इतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली आहे

लेखक प्रताप गंगावणे : मनोरंजनालाच इतिहास समजण्याची चूक

गुरूनाथ जाधव –

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा, दि. 8 – इतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली होती ती लिहण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी केले. कोरेगाव सोनके येथील व सध्या सातारचे रहिवासी असलेल्या प्रताप जयसिंग गंगावणे यांना सातारा येथील शाहू कलामंदीर येथे सायंकाळी 6 वाजता, रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट यांच्या वतीने ‘साताराभुषण’ पुरस्काराने श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे अध्यक्षते खाली आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्ताने त्यांनी दै. प्रभातशी संवाद साधला.

प्रताप गंगावणे म्हणाले, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, बाजीराव मस्तांनी, राजा शिवछत्रपती मालिका व चित्रपट लिहिताना प्रत्यक्ष घटना घडल्या,त्या ठिकाणांना भेटी देवून खरा इतिहास व ते सत्य स्वरूपात मांडण्याचे काम मी करत आहे. इतिहासामध्ये अलिप्तता गहाळ झाली आहे. इतिहास लिहित असताना इतिहासाची साधने कमी पडत आहेत.बखरी या माध्यमातून यापूर्वी इतिहास लिहिला आहे. कादंबरीकारांनी इतिहास लालित्यपूर्वक लिहिला. त्यामध्ये रंजक गोष्टी आल्याने इतिहास थोडासा बाजूला पडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आजपर्यंत वरवरचा इतिहास लिहिला गेला.
पत्र इतिहासाच्या अस्सल साधनात येते असे सांगून प्रताप गंगावणे म्हणाले, बखर ही समकालीनमध्ये येत नाहीत. एक पत्र इतिहास बदलू शकते. त्यामुळे अस्सल साधने ज्यावेळी बाहेर येतात त्यावेळीच खरा इतिहास समजतो.

चित्रपट, नाटक, व मालिकांच्या माध्यमातून मनोरंजन होताना त्याला खरा इतिहास समजण्याची चूक अनेक वेळा आपल्याकडून होत आहे. त्यामुळे खरा इतिहास अस्सल साधनांच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला,अद्याप बराच इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाच नसल्याची खंत वाटते. बाजीराव मस्तानी यांच्या आजवर न मांडलेल्या खऱ्या प्रतिमा भान ठेवून अभ्यासपूर्वक पध्दतीने मांडल्या. मला आज सातारा भुषण पूरस्कार मिळतो त्याचे कारणही तेच आहे.

आजपर्यंत मी विनोदी चित्रपट, नाटक लिहिली आहेत. खरा विनोदातून समाजातील व्यंग बाहेर यावे असे मला नेहमी वाटते. पैज लग्नाची, तांबव्याचा विष्णू बाळा, सख्खा भाऊ पक्का वैरी, बापू बिरु वाटेगावकर, फॉंरेनची पाटलीण, जाऊ तेथे खाऊ हे चित्रपट त्यामुळे खूपच गाजले. हिंदी, तेलगू, कोकणी असे अनेक चित्रपट व मालिकांमध्ये यापूर्वी लिखाण केले.स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, राजा शिवछत्रपती, बाजीराव मस्तानी, या मालिका देखील खूप लोकप्रिय झाल्या. आजवर अनेक राज्य पुरस्कार मिळाले आहेत. वाचक, प्रेक्षकांचे प्रेम, आशीर्वाद मिळाले हे माझे भाग्य आहे,असेही ते म्हणाले.

हल्लीची सामाजिक परिस्थिती निकोप नाही. एका व्यक्तीची चूक ही त्या समाजाची चूक समजून समाजामध्ये विचारांचे विघटन होत चालले आहे. त्यासाठी शिवविचार समजणे आवश्‍यक आहे. शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती -जमातीच्या लोकांना एक करण्याचे काम केले. आता मात्र परिस्थिती वेगळी होत आसल्याचे दिसत आहे. यासाठी शिवविचारांची आज देशाला गरज आहे. जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांच्या विचारांना घेवुन चालत आहोत तोपर्यंत आपल्या राष्ट्राला कोणी हरवू शकणार नाही असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)