल 748 अब्ज डॉलर आहे. त्यातही उद्योजकीय पार्श्‍वभूमी असलेल्यांत 12 भारतीय कंपन्या आहेत. याचा अर्थ आशिया खंडातील ठराविक कुटुंबाकडं उद्योजकांची मालकी असलेल्या आणि जगातील प्रभावशाली कंपन्यांत गणना केलेल्या कंपन्यांत भारतीय कंपन्यांची संख्या आशिया खंडात निम्मी असून त्यांचं भाग-भांडवल 199 अब्ज डॉलर आहे. अर्थात कंपन्यांची संख्या आणि भाग-भांडवलाचं प्रमाण व्यस्त आहे. आशिया खंडातील चांगल्या पन्नास कंपन्यांत भारतीय कंपन्यांची संख्या तीस आहे. इथं ही भारतीयांनीच आपला झेंडा उंच रोवला आहे. ठराविक कुटुंबांच्या घरी उद्योजकता पाणी भरीत असली, तरी त्यांनीच प्रगती करून दाखविली आहे, हे विसरता येणार नाही.
हे खरं असलं, तरी ठराविक लोकांकडं संपत्ती केंद्रीत होणं ही चिंताजनक गोष्ट आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वी “ऑक्‍सफॅम’ या संस्थेनं दिलेल्या अहवालात जगातील संपत्तीतील 82 टक्के वाटा हा केवळ एक टक्‍का लोकांकडं आहे, असं म्हटलं होतं. तीन अब्ज लोकांच्या संपत्तीत वर्षभरात काहीच वाढ झाली नव्हती. भारतात एक टक्‍का धनिकांच्या संपत्तीत 21 लाख कोटी रुपयांनी भर पडली. भारतातील एक टक्‍का श्रीमंतांकडं देशातील 73 टक्के संपत्ती आहे, तर 67 कोटी भारतीयांच्या संपत्तीत फक्‍त एक टक्‍का वाढ झाली आहे. भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढलं असलं, तरी विषमताही वाढली आहे. “ऑक्‍सफॅम’ ही नामांकित संस्था असून, “रॅंडम सॅंपलिंग’चं तंत्र वापरून जगात पाहणी करण्यात आली होती. त्यात कंपन्यांच्या “सीईओ’ किंवा मुख्याधिकाऱ्यांच्या वेतनात कपात व्हावी, असं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 60 टक्के लोकांना वाटतं. खासगी कंपन्यांतील सामान्य कामगार व मोठे अधिकारी यांच्या वेतनांत कमालीचं अंतर पडत चालली आहे. ही नवी वर्गवारी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं तितकीशी चांगली नाही.
भारतातील 37 टक्के अब्जाधीशांकडं वारसा हक्‍कानं संपत्ती आली असून, त्यात त्यांचं काहीच कर्तृत्व नाही. केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोईसुविधांचा फायदा मूठभर व्यक्‍तींपर्यंतच पोहोचत आहे, असा निष्कर्षाचा अर्थ असल्याचं “ऑक्‍सफॅम’च्या भारतातील मुख्याधिकारी निशा अग्रवाल यांनी म्हटलं आहे. अब्जाधीशांची वाढती संख्या हे निरोगी नव्हे, तर ढासळत्या अर्थव्यवस्थेचं लक्षण आहे. एका बाजूला बांधकाम मजूर, शेतमजूर, कारखान्यांतील कामगार यांच्याकडं मुलांच्या शाळा-कॉलेजांच्या फीसाठी वा औषधांसाठी पैसे नाहीत आणि दुसरीकडं संपत्तीचं हिडीस प्रदर्शन केलं जात आहे. जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक लागतो. अमेरिका हा जगातील सर्वांत श्रीमंत देश असून, त्याची संपत्ती 64 हजार अब्ज डॉलर्सची आहे, तर भारताची 8 हजार अब्ज डॉलर इतकी आहे. “न्यू वर्ल्ड वेल्थ’च्या अहवालानुसार, 2007 मध्ये भारताची संपत्ती तीन हजार 165 अब्ज डॉलर्स होती, तर एका दशकात ती 16 टक्क्‌यांनी वाढून 8 हजार अब्ज डॉलर्सवर गेली. भारतात सुमारे 20 हजार कोट्यधीश असून, कोट्यधीशांचा विचार करता, भारत जगात सातव्या स्थानी आहे. सर्वाधिक अब्जाधीश व्यक्‍ती असलेल्या देशांच्या यादीत भारताचा अमेरिका व चीननंतर तिसरा क्रमांक लागतो. जगात ज्या देशांत आर्थिक विषमता जास्त असते, तिथं जास्त अस्वस्थता असते. एकीकडं संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन आणि दुसरीकडं हाता-तोंडाची गाठ पडण्याची मारामार असं चित्र दिसतं. काहींची पोटं खपाटीला गेलेली, तर काहींच्या पोटांचा आकार वाढत चाललेला. या दोन्ही गोष्टी मारक असून जेव्हा अर्धभुकेल्या, कंगालांचा संयम संपतो, त्यांची भूक अनावर होते, तेव्हा असे भुकेकंगाल हात थांबत नाहीत, तर ते दुसऱ्याच्या भरलेल्या थाळीतलं हिसकावण्याचा प्रयत्न करतात. अशी वेळ येऊ द्यायची नसेल, तर आर्थिक विषमतेची दरी कमी करायला हवी. त्या दिशेनं सरकारचे प्रयत्न असायला हवेत; परंतु तसं होताना दिसत नाही. ठराविक कुटुंबांकडं उद्योजकीय मालकी असली आणि त्यांनी स्वकर्तृत्त्वातून संपत्तीत भर घातली असली, तरी ती मग कौतुकाचा विषय होत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)