इंधन कंपन्यांचे शेअर वधारले 

रुपया वधारल्यामुळे आयटी आणि औषधी कंपन्या मात्र पिछाडीवर 

खरेदी -विक्रीच्या लाटांमुळे मुख्य निर्देशांक मात्र स्थिर 

-Ads-

मुंबई: देशातील स्थूल अर्थव्यवस्थेचे चित्र सकारात्मक असल्यामुळे मंगळवारी शेअरबाजार निर्देशांकात चांगली वाढ झाली होती. आज सकाळीही बरीच खरेदी होऊन निर्देशांक उंचावले होते. मात्र, जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने दुपारी मोठ्या प्रमाणात विक्री होऊन शेवटी निर्देशांक कालच्या पातळीवर स्थिरावले. ऊर्जा, बॅंकिंग आणि धातू क्षेत्रांतील कंपन्यांचे शेअर तेजीत होते तर माहिती तंत्रज्ञान आणि औषधी कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले.

बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 2 अंकांनी म्हणजे 0.01 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 35141 अंकांवर स्थिरावला. तर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 6 अंकांनी कमी होऊन 10576 अंकांवर विसावला. या घडामोडीबाबत विश्‍लेषकांनी सांगितले की, इंधनाचे दर कमी होऊन रुपया चांगलाच वधारला आहे. त्याचबरोबर किरकोळ महागाई कमी झाली आहे. मात्र, तरीही जागतिक बाजारातील मंद वातावरण आणि भांडवल सुलभतेच्या अभावामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्याचबरोबर निवडणुकाबाबत संदिग्ध संदेश येत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार दीर्घ पल्ल्याचे निर्णय घेतला दिसत नाहीत.

आज क्रुड तेलाचे दर एक वेळ 65 डॉलरपर्यंत कमी झाल्यानंतर रुपयाच्या मूल्यात बरीच सुधारणा होण्याची शक्‍यता निर्माण झाली. त्यामुळे निर्यात करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि औषधी कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने निर्देशांक वाढू शकले नाहीत. मात्र, इंधन कंपन्यांच्या शेअरच्या भावात 7.7 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. त्याचबरोबर प्रवाशी विमान वाहतूक कंपन्यांही तेजीत होत्या.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता खरेदी करीत असल्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्याचा रुपयाला चांगला आधार मिळू लागला आहे. दुपारी रुपयाचे मूल्य 37 पैशांनी वाढल्यानंतर खरेदीचा जोर वाढला. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले क्रुडचे दर आज एक टक्‍क्‍याने कमी झाल्याचे दिसून आले.

शेअरबाजारातील आजच्या परिस्थितीबाबत बोलताना विश्‍लेषकांनी सांगितले की, आगामी काळातही शेअरबाजारात ऊन-पावसाचा खेळ चालूच राहण्याची शक्‍यता आहे. जागतिक शेअरबाजारातील वातावरण व्यापारयुद्धामुळे लवचिक राहणार आहे. त्याचबरोबर क्रुडचे दरही फारसे स्थिर राहणार नाहीत. या दोन्ही बाबींचा आणि चलनाच्या मूल्यांचा शेअरबाजारावर वेळोवेळी परिणाम होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)