इतिहासाच्या विकृतीकरणाचा प्रतिवाद होणे गरेजचे – डॉ. महाजन

चिंचवड ः भगतसिंग व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी डॉ. रत्नाकर महाजन यांचा सत्कार करताना आयोजक आणि नेत्रसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
  • शहीद भगतसिंग व्याख्यानमाला ः भगतसिंगांचा आर्थिक विचार व सध्याची आर्थिक परिस्थिती विषयावर व्याख्यान

चिंचवड, (वार्ताहर) – भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भगतसिंग यांचा हिंसक क्रांतीचा मार्ग आणि महात्मा गांधींची अहिंसावादी चळवळ हे दोन्हीही प्रयत्न योग्य होते. परंतु ज्यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काडीचाही संबंध नाही असे काही लोक इतिहासाचे विकृतीकरण करतात, तेव्हा त्याचा प्रतिवाद निश्‍चितपणे केला पाहिजे, असे प्रतिपादन नियोजन आयोगाचे माजी सदस्य आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ.रत्नाकर महाजन यांनी केले.

नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शहीद भगतसिंग व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. काकडे पार्क चौक, चिंचवडगाव येथे आयोजित तीन दिवसीय शहीद भगतसिंग व्याख्यानमालेत भगतसिंगांचा आर्थिक विचार व सध्याची आर्थिक परिस्थिती या विषयावर महाजन यांनी आपले विचार व्यक्‍त केले.

पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नागरी हक्क सुरक्षा समिती संस्थापक मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महात्मा फुले मंडळ अध्यक्ष हनुमंत माळी, उद्योजक संतोष मोहिते, नितीन डांगे-पाटील यावेळी उपस्थित होते. नेत्रसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक आणि व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक प्रदीप पवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून, महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या विचारांच्या प्रसारातून समाजप्रबोधन व्हावे या उद्देशाने शहीद भगतसिंग व्याख्यानमालेचे आठ वर्षांपासून आयोजन केले जात असल्याचे सांगितले. व्याख्यानापूर्वी, अजित मळेकर यांनी देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण केले.

डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले की, इतिहासाविषयी परस्परविरोधी मतप्रवाह विचारवंतांमध्ये आढळतात. त्यामुळे इतिहासातील मढी उकरून काढून आज त्याचे निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. ऐतिहासिक घटनांचा नीरक्षीरविवेकाने विचार केला पाहिजे. धार्मिक मूलतत्त्वांचे मूळ देखील आर्थिक असते, असे मार्क्‍सवाद मानतो. भारतासारख्या विविध जाती-धर्माच्या देशात आर्थिक समानता असावी, असे भगतसिंग यांना वाटायचे. त्यामुळे लाहोर, पंजाब येथे शेती आणि उद्योग या क्षेत्रात आर्थिक समानता यावी या उद्देशाने त्यांनी सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. शेती आणि कारखाने यांचे मालक जरी वेगळे असले तरी शेतमजुराला आणि औद्योगिक कामगाराला उत्पादनात वाटा मिळाला पाहिजे, असे भगतसिंग यांचे तत्त्व होते. त्या संदर्भात भगतसिंग यांनी केलेले कार्य आजदेखील सुसंगत वाटते. मार्क्‍सवादाच्या सिद्धांतानुसार शेतजमीन ही खाजगी न राहता तिची मालकी सार्वजनिक व्हावी या तत्त्वाचा भगतसिंग यांनी पुरस्कार केला; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भगतसिंग यांनी हिंसक क्रांतीचा मार्ग स्विकारला असला तरी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी त्यांच्या मनात नितांत आदर होता. आपला जहाल क्रांतीचा मार्ग सर्वानीच स्विकारावा, असा आग्रहदेखील भगतसिंगांनी कधी धरला नाही. भगतसिंग यांना फाशीची शिक्षा जाहीर झाल्यावर प्रचलित कायद्यानुसार त्यांना माफीविषयी विचारणा करण्यात आली होती; परंतु आपला हिंसक क्रांतीचा मार्ग योग्य असल्याचा विश्वास व्यक्त करून भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारची माफी मागण्यास ठाम नकार दिला.

मयूर जैस्वाल, प्रमोद शिंदे, मनोज फाटे, मानसी चिटणीस यांनी संयोजनात सहकार्य केले. सविता इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर सुहास घुमरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)