निवडक खरेदीमुळे शेअरबाजार निर्देशांकांत झाली भरघोस वाढ 
मुंबई – इंधनाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांवर विंडफॉल कर लावण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यामुळे गुरुवारी तेल कंपन्यांच्या शेअरच्या भावात 7 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली. यात ओएनजीसी, ऑईल इंडिया या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्या देशांतर्गत उत्पादनवरही आंतरराष्ट्रीय दर लावतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर 70 डॉलर प्रति पिंपाच्या वर गेल्यास या कंपन्यांच्या देशांतर्गत उत्पादनावरील अतिरिक्त नफ्यावर कर लावला जाणार असल्याची चर्चा चालू आहे.

दरम्यान रुपया कमकुवत झाल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि निर्यात करणाऱ्या इतर कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी होऊन गुरुवारी शेअरबाजार
निर्देशांक उसळले. बॅंका, धातू आणि औषधी कंपन्याच्या शेअरकडेही गुंतवणूकदारांचा ओढा होता. बॅंकाची अनुत्पादक मालमत्ता कमी होण्याची शक्‍यता वाढली आहे आणि कंपन्यांना इतर कंपन्या अधिगृहीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे बॅंकांना त्यांचे भांडवल परत मिळण्याची शक्‍यता आहे. या कारणामुळे सध्या जरी बॅंकांचा तोटा वाढला असला तरी आगामी काळात बॅंकांचे ताळेबंद सुधारण्याची शक्‍यता असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे.

मात्र सध्या तरी परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदीच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांच्याकडून विक्रीचा मारा चालूच आहे. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांचा मात्र भारतातील कंपन्याच्या उत्पादकतेवर विश्‍वास कायम आहे. त्यामुळे त्यांच्याकडून खरेदी चालू आहे. काल परदेशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 789 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असली तरी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांना मात्र काल 311 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी करुन गुंतवणूकदारांना आधार दिला.

गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल 318अंकानी वाढून 34663 अंकावर बंद झाला. काल क्रुडच्या चढ्या भावामुळे सेन्सेक्‍स 316 अंकानी कमी झाला होता. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 83 अंकानी वाढून 10513 अंकावर बंद झाला. गेल्या काही दिवसात निर्देशांक घसरल्यामुळे अनेक ब्लूचिप कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांकडून निवडक खरेदी होत आहे.

टाटा मोटर्सचा शेअर कोसळला 
टाटा मोटर्स कंपनीचा शेअर आज तब्बल 7 टक्‍क्‍यांनी कोसळला. त्यामुळे एकाच दिवसात कंपनीचे बाजारमूल्य 5861 कोटी रुपयांनी कमी झाले. काल कंपनीने चौथ्या तिमाहीतील नफा 50 टक्‍क्‍यानी कमी होऊन तो केवळ 2176 कोटी रुपये झाला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र आगामी काळात कंपनीने नफा आणि उलाढाल वाढेल असे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)