“इको फ्रेन्डली’ गणेशोत्सवासाठी यंदाही पुढाकार

100 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदीचा प्रस्ताव स्थायीसमोर

पुणे – पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुरू केलेला उपक्रम यंदाही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत महापालिकेने यंदा सुमारे 100 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करण्याचे ठरविले त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.

सन 2016 पासून महापालिकेकडून या उपक्रमाची सुरूवात केली असून त्याला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली. मात्र, मागील दोन वर्षांत जनजागृती कमी झाली. यावर्षी जास्तीतजास्त स्वयंसेवी संस्थाच्या सहभागाने हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जाणार असल्याचे जगताप यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

मागील वर्षी शहरात सुमारे साडेपाच लाख गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. त्यात सुमारे 4 लाख मूर्ती या हौदात विसर्जित केल्या असल्या तरी, नदीमध्ये मूर्ती विसर्जनाचे प्रमाणही लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने गणपतीच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती विरघळण्यासाठी सन 2016 पासून घरगुती मूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट वाटप सुरू केले आहे. पहिल्या वर्षी या उपक्रमातून फक्‍त 10 हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र, मागील वर्षी सुमारे 42 हजार मूर्तींचे विसर्जन घरगुती पद्धतीने झालेले आहे. ही पद्धत नवीन असल्याने तसेच प्रतिसाद वाढत असल्याने पालिका यंदाही अमोनियम बायकार्बोनेट मोफत देणार आहे.

यंदाही 100 टन खरेदी
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सुमारे 82 टन अमोनियम बायकार्बोनेटचा वापर झाला. त्यामुळे मागील वर्षाचे केवळ 18 टन अमोनियम बायकार्बोनेट शिल्लक असल्याने यंदा नव्याने 100 टन या रसायनाची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स कंपनीकडून केली जाणार असून त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे 18 लाख रुपयांचा खर्च येणार असून अंदाजपत्रकातील उपलब्ध तरतुदीमधून हा निधी दिला जाणार आहे.

हौदांमध्ये विसर्जनावर भर देणार
महापालिकेने उभारलेल्या हौदांमध्ये गणेश विसर्जन करावे, यावर भर देण्यात आहे. गेल्या काही वर्षांतील जनजागृतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून हौदांमध्ये होणारे विसर्जन वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर जनजागृती वाढवत हौदांमधे गणेशमूर्ती विसर्जनावर भर दिला जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)